मुलांना काही सांगायचंय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 June 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
संवाद ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. मला काही सांगायचंय ही त्याची मूलभूत गरज असते. अन्न, वस्त्र, हवा यांच्याइतकीच. त्या भागविण्यासाठीही त्याला संवादाची गरज भासतेच. बालक-पालक संवादाची गरज तर असतेच असते!

लहान मुलांची... अगदी छोट्या बाळाचीही काही सांगण्याची धडपड सुरूच असते. पण, त्यासाठी त्याच्याकडं एकच साधन असतं. ते म्हणजे रडणं. नंतर मग हसणं. बाळाच्या या हसण्या रडण्याचा नेमका अर्थ मोठ्यांनी समजून घेणं ही तर दोघांच्याही पातळीवर चालणारी दुहेरी कसरत असते.

मुलांच्या (शाब्दिक) संवाद क्षमतेच्या विकासाबद्दल व त्या संदर्भात पालकांनी ठेवायच्या सजगतेबद्दल बोलावं तेवढं थोडंच. पण ते इतकं महत्त्वाचं असतं की त्याचं सतत भान ठेवावं लागतं. प्रसाद मणेरीकर यांनी या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्यांकडे पालकांचं लक्ष वेधलं आहे. ते साराशांनं असे आहेत : दोन-तीन वर्षांची मुलं त्यांना आनंद होवो, दुःख होवो, तत्काळ तुम्हाला येऊन बिलगतात. हा त्यांनी साधलेला संवादच असतो. अशा प्रत्येक वेळी पालक, शिक्षकांचं काम असतं. त्या मुलाला तत्काळ प्रतिसाद देणं तो मिळाला नाही तर मुलं आणि पालक-शिक्षक यांच्यातली दरी वाढायला लागते. त्यामुळे साहजिकच मुलांची संवादाची नैसर्गिक ऊर्मी मारली जाते.

मुलांची शब्दसंपत्ती मर्यादित असते, पण प्रतिसादाची ऊर्मी तीव्र असते. अशावेळी शब्द शोधत थांबणं मुलांना शक्‍य नसतं. त्यामुळे ती त्या क्षणी योग्य वाटेल ते माध्यम निवडतात. यात राग आला की वस्तू फेकणंही आलंच. मूल काही कारणानं धावत आपल्याकडं येतं पण आता मी कामात आहे, कळत नाही का, यामुळे आपली नकारात्मक प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत जाते. मुलांकडे शब्दसाठा मर्यादित असल्याने, भाषेची जाण पुरेशी नसल्यानं एक लहानसं वाक्‍य जुळवण्यासाठीही त्यांची शक्तीपणाला लागत असते.

अशा वेळी मुलाची गरज असते ते तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे त्याच्या मोडक्‍या-तोडक्‍या, अर्धवट बोलण्याकडे देण्याची. पण, तुम्हाला टीव्ही बघताना हा छोटासा व्यत्यय नको असतो. मग तुम्ही दुर्लक्ष करता, रागावता. यातून आपल्या पालकांना आपल्याशी काही घेणं-देणं नाही ही जाणीव मुलाच्या मनात मूळ धरू लागले. असेच अनुभव पुन्हा-पुन्हा येत राहिले तर ती पक्की होऊन बसेल. परिणाम? मुलांची संवाद क्षमता विकसित होण्याआधीच मारली जाईल. मुलं जेव्हा तुटक शब्द, हावभाव, हातवारे ही सर्व माध्यमं दिमतीला घेऊन काही सांगू पाहतात - तो त्यांचा स्वतःशी स्वतःशी चाललेला झगड असतो. व्यक्त होण्यासाठीचा झगडा या त्यांच्या झगड्यात त्यांच्या मदतीला पालकांनीच तर धावून जायचं असतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today