समस्या हट्टांची नाही, ती हाताळण्याची आहे

शिवराज गोर्ले
शनिवार, 20 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
हट्ट करणं हा मुलांचा हक्क आहे का? हवं ते मिळवण्याचा त्यांचा तो हुकमी मार्ग असतो का? मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे पालकांचं कर्तव्य आहे का? आहे, पण मुलं हट्ट करणार... करत राहणार.

मूल अगदी लहान असतं. दोन तीन वर्षांपर्यंतचं, तेव्हा ते मोठ्यांचं ऐकत असतं. पण हळूहळू त्याच्यातला अहं जागा होऊ लागतो. त्याच जोडीला त्याच्या नैसर्गिक इच्छाही असतातच. त्या इच्छांचं रूपांतर मागणीत व नंतर हट्टात होत जातं. रडून ओरडून ते आपली मागणी रेटत राहातं. काही वेळा नाइलाजानं पालक तो हट्ट पुरा करताही; पण त्यामुळे प्रश्‍न सुटत नाही. काही वेळानं दुसरा हट्ट सुरू होतो. मुलांचे हट्ट थांबविण्याचा कुठलाही उपाय उपलब्ध नाहीय. मुलं हट्ट करणारच. प्रश्‍न हट्टांचा नाहीय. हट्ट हाताळण्याचा आहे. डॉ. श्रुती पानसे म्हणतात त्याप्रमाणे, मुलं हट्ट करणारचं, हे लक्षात घेऊन हट्टाला वळण कसं द्यायचं, हे पालकांना कळणं जास्त महत्त्वाचं आहे. मारल्यामुळे मूल गप्प बसतं, ते घाबरून; पण त्याच्या मनातली ती मूळ इच्छा जात नाही.

शिवाय पालकांबद्दल राग मनात बसतो. वारंवार मार खात राहणं हे मुला/मुलींच्या मानसिक/भावनिकच काय; बौद्धिक वाढीसाठीही वाईट आहे. मात्र मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवणं त्याचं प्रत्येक म्हणणं मान्य करणं हे त्यांच्याही वाढीसाठी, विकासासाठी घातक आहे. अशी मुलं समाजासाठीही घातक ठरू शकतात. होकार आणि नकार या दोन बाजू जगताना कायम वापराव्या लागतात. हे त्यांना कळायलाच हवं. प्रश्‍न आहे तो आपण या हट्टांना कशा प्रतिक्रिया देतो याचा. कधी युक्तीनं, कधी वास्तविक कारण सांगून, कधी या हट्टांवरच्या गोष्टी रचून, कधी स्वतःच्या लहानपणाची हकिगत सांगून या अडचणींवर मार्ग काढता येईल.

एका हट्टातून इतर कायमस्वरूपी समस्या मात्र निर्माण व्हायला नकोत, ही काळजी पालकांनी या टप्प्यावर घेतली पाहिजे. वाढत्या वयात मुलांचे प्रश्‍न अधिकच गंभीर होतात. तसं होऊ नये, याची काळजी लवकरच्या वयात घ्यायला हवी. कुठल्याही परिस्थितीत मूल मानसिकदृष्ट्या पालकांपासून दुरावयाला नको. एक महत्त्वाचं मुलांनी मुलांसारखं राहावं, स्वभावानुसार वागावं यासाठी मोठ्यांनाही आपल्या काही गोष्टी बदलाव्या लागतील. स्वतःचेही काही हट्ट सोडावे लागतील!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today