योगमार्गातून अद्वैताचा प्रत्यय

डॉ. राजीव शारंगपाणी
मंगळवार, 11 जून 2019

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

हेल्थ वर्क
आपल्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या उत्कट शक्तींशी संबंधित योगमार्ग अनुसरल्यास कमी अडथळे येतात. त्यामुळे ठेचाही कमी लागतात. अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनी ज्ञानयोग प्रमुख म्हणून धरावा. भावनाप्रधान व्यक्तींनी भक्तिमार्ग चोखाळावा. कर्ममार्ग सर्वांसाठीच आहे. हठयोगाचा उपयोगदेखील सर्वांनी करावा, पण कधीही शरीरास दुःख देऊन हठयोग करू नये. राजयोगदेखील बुद्धिमान व्यक्तींनी अनुसरावा. मंत्रयोगासाठी आपल्या चणीचा मंत्र मिळावा लागतो, तरच खूप उपयोग होतो.

सर्वसाधारण मंत्र तितकेसे उपयोगी पडतीलच, असे नाही. यदृच्छेने हातून घडणाऱ्या गोष्टी साक्षीभावाने ‘करणे’ हा कर्मयोग, त्या कशा आणि का होताहेत ते शोधणे हा ज्ञानयोग. त्या कर्त्याकरवित्याविषयी (असल्यास!) मनात अत्यंत प्रेम दाटणे हा भक्तियोग आणि असे होता समाधी अवस्थेची गोडी चाखणे हा राजयोग घडू लागतो.

आपल्या श्‍वासावर लक्ष ठेवून मृत्युसमयी शेवटचा आत आलेला श्‍वास अखेरच्या वेळी बाहेर सुटत असताना जागरूक राहण्याची तरतूद प्राणायामातून घडते. सर्व योगमार्ग शेवटी अद्वैताचा प्रत्यय आणून देतातच. जगाचे रहस्य योगाने सुटत नाहीच, उलट अधिकच घनदाट होत जाते. तुम्ही खोल जाल तितका थांग लागत नाही. आत बुडी मारा किंवा बाहेर बुडी मारा, खोली तितकीच अथांग राहते. प्रयत्न केल्यावर आता काही सापडेल अशी आशा अजिबात उरत नाही. सापडणार नाही हे नक्की माहिती असताना तसा प्रयत्न करणे आणि करीत राहणे हे आध्यात्मिकस्वास्थ्यनियोजन होय. त्यासाठी ‘मी कोण आहे?’, ‘माझ्याकडून हे काय होत आहे?’, ‘माझ्याभोवती हे काय चालले आहे?’ असे सदैव अनुत्तरित राहणारे, पण आध्यात्मिक स्वास्थ्य टिकविणारे प्रश्‍न सोबतीस ठेवावेत.

(उद्याच्या अंकात वाचा - स्वास्थ्यनियोजन सदैव करावे लागते.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rajiv Sharangpani all is well sakal pune today