भेटू लवकरच... (सखी गोखले) 

सखी गोखले 
सोमवार, 8 एप्रिल 2019

सखी भारतात येतीय... सुटी एन्जॉय करायला.. आणि मागतेय एका महिन्याची आपल्यातून रजा.. द्यायची का? वाचा सखीचा हा लेख...

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

लंडन कॉलिंग 

कधी असं झालंय का? की, पोटातले गोळे पाखरं होऊन अगदी डोक्‍यात भरभर उडत असल्यासारखं वाटतं? छातीतील धडधड आणि चेहऱ्यावरचं न पुसता येणारं हसू घेऊन पहाटे साडेपाच वाजता मी घरून विमानतळावर निघालेय! तुम्ही हा लेख वाचाल तोवर मी खरंतर तुमच्या शेजारच्या शहरात किंवा गाडीत किंवा हॉटेलमध्ये असेन. मी भारतात येतेय! आनंदाने उड्या मारत मी विमानात बसतेय. साडेनऊ तास आता खूप वाटू लागलेयत. लहानपणी रॉकेटने प्रवास करण्याच्या बाता करायचो माझे मित्र आणि मी, ते स्वप्न या क्षणी पूर्ण होऊ शकतं का? 

आईच्या हातची चिंच-गुळाची आमटी माझी वाट पाहतीय! शाळेत असल्यासारखं वाटतंय, सुटीत काय आणि किती करू, कोणाला भेटू, काय खाऊ, घरी थांबून लोळत टीव्ही बघू का?, का एखाद्या बीच किंवा ट्रेकला जाऊ? सरदारची पाव भाजी आणि मरिन ड्राईव्हवर कुल्फी खायचं तर मी ठरवलंच आहे. शिवाजी मंदिराखालच्या चाटच्या दुकानात एक अख्खं जेवण करणारेय मी. मिठीबाई कॉलेज समोरचा शेजवान डोसा खाऊ का अनहेल्दी खाण्याचा कळस असलेलं मेयॉनीज सॅण्डवीच? खरंतर हे सगळं करायला मला कितपत वेळ असणार आहे, हे मला माहीत नाही.

माझं आयुष्य एक महत्त्वाचं आणि मोठ्ठं वळण घेणारं आहे, तुम्हाला कळेलच. त्या बद्दल लिहिणारच, पण या महिन्यात मला थोडी सुटी हवीय. घरच्यांबरोबर वेळ घालवायचाय, मेंदू आणि शरीराला आराम द्यायचा आहे. तेव्हा एका महिन्यात भेटू, तोवर पुण्यामुंबईत अत्यंत उत्साहाने रूपालीचे डोसे किंवा रिक्षातून डोकं बाहेर काढून "एनआरआय फील' घेणारी मी दिसलेच तर "हॅलो' नक्की म्हणा! 
"तोपर्यंत गुडबाय'! 

Web Title: Article by Sakhee Gokhale in Miatrin Supplement of Sakal Pune Today