छडी लागे छमछम??

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
पालकांनी मुलांना (शक्‍यतो) शिक्षा न करता शिस्त कशी लावावी; शिक्षेसह शिस्त लावायची असल्यास शिस्तीचे कोणते नियम पाळावेत हे आपण पाहिलं. मात्र मुलांना शाळेतही शिक्षा होत असतात त्याचं काय?

पालकांनी शाळेतल्या शिक्षांकडं कुठल्या दृष्टीनं पाहावं? अर्थात हे ठरवण्यापूर्वी मुळात शाळेत मुलांना शिक्षा केल्या जाव्यात की नाही, कराव्या लागल्यास शाळेनंही कोणते नियम पाळावेत, हे पाहावं लागेल. शिक्षणवेधनं ‘छडी लागे छमछम???’ या विशेष लेखातून या संवेदनशील विषयाचा सखोल वेध घेतला आहे. तो सारांशानं असा आहे, शाळा मुख्यतः शिकण्यासाठी असतात; परंतु शाळा शिकवता-शिकवता शिक्षा करतात किंवा खरं तर शिक्षा करता-करताच त्या शिकवतात. शाळेतल्या या लहान-मोठ्या शिक्षांमुळे मुलांचं खऱ्या अर्थानं शिक्षण होतं का? शिक्षा न करता शिक्षण शक्‍यच नाही काय? एक तर स्पष्टच आहे, मुलं शिक्षा भोगतात तेव्हा त्याचं मन नकारात्मक भावनांनी भरून जाते. या नकारात्मक भावनांचा मनावरचा परिणाम नकारात्मकच असतो. शिक्षणाच्या प्रक्रियेत हे बसतं का? मुलांनी नकारात्मक भावनांचं ओझं घेऊन शिकावं असं आपल्याला वाटतं का? मुलं शाळेत येतात ते (नवं) ज्ञान मिळविण्यासाठी की शिक्षा भोगण्यासाठी.

सध्या काय होतंय? 
मुलांकडून आधीच विविध प्रकारच्या अपेक्षा केल्या जातात आणि त्यांनी त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर शिक्षेचा बडगा उगारण्यात येतो. अशावेळी कोणतीही, शिक्षकांच्या मनात त्या वेळी येईल ती शिक्षा मुलांना बजावण्यात येते. शिक्षणाच्या प्रक्रियेला साऱ्या शिक्षण व्यवस्थेलाच कलंकित करणाऱ्या शिक्षा, शिक्षण या विषयावरच प्रश्‍नचिन्ह उभं करतात. बालहक्क आयोगानं अशा शिक्षांची गंभीर दखल घेत शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक शिक्षा शिक्षकांनी करू नये, असं बजावलं आहे. हे होतं आहे काय? हा प्रश्‍न सुटायला हवा असल्यास मुळात शाळेत शिक्षा का केल्या जातात, या प्रश्‍नाच्या मुळापर्यंत जावं लागंल. मुलांना शिक्षा केल्यानं त्यांच्या समोरचे प्रश्‍न सुटतात का याचाही विचार करावा लागेल.

Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today