आठवणींचं फुलपाखरू! (सखी गोखले)

सखी गोखले
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

सखी गोखले... लंडनमध्ये तिच्या भावविश्वात रमताना तिला भारताची कशी आठवण येतीय सांगतिये फक्त 'मैत्रीण'मध्ये!

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

लंडन कॉलिंग 

काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्‍सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्‍सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत. पण या शहराच्या अनेक ऐतिहासिक कहाण्याही आहेत. कॅरोल लेवीज्‌ आणि जे. आर. आर. टॉल्किननं या शहरात "ऍलेस इन वंडरलॅण्ड' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'सारख्या जगप्रसिद्ध गोष्टी लिहिल्या. "ऍलेस इन वंडरलॅण्ड' ही मी लहानपणी परत-परत वाचून काढलेल्या गोष्टींपैकी एक. त्या मोठ्या दगडी इमारतींकडं बघत मी शहराच्या गल्ल्यांमधून चालताना लहानपणी वाचलेल्या अनेक गोष्टी आठवल्या. या आठवणी काढताना ठळकपणे आठवली चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकरांनी लिहिलेली प्रसिद्ध हास्यचित्र मालिका "चिंटू'. 

"चिंटू'चा साधा उल्लेख झाल्यास अजूनही खुदकन्‌ हसू येते. चिंटूचे किस्से आठवत आणि गालातल्या गालात हसत मी ऑक्‍सफर्डचा इतिहास वाचण्यात मग्न झाले, पण सतत मनाच्या एका कोपऱ्यातल्या दारावर कोणीतरी ठोका देत होता. माझं वाचन थांबवून मी ते दार उघडलं. दोन छोट्या वेण्या, लाल फ्रॉक घातलेली गोरीपान मुलगी दिसली. नाव विचारलं तर म्हणाली, ऍलेस. "हे तेच दार ना?' असं विचारल्यावर मी नुसतीच मान डोलवली, ती मात्र तुरूतुरू आत आली. बराच वेळ कोपऱ्यात बसून राहिली. मी कंटाळून विचारलं, "कोणाची वाट पाहतेस?' तर म्हणाली, "चिंटूची'. 
"काय? तुम्ही मित्र आहात?' 
"हो' 
"कसं शक्‍यय?' 
"सध्यातरी तूच घडवून आणतीयेस.' 
नकळत मला खुदकन्‌ हसू आलं, ऍलेस आणि चिंटू मित्र असते तर? काय मजा आली असती. ऍलेस आणि चिंटूनं जोशी काकूंच्या बागेतल्या कैऱ्यांवर डल्ला मारला असता, चिंटूच्या आईनं ऍलेसला आवडीनं थालीपीठं खाऊ घातली असती...दोघंही अगदी वेगळ्या पार्श्‍वभूमीचे, पण एकत्र मिळून त्यांनी किती भिन्न प्रकारचे साहसी प्रवास केले असते.

हसत माझ्या मनाचं दार बंद करून मी वेगळ्या दारातून आत डोकावले. माझा लहानपणीचा मित्र, छोटा चिरू हाफ पॅन्ट आणि बनियनमध्ये दिसला. मला बघून हातानं इशारे करत जवळ बोलवू लागला. चिरू हा माझ्या लहानपणीचा सगळ्यात जवळचा मित्र. बाबा चिरूचे खूप लाड करायचा म्हणून तो सतत आमच्या घरी पडीक असायचा! आमच्या घरी डिनरला सूप तर कधी ऑम्लेट असतं, याचं चिरूला खूप अप्रूप वाटायचं, त्याच्या घरच्या सांबार भाताच्या रुटीनला तो कंटाळायचा. माझ्याबरोबर चिरूही जेवायचा आणि घरी कळू नये म्हणून स्वतःच्या घरी दुसऱ्यांदा जेवायचा! तो तमीळ होता आणि आम्ही एकमेकांशी हिंदीत बोलायचो. माझ्या बालपणीच्या अल्बममधील नव्वद टक्के फोटोंमध्ये चिरू आहेच. आम्ही दिवसरात्र खेळायचो, सतत जिन्यात उभं राहून गहन चर्चा करायचो. मी पडले, मला लागलं किंवा कोणाशी भांडण झालं की चिरू कायम समजूत काढायचा.

मोठी झाल्यावर मी शिक्षणासाठी दूर गेले, मग कॉलेजच्या काळात त्यांनी घर बदललं. जवळच्या इमारतीत राहतात ते, पण ठरवून भेट कधीच होत नाही. दर वेळी आम्ही ठरवून भेटायचं ठरवतो आणि कधीच भेटत नाही. 
कधी कधी मनाची दारं उघडताना, "ही बंद कधी केली,' असा प्रश्‍न पडतो. अधूनमधून धूळ बसू नये म्हणून का होईना, त्या दारातून ऍलेससारखा एक साहसी प्रवास करावा आणि चिंटूला शोधत चिरूची भेट व्हावी आणि त्याच्या सायकलवर डबल सीट बसून गल्लीची एक सफर करावी असं वाटतं. लहानपणी घर असतं, त्याला दारं-खिडक्‍या असतात, इमारत असते, त्याला एक वॉचमन असतो, शेजारी एक चिरू असतो आणि त्याची एक सखी असते, असं वाटायचं. पण बघता-बघता ते "असणं' निसटून जातं आणि मग दूर देशामधल्या एका शहरामध्ये फिरताना त्या आठवणींचं फुलपाखरू त्या पुरातन इमारतीत दगडावर येऊन विसावतं... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Sakhee Gokhale in Maitrin supplement of Sakal Pune Today