गौरवशाली भारतीय परंपरा

Balak-Palak
Balak-Palak

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
माझ्या प्रिय मुला, 
मोठं होत असताना, जगात वावरत असताना तुला कितीतरी प्रश्‍न पडतील. साऱ्याच प्रश्‍नांची उत्तरं तुला माहिती असावीत, असं मी म्हणणार नाही. ते शक्‍यच नसतं... बरीचशी उत्तरं आपली आपणच शोधायची असतात. तरीसुद्धा काही महत्त्वाच्या प्रश्‍नांसंदर्भात, काही महत्त्वाच्या विषयांवर तुला थोडीबहुत माहिती असेल तर ती तुला नक्कीच उपयुक्त ठरेल. मी तोच प्रयत्न करतो आहे. सांग बरं, स्त्री श्रेष्ठ की पुरुष? हा प्रश्‍न महत्त्वाचा का - तर आपल्याकडे अनेकदा स्त्रियांना कमी लेखलं जातं. भेदभाव केला जातो. तुझ्याकडून तो होऊ नये. आता परिस्थिती खूप बदलली आहे- पण पूर्वी स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल असंच समाजानं ठरवलं होतं. कित्येक वर्षं स्त्रियांना शिकण्याचीसुद्धा बंदी होती. स्त्रियांवर खूप अन्याय केला गेलाय. स्त्रियांना अबला म्हटलं जात असे. स्त्री अबला कशी? तुलाही माहिती आहेच मातृत्व, अपत्यजन्म बाळाचं संगोपन- हे सारं किती अवघड असतं. निसर्गानं एवढी मोठी जबाबदारी स्त्रीवर सोपवली ते ती सशक्त असते म्हणूनच! 

एक लक्षात ठेव - जगातला सर्वांत बलवान पुरुष असो की सर्वांत बुद्धिमान पुरुष असो - त्याला जन्म देणारी स्त्रीच असते. आपण अन्नाशिवाय जगू शकतो का? मानवाच्या प्रगतीत आणि संस्कृतीत स्त्रीचा मोलाचा वाटा आहे. पण बाळा हेही लक्षात ठेव, स्त्री - पुरुष समान असले, तरी सारखे नसतात. म्हणूनच ते एकमेकांना पूरक असतात- म्हणूनच ते एकमेकांशिवाय अधुरे असतात. मी वर विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर आता मिळालं असेल तुला! 

मागे एका पत्रात मी ‘मेरा भारत महान’ हा उल्लेख केला होता. तो महान आहेच, असंही म्हटलं होतं. हो तो तसा आहेच; पण का महान आहे, हे तुला सांगावंसं वाटतं आहे. कारण, स्वतःच्या देशाबद्दल अभिमान जरूर असावा, पण तो डोळस असावा. आपल्या देशाचा इतिहास माहिती असावा. खरं तर आपल्या देशाची महानता - एखाद्या पत्रात मावणारी नाही. तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी तुला माहिती असायला हव्यात. सर्वांत पहिली गोष्ट- आपल्या देशाची प्राचीन संस्कृती. इसवीसन पूर्व पाच हजार वर्षांचा इतिहास आहे आपल्या देशाला. तुला माहितीच आहे, ‘प्रिय बंधू भगिनींनो’ या दोनच शब्दांनी स्वामी विवेकानंदांनी शिकागोची धर्मपरिषद जिंकली होती. आजही बराक ओबामांसारखे (माजी) अमेरिकन अध्यक्ष महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीचा आदर करतात. आपला एकमेव देश आहे, ज्या देशात सर्व धर्मांना आपण समान आदर देतो. तुला आश्‍चर्य वाटेल आपल्या देशात सर्व बोलीभाषा धरून एकूण १६५२ भाषा बोलल्या जातात... विविधतेतून एकता हा आपला जगाला संदेश आहे. विश्वबंधुत्व हीच भारताची शिकवण आहे. रामायण, महाभारतासारखे ग्रंथ सर्व जगात श्रेष्ठ मानले जातात. योगशास्त्र ही तर आपली जगाला देणगीच आहे. शिवाय भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यकला, शिल्पकला! पण हेही लक्षात ठेव - शून्य ही संकल्पना हीसुद्धा जगाला भारताची देणगी आहे. तशीच आयुर्वेदातही. सुश्रूत हा जगातील पहिला शल्यचिकित्सक मानला जातो. भास्कराचार्य, आर्यभट्ट, वागभट्ट, मिहिराचार्य यांसारखे थोर गणिती, खगोलशास्त्रज्ञ भारतात होऊन गेले आणि हो- जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश - आता अणुविज्ञान, उपग्रह प्रक्षेपण, अंतराळ संशोधन डिजिटलायजेशन- साऱ्याच क्षेत्रांत प्रगती करतो आहे... आहेच भारत महान! 
तुझा लाडका बाबा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com