esakal | ऑन एअर : सं'वाद'
sakal

बोलून बातमी शोधा

Communication

मी बरोबर, तू चूक. आमचं खरं, त्यांचं खोटं.... माझं खुलं आव्हान आहे, कुठल्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून दाखवा. नुसतं दोन्ही मतप्रवाहांच्या लोकांना एकत्र बसवून दोघांना बोलायला लावा असं नाही तर एकमेकांचं ऐकून घेऊन, समोरच्याचे मुद्दे समजून घेऊन स्वतःच्या मतांमध्ये सुधारणा करणं, विचारांची देवाणघेवाण करणं वगैरेवाली चर्चा. नाही जमणार! घरात नाही, चौकात नाही, सभेत नाही, टीव्ही आणि सोशल मीडियावर तर बिलकूल नाही.

ऑन एअर : सं'वाद'

sakal_logo
By
आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम.

मी बरोबर, तू चूक. आमचं खरं, त्यांचं खोटं.... माझं खुलं आव्हान आहे, कुठल्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून दाखवा. नुसतं दोन्ही मतप्रवाहांच्या लोकांना एकत्र बसवून दोघांना बोलायला लावा असं नाही तर एकमेकांचं ऐकून घेऊन, समोरच्याचे मुद्दे समजून घेऊन स्वतःच्या मतांमध्ये सुधारणा करणं, विचारांची देवाणघेवाण करणं वगैरेवाली चर्चा. नाही जमणार! घरात नाही, चौकात नाही, सभेत नाही, टीव्ही आणि सोशल मीडियावर तर बिलकूल नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्लॅक्स विरुद्ध व्हाइट्‍स; जात विरुद्ध जात विरुद्ध पोटजात. शेजारी विरुद्ध शेजारी, आजची पिढी विरुद्ध आधीची पिढी विरुद्ध पुढची पिढी आदी. आपला आपल्यातच संवाद होत नाही, तर भारत-पाक शांतता, मैत्री बित्री, इस्राईल आणि पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सोडूनच द्या. कोण बरोबर? कोण चुकीचं? आपण आपली भूमिका ठरवतो, आपलं मत बनवतो म्हणजे नेमकं काय करतो? कसं करतो?

‘लोकांना फार अक्कल नसते, त्यांना नाही समजणार’ असं म्हणून काही जण संवाद सोडून देतात. माझं खरं कारण मी शहाणा आणि बाकी मूर्ख म्हणून चालणार नाही. कारण प्रचंड हुशार मंडळींचंही महत्त्वाच्या विषयांवर एकमत होत नाही. सगळ्यांचं (दोघांचं) थोडं बरोबर आणि थोडं चूक असतं, असं म्हणून आपण मध्यस्थी करायला बघतो- कारण आपल्याला संघर्ष नको वाटतो. परंतु थोडं म्हणजे किती? फिफ्टी फिफ्टी? का सेवंटी-थर्टी? आणि याचा नेमका फॉर्म्युला काय? 

‘प्रत्येकाचं लॉजिक वेगळं असतं’ असं म्हणून काही लोक सोडून देतात. मात्र, असं कसं होऊ शकतं? जे सत्य आहे ते सत्य असणारच, तुमचं लॉजिक तिथपर्यंत पोचो किंवा न पोचो. दोन परस्परविरोधी भूमिका या एकाच वेळी एकाच संदर्भात बरोबर कशा असतील? पूर्ण सत्य नाही; पण सत्याच्या अधिक जवळ असलेली कुठली तरी एक भूमिका असणारच की. ती कुठली ते कसं ठरवायचं?

या सगळ्यात फेसबुकवर पटापट दोन ओळींत आपलं मत मांडायला आपण लागलो आहे. हे मत बनवण्यासाठीचा अभ्यासही सोशल मीडिया आणि टीव्हीवरच होतो, इतरांच्या चार ओळी वाचून किंवा बघून. अगदीच महत्त्वाचा विषय असेल, तर ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’ आहेच.

‘आम्हाला असं वाटतं, आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, आमचा अनुभव आहे, आमचा अभ्यास आहे, आमच्याकडे पुरावा आहे, म्हणून आमचं खरं’ यापैकी कोण बरोबर असावं? पु. ल. देशपांडे यांच्या डी. बी. जोशी या पात्राला सगळ्यांची मतं पटतात. म्हणून तो कोणालाही मत न देता जो निवडून येईल त्या पुढाऱ्याच्या सत्कार समारंभात पुढच्या रांगेत जाऊन बसत असे. असा तटस्थपणा आज आपल्याला जमू शकतो का? आणि मुळात तसं असणं शक्य आणि योग्य आहे का?

हे सगळे वादच नसावेत असं म्हणणं म्हणजे फँटसीमध्ये जगणं. कारण हा सगळा संघर्ष म्हणजे उत्क्रांती आणि इतिहास यांचा आपल्या मेंदूवरती झालेला बायप्रॉडक्ट आहे. याचा अर्थ हेच वाद घालण्याची पातळी आपण वाढवू शकत नाही असं नाही; पण त्यासाठी आधी आपण आपली भूमिका नेमकी ठरवतो कशी (का आपल्यासाठी ठरवली जाते?) यावरचं सगळं संशोधन - सायकोलॉजी, न्यूरो सायन्स, इव्होलुशनरी मोरॅलिटी, हुरीस्टिक्स आणि कॉग्निटिव्ह बायस इत्यादी बघू या. एखाद्या व्यक्तीबद्दल, सामाजिक गटाबद्दल, सरकारी धोरणाबद्दल, घटनेबद्दल आपल्याला जे वाटतं, ते तसं का वाटतं याचा शोध घेऊया, आणि मग...
आणि मग काय? मग वाद घालू या. मजा येईल!

Edited By - Prashant Patil

loading image