झिरो (फिगर)

झिरो (फिगर)

लंडन कॉलिंग
मी  गेले बरेच दिवस एका डाएटवर आहे. खरंतर गेली अनेक वर्षं डाएटवरच आहे. माझं निम्मं वय स्वतःला आणि स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करण्यात मी घालवलीयेत. माझं वजन पहिल्यांदा वाढलं, तेव्हा आई आणि मी नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा मी चौथीत होते. दौऱ्यावर जायच्या आधी मी हडकुळी होते. भारतात त्या काळी न मिळणारे विविध प्रकारचे पदार्थ मी अमेरिकेत खाल्ले. माझं वजन इतकं वाढलं, की आम्हाला कपड्यांची नव्यानं खरेदी करावी लागली. कारण, माझ्या जुन्या कपड्यांमध्ये मी मावतच नव्हते. 

त्या वयात मला पहिल्यांदा मी जाड असण्याची जाणीव झाली. माझ्या बोर्डिंग स्कूलमध्ये आम्ही खूप खेळ खेळायचो. सकाळी पीटी असायची, मी फुटबॉल आणि बास्केटबॉल टीममध्येही होते, शारीरिक शिक्षणामध्ये माझं विशेष प्रावीण्य होतं. खरंतर तेव्हा मी फीट होते, पण तरीही माझं पोट पूर्णपणे सपाट नाहीये, याची खंत वाटत राहिली. कॉलेजच्या पहिल्या दिवशी शहरातल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींकडं बघून मी थक्क झाले. सिनेमात दाखवतात तशाच होत्या त्या सगळ्या. नाजूक, बारीक, महागडे कपडे, ब्रॅण्डेड बॅगा, सरळ केस आणि रोज नवीन रेस्टॉरंटला जाऊन खाणाऱ्या मुली. माझी मैदानात खेळून टॅन झालेली कांती, अंग पूर्णपणे झाकणारा ढगळा टी-शर्ट आणि भीतीशी लढत मी पुढची २ वर्षं काढली. मला काही खूप जवळचे मित्र मिळाले, पण त्या काळात परवडणाऱ्या मॅक डोनल्ड्‌स आणि ‘सब-वे’ने पुन्हा एकदा माझं वजन वाढलं. मग अजून ढगळे कपडे, न आवडणारा व्यायाम आणि डाएट. पुढील शिक्षणाच्या काळातही तेच चक्र सुरू होतं. मी सतत जाड आहे म्हणून अविरत डाएट आजमावू लागले. शेवटी एकदाचं एक असं डाएट केलं, ज्यानं माझं वजन १२ किलोनं कमी झालं. पण, ते शक्‍य होतं, कारण आई सगळ्यांची काळजी घ्यायची. अगदी माझे डबे बनविण्यापासून ते डब्ब्यांवर लेबल लावण्यापर्यंत... 

मी इतकी बारीक कधीच झाले नव्हते, माझा आनंद आभाळ गाठत होता. आता माझ्या आयुष्यातले प्रश्‍न सुटले, आता मी स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करणारी व्यक्ती झाले आणि आता मी काहीही करू शकेन, या आविर्भावात मी पुढचा एक महिना मजेत घालवला. दुसऱ्या महिन्यापासून एक-एक किलो करत परत माझं वजन वाढू लागलं, परत तेच सगळं, परत स्वतःचा द्वेष, सतत स्वतःवर राग.

माझ्या लहानपणापासून मी बघत आलेय, की सिनेमामधून, टीव्हीवर किंवा आता इंटरनेटवरची सगळी स्त्री पात्रं या बारीक आणि अत्यंत आकर्षक होत्या. पण हे कोणी आणि कधी ठरवलं? मी अशाच स्त्रिया पाहिल्यात, मोठं होत असताना किंवा अजूनही. सगळ्यांची दुधासारखी त्वचा आणि हातात मावेल इतकी कंबर. जाहिरातींतून दिसणाऱ्या आयासुद्धा माझ्याहून लहान आणि बारीक दिसतात. कोणाच्या नजरेतून बघतो आपण या स्त्रियांकडं? मला माझ्यासारखं शरीर असलेली कुठलीच स्त्री मुख्य भूमिकेमध्ये किंवा मासिकाच्या कव्हरवर किंवा मिस इंडिया जिंकताना दिसली नाही, माझ्यासारख्या शरीराचं कुठंच प्रतिनिधित्व नाही. म्हणजे माझ्यातच दोष असावा...

(क्रमशः) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com