कोलेस्टेरॉल कमी करताना...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ
आपण कोलेस्टेरॉल म्हणतो, तेव्हा आहारातील नव्हे तर रक्तातील कोलेस्टेरॉलबद्दल बोलत असतो. जीवनशैलीतील आहार आणि व्यायामासारखे घटक हृदयविकाराची जोखीम कमी करण्यामध्ये निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आता आपल्याकडे आधुनिक औषधे उपलब्ध आहेत. ती आपल्याला जीवनशैलीतील बदलांमधून आपण जेवढे कोलेस्टेरॉल कमी करू शकतो, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल कमी करू शकतात. आपल्यापैकी अनेक जण गोड पदार्थ खाणे वाईट आहे, यावर कोणताही वादविवाद करीत नाही, तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या उपचारांबाबतही आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्याबाबत वाद नसून, ते कमी करण्याच्या पद्धतींबद्दल वाद आहे. जीवनशैलीतील बदल आणि कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे एकमेकांना पूरक आहेत.

  कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपचार - 
  जीवनशैलीतील बदल - हृदयासाठी सुरक्षित पदार्थ खाणे,  
  नियमित व्यायाम करणे, धूम्रपान सोडणे, वजन कमी करणे आणि केवळ नियंत्रणामध्ये मद्यपान करणे या जीवनशैली बदलामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

  औषधे - कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. स्टॅटिन्स, फेनोफायब्रेट, pcsk9 इनहिबिटरस, नियासिन, इझेटीमिब इत्यादी औषधे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरली जातात.

स्टॅटिन्स शाप की वरदान?   
गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेटवर काही विपर्यस्त लेखांमध्ये स्टॅटिन्स ही औषधे शरीरास अतिशय अपायकारक आहेत, त्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, स्नायूंना सूज येणे, कर्करोग होणे इत्यादी दुष्परिणाम होतात, असे सांगितले जाते आहे. याचे नेमके वास्तव काय आहे ते समजावून घेऊयात. गेल्या २५ वर्षांपासून स्टॅटिन्स ही औषधे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दिली जात आहेत. शास्त्रीय प्रबंधांमध्ये साधारणपणे २४ वर्षांपासून स्टॅटिन्सविषयी माहिती आहे. आपल्या शरीरातील बहुतेक कोलेस्टेरॉल यकृतामध्ये बनवले जाते. आहारातून थोड्या कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल रक्तात येते. यकृतातील कोलेस्टेरॉल बनविण्याच्या प्रकियेला (डिनोवो सिन्थेसिस) स्टॅटिन्स प्रतिबंध करतात.

आपल्या शरीरातील पेशींना कोलेस्टेरॉलची आवश्यकता असल्यास आणि पुरेशा प्रमाणात कोलेस्टेरॉल बनविलेले नसल्यास रक्तप्रवाह किंवा धमन्यांमध्ये असलेल्या अतिरिक्त कोलेस्टेरॉलचा वापर होतो. पर्यायाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व औषधांना दुष्परिणाम असतात, अगदी हर्बल औषधांनादेखील. ते टाळून आपण सुरक्षितपणे कशी औषधे घ्यावीत, हे महत्त्वाचे आहे. दुष्परिणामांच्या भीतीने औषधे न घेणे हे अयोग्य आहे. काही शंका असल्यास औषधे थांबवण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी सखोल चर्चा करावी. स्टॅटिन्स ही बहुतांशी सुरक्षित औषधे आहेत. सर्वांत वारंवार आढळणारा दुष्परिणाम म्हणजे स्नायू दुखणे आणि स्नायूंना सूज येणे. मात्र, याचे प्रमाण स्टॅटिन्स मोठ्या डोसमध्ये दिले जातात तेव्हाच असते. अनेकदा डोस कमी केल्यास ही लक्षणे कमी होतात. इतर दुष्परिणाम अतिशय कमी प्रमाणात होतात आणि त्यांची वारंवारता पण खूप कमी आहे. स्मरणशक्ती कमी होणे, रक्तशर्करा वाढणे इत्यादी दुष्परिणाम अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. स्टॅटिन्सने होणारा फायदा पाहता त्याचे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rutuparn Shinde all is well sakal pune today