ऑन एअर : ज्याची त्याची ‘खाद्य’दृष्टी

ऑन एअर : ज्याची त्याची ‘खाद्य’दृष्टी

खाण्याच्या पदार्थात तुम्हाला सगळ्यात न आवडणारा प्रकार काय वाटतो? बुद्धिप्रामाण्यवाद, राजकीय संवाद, हे सोडून मी अचानक या सदरचा विषय बदलत नाहीये. या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. माझे रेडिओ कार्यक्रम तुम्ही ऐकले असतील किंवा माझा फोटो बघितला असेल, तर मला खायला किती आवडतं (आणि किती खायला आवडतं) हे तुम्हाला माहीत असेल. माणूस सोडून सगळं खाणारा माणूस, अशी माझी ओळख आहे. नातेवाईक, मित्र, अगदी श्रोतेसुद्धा मला आग्रहाने जेवायला बोलावतात. शाकाहारी लोक कधी माफीच्या सुरात, तर कधी आव्हानात्मक प्रस्तावना करतात, ‘‘...पण आमच्याकडे नॉनव्हेज नाही मिळणार बरं का!’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकदा का या वाघाला रक्ताची चटक लागली, की हा कसला वरणभात खाणार, अशी त्यांची समजूत असावी... पण खरं तर मला शाकाहारी जेवण तितकंच आवडतं आणि तसंही माझ्या भवतालचं ट्रॉपिकल वातावरण आणि माझ्या आतला प्रचंड आळस, यामुळे रोज मांस खाण्याइतकी प्रोटिन्सची गरजच भासत नाही.

मी मनानं गरीब माणूस आहे. जे मिळेल आणि जितकं मिळेल ते मी सगळं एकत्र करून खातो. वाट्या वापरणं मी टाळतो, जे आपल्या वाट्याला येईल त्यात भेदभाव कशाला? त्यामुळे वरणभात, त्यावर चिकनचे तुकडे आणि थोडा रस्सा, थोडी बाजूला अंग चोरून बसलेली चपाती, चहू दिशेनं सात-आठ दह्याचे पाय फुटलेली कोशिंबीर...माझ्या ताटातला हा ‘वरणसंकर’रूपी ‘वर्णसंकर’ पाहून बायको जाम अस्वस्थ होते. मी हे सगळे अन्न आता कालवायला लागणार, या विचारानंच तिच्या पोटात कालवाकालव सुरू होते. मला चैनीचा वाटणारा नजारा इतरांच्या मनात मात्र वेगळे भाव निर्माण करतो.

शाकाहारी आणि मांसाहारी पब्लिकमध्ये काय फरक आहे? ‘शाका’वाले प्रेमळ, नम्र असतात; ‘मांसा’वाले आक्रमक असतात वगैरे ढोबळपणे म्हणणं चुकीचं आहे. मी स्वतः गेली ३९ वर्षं मांस खात आलोय; पण मारामारी वगैरे चालू झाली, की तिथून पळ काढण्यात मी नेहमी पहिला असतो. अशा वेळी हे सहा फूट एक इंच, एका क्विंटलपेक्षा अवजड धूड इतक्या चपळपणे कसं पळू शकतं, असा प्रश्न बघ्यांना पडतो. इतर समूह आपल्यापेक्षा आक्रमक आणि पर्यायानं असंस्कृत वाटणं, हा आपल्याला ‘प्रतिनिधित्व पूर्वग्रह’ यामुळे वाटतो; पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

शाकाहारी आणि मांसाहारी, यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे, शाकाहारी लोक आपल्याला एखादा शाकाहारी पदार्थ कसा अजिबात आवडत नाही, हे खूप अभिमानाने सांगतात आणि ऐकणारेसुद्धा तितक्याच कौतुकानं हे ऐकून घेतात. ‘कारल्याची भाजी (पडवळ, भरीत, शेपू इत्यादी ) मला अजिबात आवडत नाही बाबा,’ याला समोरचा हसत उत्तर देतो, ‘आमच्या बाबांनासुद्धा नाही आवडत. आई आणि मला मात्र खूप आवडतं. आम्ही तर दर गुरुवारी कारल्याचे सूप बनवतो. हा पण तुमचं जसं कारल्याचं तसं आमचं तोंडलीचं!’ दोघांनाही एकमेकांच्या भावना समजतात, पटतात. एकमेकांचे चॉइसेस विचित्र वाटत नाहीत.

मांसाहारी लोकांचं तसं नाहीये. ‘नॉनव्हेज’ या ‘मिनिमम कॉमन प्रोग्रॅम’खाली एकत्र येतात आणि मग कुठल्याही युती/आघाडीप्रमाणे एकमेकांच्या ‘त्या’ सवयींबद्दल विरोधी मत व्यक्त करतात. चिकन खाणाऱ्या लोकांना मटणाचे पीस बघवत नाहीत. मटणवाल्यांना पीसवाल्या पक्षांच्या पीसमध्ये मजा येत नाही. काहींना डुक्कर अजिबात चालत नाही, काहींना तो खूप आवडतो. काहींना तो वर्ज्य नाही; पण वासानंच कसंतरी होतं. काही लोक वेगवेगळ्या राज्यांत बीफ आणि पोर्कसुद्धा खातात. हे ऐकून इतर राज्यातले लोक त्यांना धर्माबाहेरच काय तर देशाबाहेर जायला सांगतात. चीनमध्ये लोक कुत्री खातात, याचा श्वानप्रेमी लोकांना प्रचंड राग येतो. दिसेल त्या कुत्र्याला ‘अरे हा ssssड!!’ असं म्हणणाऱ्या; पण मटणाची हाडं स्वतः चघळणाऱ्या नॉनव्हेजवाल्यालासुद्धा चिनी लोकांच्या या कुत्र्याच्या कृत्याचा संताप येतो.

आमचे पूर्वज घोरपड खायचे म्हणे. खरं असावं आणि म्हणूनच ती घोरपड झटपट आमच्या पूर्वजांपासून दूर पळायच्या नादात डोंगराचा कडा सर करायची. त्याच्याही आधीच्या अनेक ग्रंथांत अनेक प्राण्यांचे बळी, रेसिपी आणि पंगती, याचं वर्णन आहे. मी नॉर्थ ईस्टमध्ये रेशीमकिडे खाल्ले आहेत. साढळलेल्या बेबी कॉर्नसारखे लागतात; पण मलाही खाताना कसंतरीच वाटलं. इतर लोक चवीनं खात होते. आपल्याला एखाद्या पदार्थाची किळस यावी; पण दुसऱ्या हाडामांसाच्या व्यक्तीला तीच गोष्ट खूप आवडावी, हे काय आहे? आणि तिच्या या खाद्यसंस्कृती किंवा निवडीवरून आपण तिच्या नैतिकतेबद्दल, देशप्रेमाबद्दल आणि माणुसकीबद्दल जे तर्क लावतो, ते कितपत बरोबर आहेत? बघूया पुढच्या वेळी. तोपर्यंत ‘RJ Sangram’ हे माझं फेसबुक पेज शोधा आणि जेवणाचं आमंत्रण द्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com