मोदींच्या नेहरूद्वेषास कारण की...

Narendra-Modi
Narendra-Modi

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० मिनिटांच्या भाषणात तब्बल २३ वेळा नेहरूंचा उल्लेख केला. मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेताही त्यांच्याविषयी अनेक वाग्बाण का सोडले? या सर्व बाबींचा विचार करता मोदी यांना काही विकार जडला आहे का आणि त्याचा संबंध नेहरूंचे नाव घेण्याशी आहे का, असे प्रश्न पडू लागले आहेत.

वरील तिन्ही प्रश्नांचे उत्तर नाही, असे ठळकपणे आहे. गेली अनेक वर्षे त्यांची वाटचाल याच पद्धतीने सुरू आहे. अनेक सोशल मीडिया यूजर मोदींकडून काही चूक झाल्यास बहुधा ही नेहरूंची चूक असावी, असा टोला मारतात. यातून त्यांना आनंद मिळत असेल; परंतु मोदींना फरक पडत नाही. जेवढ्या जास्त वेळा ते नेहरूंचे नाव घेतात, तेवढ्या वेळा त्यांचा फायदाच होत आहे. 

मोदी आणि नेहरू यांच्या संबंधाने तीन प्रश्नांमध्ये चौथ्या प्रश्नाचा समावेशही करता आला असता; परंतु तो मी जाणीवपूर्वक टाळला, कारण संपूर्ण चर्चेत तो अगदी लवकर येईल. पुढे तो समाविष्ट करता येईल. 

सहजपणे साधलेला संवाद, निवडणूक प्रचारातील भाषण अथवा संसदेतील चर्चा यांत मोदींनी केलेली विधाने तपासा. या सर्वांमध्ये एक समान धागा नेहरूंचा दिसेल. या वेळी मोदींनी २३ वेळी नेहरूंचा उल्लेख केला; मात्र त्यांनी २०१४ पासून किमान हजारो वेळा नेहरूंचा उल्लेख केला असल्यास, आश्‍चर्य वाटणार नाही. 

कर्नाटकातील निवडणूक प्रचार मोहिमेत नेहरूंना ओढण्याचे कामही मोदींनी केले. कूर्ग येथील असलेले तत्कालीन लष्करप्रमुख के. एस. थिमय्या (१९५७-६१) यांचा अपमान नेहरूंनी केला होता, असा आरोप मोदींनी केला. मोदींना तुम्ही नेहरूंच्या नावाने टोमणा मारता त्या वेळी ते फारसे लक्ष देत नाहीत. माझ्या मते, त्यांना हे पटत असावे.

भारतात जे काही चुकीचे घडले आहे आणि घडत आहे ः काश्‍मीर ते चीन ते सार्वजनिक क्षेत्रातील बेरोजगारी, हे सर्व नेहरूंच्या चुकीमुळे घडत असावे, असा त्यांचा विश्वास आहे. येथे मी काही उपहास केलेला नाही. 

मोदी-शहा यांचा भाजप समजून घेताना आम्ही पारंपरिक पठडीचे विश्‍लेषक सर्वांत मोठी चूक करतो ती म्हणजे, जुने माहितीचे संदर्भ, तसेच जुने आयाम यांचा वापर करतो. मोदी-शहा यांचा भाजप हा एकाच प्रकारचा नसून, तो जिवंत वस्तू आहे. भाजप, जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांतील कोणाचेही तुम्ही नाव घ्या. अटलबिहारी वाजपेयी, एल. के. अडवानी यांच्या काळात आपण पाहिले तो अपवाद होता. जुन्या भारतीय राजकारणाप्रमाणे ते जुन्या आयामामध्ये काम करीत होते. या जुन्या आयामाला वाजपेयी हे सर्वसमावेशक आणि उदारमतवादी म्हणायचे. मोदी आणि शहा ज्या परंपरेतून आले आहेत, तेथे या आयामाचा उल्लेख नेहरूवाद व्हायचा. 

नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या पिढीतील भाजप नेते इंग्रजी न बोलणाऱ्या, बिगर-पश्‍चिमी शैक्षणिक वातावरणातून आले आहेत, हे मान्य करावे लागेल. त्यांचे सर्व धर्मश्रद्धेवर अवलंबून आहे. याचमुळे मोदी हे नेहरू यांचा एकाच भाषणात २३ वेळा उल्लेख करतात, त्या वेळी ते खोटे बोलत नसतात. ते त्यांच्या हृदयातून आलेले असते.

मोदी यांनी नेहरूंकडे रोख वळविण्यासाठी हा महत्त्वाचा आहे. मागील काही आठवड्यांत तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले आणि त्यातून जुनेच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यातील अलीकडचे, ‘व्ही. पी. मेनन, द अनसंग आर्किटेक्‍ट ऑफ मॉडर्न इंडिया’ या नारायणी बसू यांनी लिहिलेल्या पुस्तकात, नेहरू यांनी पटेल यांना पहिल्या मंत्रिमंडळातून वगळले होते, असे अनेक दस्तावेजांच्या साहाय्याने मांडण्यात आले आहे. मेनन यांनी माउंटबॅटन यांना कळविल्यानंतर त्यांचा समावेश करण्यात आला, असे  एम. जे. अकबर यांनी दशकभरापूर्वी लिहिलेल्या ‘नेहरू - द मेकिंग ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हटले होते. आता ‘गांधीज्‌ हिंदुईझम - द स्ट्रगल अगेन्स्ट जीनाज्‌ इस्लाम’ या त्यांच्या ताज्या पुस्तकात त्यांनी हाच मुद्दा पुन्हा मांडला असून, याला पुरेसे दस्तावेज आणि संशोधनाची जोड दिली आहे. 

याचबरोबर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्ही. के. कृष्ण मेनन यांचे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले आहे. यात अनेक वेळा नेहरू हे राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरी-लष्करी संबंधांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर तातडीने निर्णय न घेणारे कल्पनाविलासी ठरतात. या पंधरवड्यात नेहरू आणि त्यांचा कालखंड याची अनेक रूपे नव्याने समोर आली आहेत. हे मोदींनी टाळणे शक्‍य नव्हते. 

मोदींकडून कायम नेहरूंचे नाव घेण्यामागे एवढेच कारण आहे का? ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरूंच्या काळातील त्रुटी आणि अन्याय पाहण्याचा सोस आहे का? एक गोष्ट स्पष्ट आहे, की मोदी आणि शहा हे केवळ जनभावनेच्या आधारावर वाटचाल करणारे नाहीत. तसेच, ते बौद्धिक वादविवाद आणि राजकारणातील अनुनय करण्यासाठी जुने मुद्दे उकरून काढणारेही नाहीत. 

आता येथे आपल्याला चौथ्या प्रश्नाकडे वळावे लागेल. मोदींच्या राजकीय संदेशात २०१४ पासून कायम राहिलेली गोष्ट शोधावी लागेल. पहिली म्हणजे, नेहरू-गांधी घराण्यातील इतर सदस्यांना ते लक्ष्य करीत नाहीत. ते राजीव गांधींकडे दुर्लक्ष करतात. याचबरोबर इंदिरा गांधी यांच्यावर टीका करताना ते कायम काळजी घेतात. आणीबाणीचा उल्लेख ते नेहमी करीत नाहीत; परंतु इंदिरा गांधींचा उल्लेख करण्याबाबत ते कशा प्रकारे काळजी घेतात हे पाहावे लागेल. 

यामागील कारण सहजपणे पाहिल्यास ते राजकीय दिसते. नेहरू-गांधींपैकी इंदिरा गांधी अजूनही जनतेत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर १, अकबर रस्ता हे निवासस्थान स्मारक बनविण्यात आले. आजही देशाच्या कोनाकोपऱ्यांतून नागरिक तेथे येतात. मला वाटणारे आणखी एक कारण म्हणजे, त्यांची पक्ष आणि सरकारवरील पकड, आंतरराष्ट्रीय दबदबा आणि पाकिस्तानचे विभाजन या बाबी पाहता मोदी त्यांना मानत असावेत. यामुळे मोदी नेहरू-गांधी परिवारातील केवळ या एका सदस्याच्या नादी लागत नाहीत. 

आता चौथा प्रश्न पाहू. मोदी केवळ नेहरूंवर टीका का करतात? एका पातळीवर यात केवळ राजकारण दिसते. काँग्रेस घराणेशाहीवर टिकून आहे, हा त्यांचा विश्वास आहे. घराणेशाही काढून टाकल्यास गांधी कुटुंबाच्या हाती फार काही राहणार नाही. इतर नेत्यांना दुसऱ्या मार्गाने हाताळता येईल. याच प्रक्रियेत ते त्यांची जागा मोकळी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मानणाऱ्या आणि देशाला नेहरूंच्या अशोकाकडून कौटिल्याकडे नेणाऱ्या वारसदाराला जागा करून देतात.
(अनुवाद - संजय जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com