अँजिओग्राफीचे दुष्परिणाम आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ
बहुतेक दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) किरकोळ असतात. कॅथेटर 
नळी घातला जाणारा शरीराचा भाग थोडा काळानिळा पडू शकतो अथवा रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ होऊ शकते. कधीकधी डायची ऍलर्जी येऊ शकते. अँजिओग्राफीनंतर गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात पण ते दुर्मीळ आहेत. या प्रक्रियेदरम्यान काही लोकांना स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फ्रक्शन) होऊ शकतो. तसेच, क्वचितच, कॅथेटर हृदयाची (कोरोनरी) धमनी खराब करू शकतो. तीव्र हृदयरोग आहे अशा व्यक्तींना दुष्परिणाम होण्याचा जास्त धोका असतो. परंतु नीट विचार केल्यास अँजिओग्राफीमुळे होणारे फायदे तोट्यांपेक्षा जास्त आहेत. अँजिओग्राफी करण्याचा निर्णय हे आपले डॉक्टर सर्व गोष्टींचा विचार करून घेतात. तथापि, आपल्याला काही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांशी 
संपर्क साधा.

अँजिओग्राफीनंतर काय निष्कर्ष निघतात? 
अँजिओग्राफी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये काय दोष आहे ते डॉक्टरांना दर्शवते. आपल्या किती कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये कुठे अडथळे (ब्लॉकेजेस) आहेत ते आपल्याला दिसते. त्याचे प्रमाण म्हणजे टक्केवारी किती कळते. हे प्रमाण विविध बाजूंनी पाहिल्यास वेगवेगळे दिसू शकते. त्यावरही सरासरी धरून निष्कर्ष केले जातात. यामध्ये पर्सेंटेज हा एकमेव मुद्दा नसतो तर रुग्णाशी अवस्था, हृदयविकार आला आहे का नाही ते सुद्धा महत्त्वाचे असते. साधारणपणे तीन प्रकारचे निष्कर्ष असू शकतात. 
     ६० ते ७० टक्क्‍यांपेक्षा कमी अडथळा असल्यास साधारणपणे पुढे काही करावयाची गरज नसते. योग्य औषधोपचार आणि जीवनशैली बदलल्यास हृदयरोग नियंत्रणामध्ये येतो. 
    ७० टक्क्यांपेक्षा जास्त अडथळा असल्यास आपल्याला त्यावर उपचार म्हणजे अँजिओप्लास्टी  किंवा बायपास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. साधारणपणे ३ पर्यंत अडथळे असल्यास स्टेंट अँजिओप्लास्टीचा उपयोग होऊ शकतो. 
     खूप जास्त प्रमाणात आणि बरेच अडथळे असल्यास बायपास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. कधी-कधी हृदयाच्या प्रमुख (लेफ्ट मेन) रक्तवाहिनीमध्ये दोष असेल तर त्वरित बायपास करावी लागू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rutuparn Shinde all is well sakal pune today