भारतीय इतिहास आणि रोमिला थापर यांची भूमिका...

संतोष शेलार
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

थापर यांनी या भाषणात हिंदुत्ववादी विचारांचेही विश्‍लेषण केले आहे. परंतु ते फार ढोबळ रीतीने केले आहे. उदा. सावरकर नि संघ यात घोळ घातलेला आहे. त्यांच्या या विश्‍लेषणातून फक्त एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी सावरकर वाचलेला नाही

भारतामधील आघाडीच्या, महत्त्वपूर्ण इतिहासकारांमध्ये रोमिला थापर यांचे नाव घेतले जाते. थापर यांचा राष्ट्रवाद, इतिहास आणि धर्मावरील अभ्यास अभ्यासकांना सुपरिचित आहेच. जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील कन्हैय्या कुमार या विद्यार्थी नेत्याचे "आझादी आंदोलन' झाल्यानंतर थापर यांनी इतिहास, राष्ट्रवाद आणि सांप्रदायिकता या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानामध्ये थापर यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. या व्याख्यानामधील आशयाचा प्रतिवाद करणारा एक लेख.
-------------------------------------------------------------------------------------------

रोमिला थापर हे सद्यकालीन इतिहासकारांत सर्वात सुप्रसिद्ध असे नाव आहे. केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य सुशिक्षित वाचक वर्गालाही त्यांचे नाव माहित असते. ज्यांना इतिहासाविषयी काही जिज्ञासा आहे अशा हौशी वाचकांनी त्यांचे एखादे पुस्तक किंवा किमान एखादा लेख तरी वाचलेला असतो. बी. ए. च्या अभ्यासक्रमात एक विषय इतिहास-लेखन-शास्त्र म्हणून असतो. त्यात एखादे प्रकरण तरी 'इतिहासकारां'च्या अभ्यासाचे असते. त्यात ज्या इतिहासकारांचा अभ्यास केला जातो ते सर्व जुने नि आता हयात नसलेले असतात. मात्र थापर याला अपवाद आहेत. सद्यकाळात स्वत:च्या हयातीत ज्यांचा इतिहासकार म्हणून अभ्यासक्रमात समावेश झाला आहे, अशा इतिहासकार केवळ थापर याच आहेत. थापर यांनी गेल्या वर्षी "इतिहास, राष्ट्रवाद आणि सांप्रदायिकता' या विषयावर एक व्याखान दिले. त्यावर मला काही आक्षेप नोंदवायचे आहेत. (सदर व्याख्यानाला कन्हैया प्रकरणाचा संदर्भ होता. मात्र त्यावर कोणतेही भाष्य इथे केलेले नाही.)

थापर म्हणतात, की राष्ट्रवाद्यांना इतिहासाची एक प्रकारे 'तलफ' असते. ते त्याच्या आहारी गेलेले असतात. ही गोष्ट अगदी खरी आहे, पण दुसऱ्या बाजूने असाही विचार करायला हवा की असं इतिहासाच्या ग्राउंडवर न खेळणारी विचारसरणी कोणती आहे ? मला वाटतं साऱ्या वैचारिक युद्धांचं इतिहास हेच रणक्षेत्र आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवाद्यांना हा दोष देउन चालणार नाही. इतिहासातील सुवर्णकाळाविषयी त्या लिहितात, पण प्रश्न असा आहे की काहीच दोष नसलेला असा सुवर्णकाळ कोणत्या इतिहासकाराने रंगवलेला आहे ? मला वाटतं राष्ट्रवादी इतिहासकारांनीही अशी चूक केलेली नाही. (कार्यकर्त्यांची गोष्ट सोडून द्या.) इथं अजून एक मुद्दा आहे. तो त्यांनी स्पष्टपणे मांडलेला नाही. पण आपण तो मांडू या. सुवर्णकाळाचा मुद्दा हा एकटा किंवा सुटा नसतो त्याला मूलतत्त्ववादाचा संदर्भ असतो. जेंव्हा एखादा मूलतत्त्ववाद उभा राहतो, आणि जर तो धार्मिक मूलतत्त्ववाद असेल तर त्याला काही गोष्टींची आवश्‍यकता असते. एक म्हणजे प्रमाण ग्रंथ आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासात नोंदलेले आदर्श असे सुवर्णयुग. ते युग त्यांना पुनरुज्जीवित करावयाचे असते. (सध्याचे इसिस आणि त्यांची खिलाफत हे त्याचे नमुनेदार उदाहरण ठरावे.) आपल्या इतिहासकारांनी सुवर्णकाळाची भाषा केलेली असली तरी तो 'आदर्श' काळ होता नि तिकडे परत गेले पाहिजे; असा प्रचार कोणीही केलेला नाही. वेदांना प्रमाण मानणाऱ्या आर्य समाजीयांनी 'वेदांकडे परत चला' अशी घोषणा दिली असली तरी प्रत्यक्षात त्यांची चळवळ काल सापेक्ष विचार करता फारच प्रागतिक होती. सारांश सुवर्णकाळाच्या भाष्याविषयी राष्ट्रवादी इतिहासकारांनी 'फार' मोठा गुन्हा केला असं मानता येणार नाही. फार तर त्यांनी अतिशयोक्ती केली असा आरोप त्यांच्यावर लावता येईल व स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ पाहता तो क्षम्यही मानता येइल. उलट भांडवलशाही नंतर येणारा समाजवाद हा सुवर्णकाळ असणार आहे, असे भविष्यपुराण मात्र डाव्या इतिहासकारांनी सांगितले आहे. उदा. डी. डी. कोसंबी आणि डी. एन. झा यांनी खरा सुवर्णकाळ हा भूतकाळात नसून तो भविष्य काळात असतो, असे स्पष्ट सांगितले आहे. खरं म्हणजे असं सांगणं इतिहासाच्या शिस्तीविरुद्ध आहे. पण एकदा थिअरी वर विश्वास ठेवायचा म्हटलं की मार्क्‍सचे इतिहासाचे पाचही टप्पे मान्य करावे लागतात. त्यातून भविष्य-पुराण जन्माला येते.

थापर यांनी आर्यांच्या मूलस्थानाचाही विषय चर्चेसाठी घेतला आहे. या विषयाचं कसं राजकीयीकरण झालेलं आहे, हेही त्या सांगतात. विशेषत: आर्यांच्या भारतीय उगमस्थानाविषयी कोणी प्रश्न उपस्थित केल्यास सोशल मिडीयावर त्या व्यक्तीला लोकांच्या क्रोध नि अपमानास सामोरे जावे लागते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यात तथ्य आहे. आणि हे असहिष्णुपणाचे लक्षण आहे, असेच माझे मत आहे. इथे प्रश्न असा आहे की डावे इतिहासकार या बाबतीत (आणि अन्यही बाबतीत) सहिष्णु आहेत का? आर्यांच्या मूलस्थानाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असून या प्रश्नावर अभ्यासकांत फार मोठे रण माजलेले आहे. स्वत: थापर यांनी अलिकडेच एका भाषणात याविषयी निर्णायक भूमिका घेता येणार नाही असे सांगितले आहे. तरीही डावे इतिहासकार या प्रश्नावर असहिष्णु भूमिका घेतात, असेच दिसून येते. उदा. एखाद्या इतिहासकाराने 'आर्य मूळचे भारतातील असावेत' असा तर्क मांडला तर त्यावर चर्चा करण्याऐवजी सदर इतिहासकार प्रतिगामी असल्याचा शिक्का डावे मारतात व चर्चा टाळतात. दोन उदाहरणे देणे इथे अप्रस्तुत होणार नाही.

आर. एस. शर्मा यांनी NCERT चे वी इतिहासाचे टेक्‍स्ट बुक लिहिले आहे. ते प्राचीन भारतावर आहे. त्यात आर्यांच्या मूलस्थानाची चर्चा आहे. आता खरं तर या विषयावर तज्ञांचे प्रचंड मतभेद आहेत. त्यामुळे टेक्‍स्ट बुक मधे विविध मत-मतांतरे सांगणे अपेक्षित असते. शेवटी हवे तर लेखकाने स्वत:चे मत सांगावे अशी साधारण पद्धत आहे. (आर्यांच्या मूलस्थानाविषयी मत-मतांतरे सांगा, असा एक प्रश्नच विचारण्याची पद्धत आहे.) पण शर्मा यांनी काय केले तर मत-मतांतरे दिलीच नाहीत. सरळ स्वत:ला मान्य असलेले एकमेव मत सांगून ते मोकळे झाले. नवख्या वाचकाला या विषयावर मत-मतांतरे आहेत, याचा पत्ता सुद्धा हे पुस्तक वाचून लागणार नाही. गंभीर वादग्रस्त विषयासंबंधी इतर अभ्यासकांची मते कळूसुद्धा न देणे ही एक प्रकारची असहिष्णुताच होय. पाठ्यपुस्तके किती एकांगीपणे लिहिली जातात, हेही त्यावरून समजते.

दुसरे उदाहरण म्हणजे अलिकडेच NBT ने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. 'India : Historical Beginnings & the concept of Aryan' या नावाचा हा लेखसंग्रह 200 पृष्टांचा आहे. प्रस्तावना सोडल्यास यात चार लेख आहेत. यातही अर्थातच 'आर्यांचे मूलस्थान भारतीय' असं मानणाऱ्या इतिहासकाराला स्थान मिळालेले नाही. ही बाजूच या ग्रंथातून नीट समोर येत नाही. वरील दोन्ही उदाहरणे मुद्दाम सरकारी प्रकल्पातील दिली आहेत. सर्व सरकारी इतिहास प्रकल्पात डाव्यांचीच लॉबी कार्यरत असल्याने ते केवळ त्यांचाच अजेंडा पुढे नेत असतात. उगीच आता सोशल मिडीया प्रभावी झाला आहे म्हणून बरं. नाही तर डाव्यांनी इतर विचारधारा पुरेपूर संपवण्याचा प्रयत्न केला होता.

थापर यांनी या भाषणात काल-विभाजनाच्या समस्येलाही हात घातला आहे. ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने भारताची हिंदु काल (प्राचीन), मुस्लीम काल (मध्ययुगीन) व ब्रिटिश काल (आधुनिक) अशी विभागणी केली. यात हिंदु-मुस्लीम विरोध गृहीत धरलेला आहे. त्यातूनच पुढे द्विराष्ट्रवाद जन्माला आला, अशी थापर यांची मांडणी आहे. साधारणपणे बहुतेक डाव्या इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की, भारतात मध्ययुगीन काळात हिंदु-मुस्लीम संघर्ष तीव्र नव्हता. जो होता त्याचे स्वरूप राजकीय व आर्थिक काय ते होते. आधुनिक काळात तो 'निर्माण' होण्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचं राजकारण. विशिष्ठ प्रकारचं इतिहास लेखनही त्याचाच एक भाग होता. हिंदु काळ, मुस्लीम काळ असं म्हटल्यामुळं भांडणं वाढत गेली.

हे आकलन मुळात फार सदोष आहे असे मला वाटते. मुस्लिमांच्या आगमनानंतर भारतात खरोखरच मोठा फरक पडला असे मला वाटते. डाव्या इतिहासकारांच्या मते राज्यकर्ता कोणत्या धर्माचा आहे याने फार फरक पडत नाही; तर आर्थिक संरचना कोणती आहे, यामुळे मोठा फरक पडतो. उदा. गुप्त काळापासून क्रमाने सरंजामशाही वाढत गेली. तेंव्हा पासून मध्ययुग सुरू झाले, असे मानले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. एक तर सरंजामशाहीचे स्वरूप आणि भारतात ती नेमकी कुठे कुठे होती हा मोठाच वादग्रस्त प्रश्न आहे. पण आपण हे म्हणणे खरे धरून चालू. प्रश्न असा आहे की भारतीय समाजात गंभीर स्वरूपाचे बदल नेमके कशामुळे झाले ? बदलत्या आर्थिक संरचनेमुळे की मुस्लीम राज्यकर्त्यांमुळे ? मला वाटतं की बदलत्या आर्थिक संरचनेमुळे समाज बदलत असला तरी त्याचं 'स्वत्व' टिकून राहतं. परंपरेचं सातत्यही टिकून राहतं. मात्र मुस्लीम राज्यकर्त्यांनी भारताचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश अशा सांस्कृतिक टापुचा विचार केला; तर या इस्लामीकरणाच्या प्रयत्नात त्यांना सुमारे 35% टक्के तरी यश आले. एवढी मोठी प्रजा मुस्लीम होणं हे काही कमी यश आहे असं मी मानत नाही. मुस्लीमांच्या पूर्वीही भारतावर कित्येक टोळ्यांची आक्रमणे झाली आहेत. पण त्या आक्रमणांचे स्वरूप वेगळे होते. भारतातल्या बहुविध धर्मात ते समाविष्ट झाले. हिंदु नावाचा एक धर्म इथं कधीच नव्हता. प्रत्येक टोळी/जात यांचा स्वतंत्र धर्म नि देवता होत्या. काळाच्या ओघात लोक एकमेकांच्या परंपरा नि देवता स्वीकारत गेले. याला मी हिंदुकरणाची प्रक्रिया असं म्हणेन. बाहेरून आलेले आक्रमकही या प्रक्रियेचा एक भाग बनले. मात्र इस्लामचे आक्रमण याला अपवाद होते. इस्लाम हाच एकमेव खरा धर्म अशी त्यांची धारणा असल्याने खोटे धर्म (जसे की हिंदु वगैरे) नष्ट करणे त्यांना कर्तव्य वाटत होते.

धर्म ही संपूर्ण मानवी जीवन व्यापणारी गोष्ट असते. त्यामुळे धर्मपरिवर्तन ही गोष्ट आर्थिक संरचनेतील बदलांपेक्षा किती तरी मूलगामी गोष्ट आहे. खरा प्रश्न भारतीय धर्म आणि सेमेटिक धर्म (मुख्यत: इस्लाम व ख्रिस्ती) यातील फरक ओळखण्याचा आहे. थापर यांनी या भाषणात हिंदुत्ववादी विचारांचेही विश्‍लेषण केले आहे. परंतु ते फार ढोबळ रीतीने केले आहे. उदा. सावरकर नि संघ यात घोळ घातलेला आहे. त्यांच्या या विश्‍लेषणातून फक्त एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी सावरकर वाचलेला नाही.

शेवटी त्यांच्या एका निरिक्षणांविषयी लिहून मी आपल्या प्रतिक्रियेला विराम देतो. एक निरिक्षण त्यांनी अचुक नोंदवले आहे, ते म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी हिंदु धर्माचे सेमेटिकीकरण चालवले आहे. हा आरोप बहुतांश हिंदुत्ववादी गटांवर करता येण्यासारखा आहे. हिंदुंच्या सेमेटिकीकरणावर त्यांनी रास्त चिंताही व्यक्त केली आहे. पण यातील धक्कादायक भाग असा की जे धर्म खरोखरच सेमेटिक आहेत, त्यांच्याविषयी त्यांना नि इतरही बहुतांश पुरोगाम्यांना काहीही चिंता वाटत नाही...

या लेखामधील काही भाग आधी प्रकाशित झाला आहे.

लेखक इतिहासाचे प्राध्यापक आहेत. 

Web Title: Article regarding Romila Thapar