शारीरिक परिश्रमावर  ठरवा आहार (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी
मंगळवार, 7 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
"शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा" आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा"सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल"पुरवणीत...

हेल्थ वर्क 
सामान्यपणे निसर्गतः उपलब्ध असलेले सर्व पदार्थ त्याच अवस्थेत खाल्ल्यास आरोग्यदायक असतात. उदाहरणार्थ मोड आलेले गहू, गव्हाची पोळी, बिस्कीट, नान आणि लोणीयुक्त नान हे सर्व पदार्थ गव्हापासून केले असले; तरी त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. लोणीयुक्त नान खाणे आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले नाही. मात्र, एखाद्या दिवशी तुम्हाला मेजवानी दिली आणि त्यात फक्त नान असल्यास खायला काय हरकत आहे? एक दिवसाने काय होते? नान मनापासून खाण्याची इच्छा असताना केवळ आहारशास्त्राच्या नियमामुळे ते न खाणे म्हणजे आनंदाला नकार देणे आहे.

उन्हातान्हातून दमून आल्यावर एखादी शीतपेयाची बाटली प्यायल्यास आरोग्याला काही धोका पोचत नाही. उलट अत्यंत मजा येते. पण, रोजच्या रोज पाण्यासारखी शीतपेये पिणे म्हणजे अनारोग्याला आमंत्रणच आहे. भारतात प्रत्येक प्रांताचा आहार निराळा, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आहार वेगळा. त्याशिवाय जातिधर्माप्रमाणे आहार बदलतोच. शेवटी शरीरप्रकृतीमुळे आहार बदलतो. कुणाला केळे खाल्ले की घशात जळजळते, पेरू खाल्ला की सर्दी होते. आता या गोष्टी कोणत्याही वैद्यकीय पुस्तकात सापडणे केवळ अशक्‍य आहे. त्या शेवटी अनुमानाने ठरविल्या जातात. आपला आहार शारीरिक परिश्रमावर ठरविला पाहिजे. शारीरिक परिश्रम न करता वाटेल ते खाण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि अनाधिकाराने, बेमुर्वतखोरपणे वाटेल ते खाल्ल्यास त्याचा शरीराला कुठे ना कुठे तरी फटका बसणारच. दुर्दैवाने समाजरचना अशी आहे, की आज शारीरिक परिश्रम करणाऱ्यालाच नीट खाण्यास मिळत नाही. आधी त्याला नीट खाण्यास मिळण्याची नितांत आवश्‍यकता आहे. स्वतःच्या शरीरस्वास्थासाठी शारीरिक परिश्रम करीत नाही तो समाजाच्या उन्नतीसाठी शारीरिक श्रम करणे शक्‍य नाही.

(उद्याच्या अंकात वाचा - आहाराबाबतचे सोपे नियम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Rajiv Sharangpani article decide on physical hard work diet