जाणून घ्या मुलांची मते (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी
मंगळवार, 14 मे 2019

"आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!"
"शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा" आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

हेल्थ वर्क
उन्हाळ्याच्या सुटीचा उपयोग कसा करावा, या विषयी मुलांचे मत घेणे अतिशय आवश्‍यक आहे. विशेषतः १० ते १२ या वयोगटातील मुलांना सुटीविषयी विचारणे आवश्‍यक आहे. हे वाचल्यावर ‘मुलांना काय विचारायचे त्यात? त्यांना काय कळते?’ असा मौलिक विचार कुणाच्याही मनात येणे शक्‍य आहे. मुलांना खूपच कळते आणि कित्येक वेळेला पालकांपेक्षा जास्त कळते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. शाळेतले शिक्षण केवळ ऐकणे आणि पाहणे या प्रकारातील असते. हातपाय हलवून एखादी गोष्ट करून पाहणे, यातून मुले जास्त शिकतात यावर कुणाचा विश्‍वास नसतो. किंवा वेळ अगर पैसे नाहीत, अशी सबब करून त्याला फाटा दिला जातो. सुटीचा सगळ्यात मोठा उपयोग हाच आहे.

या जगात करून पाहण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत. त्या हजारो गोष्टींपैकी आपल्या मुलीला किंवा मुलाला कोणती गोष्ट करायला आवडते, हे पाहणे फार महत्त्वाचे. ‘कुठली गोष्ट आपल्या मुलाने केल्यास पालकांना आवडेल,’ याला फारसे महत्त्व नाही. इथेच पालकांचा अहंकार आड येतो. पण, त्याला मुरड घालणे ही पहिली पायरी आहे. एखादा मुलगा म्हणतो, ‘‘आई, मला कणीक मळून पोळ्या करायच्या आहेत.’’ सामान्यपणे आईच ही मागणी फेटाळते. तसे झाले नाही तर बाबा म्हणतात, ‘‘त्यापेक्षा, व्यायाम वगैरे कर की जरा. हा कसला बायकीपणा.’’ मुलाचा उत्साह जातो. एखादी मुलगी म्हणते, ‘‘बाबा, मी व्यायाम करायला जाणार.’’ तिचे बाबा यातील हवा काढून टाकतात. नाहीच काढली तर आई म्हणते, ‘‘सासरी जाऊन जोरबैठका मारणार आहेस काय?’’ या आणि अशा गोष्टी सर्वत्र चाललेल्या असतात. मुले सर्व गोष्टी हालचालींतून शिकतात. ही हालचाल मनापासून झाली की नाही, हे महत्त्वाचे. एखाद्या हालचालीला मनाचा अडसर असल्यास त्यातून शिकता तर काही येत नाहीच, पण शरीराला अपाय होण्याची शक्‍यता वाढते. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा कसे वाटते, हे सर्वांनी आठवून पाहावे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Rajiv Sharangpani on Know Childrens Views