परीक्षेचा ताण कसा हाताळावा?

शिवराज गोर्ले
सोमवार, 6 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मुलांना अभ्यासाचा, परीक्षेचा ताण असतोच, पण त्यांच्या अभ्यासाचा विशेषतः परीक्षेचा ताण पालकांनाही असतो. परीक्षा अपरिहार्य असली तरी त्या परीक्षेच्या राक्षसाला अक्राळविक्राळ बनून देणं पालकांच्या हातात असतं. ‘मुलं विरुद्ध पालक’ असा तो सामना होऊ न देता टीमवर्कनं हा परीक्षेचा ताण कसा कमी करता येईल. या संदर्भात डॉ. सुखदा चिमोटे यांनी पालकांना दिलेले हे काही कानमंत्र.

     मनात येणाऱ्या विचारांकडे मी अधिक सजगतेनं पाहीन. माझेच विचार मुलांच्या ‘परीक्षा’ या गोष्टीला महाभयंकर रूप देताहेत का? ‘कमी मार्क मिळाले, की संपलंच सगळं,’ किंवा ‘माझ्यासारख्या हुशार माणसाच्या मुलाला गणित कठीण जातं हे मला मान्यच नाही,’ असे अविवेकी विचार असल्यास ते मी बदलेन.

     या विचारांच्या जोडीनं येणाऱ्या भावनांचाही मी विचार करीन. परीक्षेचा थोडा तणाव, तब्येतीची वाटणारी रास्त काळजी, या मदत करणाऱ्या भावना असतात (यूस्ट्रेस), तर अतिचिंता, अतिभीती या त्रासदायक भावना असतात (डीस्ट्रेस). हे ओळखून मी मदत करणाऱ्या भावनांवर लक्ष केंद्रित करेन.

     ‘तुझी परीक्षा ही विषयातल्या कौशल्याची आहे. त्यातल्या गुणांवर तू किती चांगला किंवा वाईट हे ठरत नाही. तुझ्या परीक्षेतल्या कामगिरीवर आपलं नातं अजिबात अवलंबून नाही. एखादा विषय कठीण गेला, कमी मार्क मिळाले तरी माझं तुझ्यावरील प्रेम तसंच राहणार आहे,’ असा विश्‍वास माझ्या कृतीतून व उक्तीतून मुलाला द्यायचा मी प्रयत्न करीन.

     नातेवाईक आणि शेजारी मुलाला शुभेच्छा देत असतानाच अकारण टेन्शनही वाढवत असतात. त्यांना मुलांपासून थोडं दूर ठेवीन किंवा तसा परिणाम होणार नाही, याची दक्षता घेईन.

     घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवीन, जेणेकरून मुलांची अस्वस्थता कमी होईल. स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम राहायला मदत होईल.

      ‘शेवटच्या क्षणी’ घाबरून न जाता, जे जे केलं आहेस ते नीट आठवून लिही, तुला नक्की जमेल,’ असा विश्‍वास मी मुलांना देईन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today