शिकलेलं स्मरणात राहण्यासाठी...

शिवराज गोर्ले
शनिवार, 13 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
अभ्यास हा योग्य पद्धतीनं केला, तरच त्याचा उपयोग होतो. काही मुलं फक्त पुन:पुन्हा धडे मोठ्यानं वाचतात. हा अभ्यास नव्हे... आपण काय वाचलं, त्याचं सिंहावलोकन हवं, म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट ही अवस्था होत नाही. झालेल्या अभ्यासाशी मन संपर्कात राहतं. अभ्यासातलं उजळणीचं महत्त्व तर वादातीत आहे.

अभ्यासात एक महत्त्वाचा भाग असतो स्मरणाचा! स्मरण वाढवायचं कसं? आकलन, सुसंगती आणि वर्गीकरण, यांचा वापर काढून स्मरण वाढवता येतं. आपल्या पूर्वीच्या माहितीशी किंवा ज्ञानाशी संबंध जुळवून त्याच्याशी मेळ घातला, तुलनात्मक प्रक्रिया केल्यास नव्या गोष्टी चांगल्या स्मरणात राहतात. मात्र धडाच्या धडा कसा स्मरणात राहील? त्यासाठी नोट्‌स घेण्याची सवय हवी. नोट्‌स म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांचा सारांश त्यात काही महत्त्वाची वाक्‍यं, विधानांचाही समावेश असतो. चांगल्या नोट्‌स काढणं ही एक कलाच आहे. नोट्‌स अशा असाव्यात की त्या वाचल्यानंतर (खरं तर केवळ चाळल्यानंतर) संपूर्ण धडा... संपूर्ण प्रकरणं कळावं, त्याचं आकलन व्हावं. त्यानंतर तो धडा/प्रकरण पुन्हा वाचण्याची गरजच उरू नये. नोट्‌स म्हणजे जणू गागर में सागर. शंभर-दीडशे छापील पानांचं पुस्तकं नोट्‌समुळे अवघ्या पंधरा-वीस पानांमध्ये सामावतं. प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी, सर्व पुस्तक वाचून काढणं शक्‍य नसतं. अशा वेळी नोट्‌स अगदी उपयुक्त ठरतात.

वाचलेला विषय, त्यातील मुद्दे स्मरणात ठेवण्यासाठी काही युक्‍त्या वापरता येतात. बरीचशी मुलं त्या वापरत असतातही. इंद्रधनुष्यातील सात रंगाचा क्रम ध्यानात ठेवण्यासाठी ‘तानापिहिनिपाजा’ ही अक्षरावली मुलं वापरतातच. असंच इतर प्रश्‍नांच्या उत्तरांसाठीही करता येतं. पानिपतच्या पराभवाची कारणे सांगा असा प्रश्‍न असतो. ही सात-आठ कारणं असतील तर दोन-तीनच आठवतात. त्यावर उपाय म्हणजे त्या सर्व कारणांमधली पहिला अक्षरं घेऊन एक की-वर्ड असा शब्द तयार करून तो लक्षात ठेवणं. पहिल्या अक्षरामुळे ते ते कारण आठवणं सोपं जातं. पुन्हा नेमकी किती कारणं आहेत तेही अक्षरांच्या संख्येमुळं कळतं. एकही कारण सुटत नाही. आठवण्यासाठी अशाब्दिक तंत्राचाही वापर करता येतो. वाचलेलं चित्ररूपानं मनात साठवता येतं. एक मात्र खरं, ‘खरं कळलेलंच खरं लक्षात राहतं.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today