मुलांना बोलू द्या, ऐकू द्या, पाहू द्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 June 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
लहान मुलं आपोआप बोलायला शिकतात. ऐकून-ऐकून भाषा आत्मसात करतात हे खरंच आहे; पण त्यांची संवाद साधण्याची क्षमता वाढवायची जबाबदारी पालकांवरच असते. अर्थात, या वयातल्या मुलांच्या अर्धवट, मोडक्‍या तोडक्‍या बोलण्याकडं लक्ष देणं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं यातून फक्त त्यांची संवादक्षमता विकसित होत नसते. यातून बालक-पालक (किंवा बालक शिक्षक) हे नातंही दृढ होत असतं, हे नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे. मुलांशी मायेचे बंध त्यातूनच निर्माण होत असतात. म्हणूनच मुलांना (घरात पालकांनी, शाळेत शिक्षिकांनी) बोलतं केलं पाहिजे. मुलं आपापसांतही बोलकी होतील, हे पाहिलं पाहिजे. अर्थात, मुलांना खूप ऐकायलाही मिळायला हवं. त्यातूनच त्यांची शब्दसंपत्ती वाढत असते.

यासाठी आज-काल पालक करत नाहीत, पण त्यांनी आवर्जून करायला हवी अशी गोष्ट म्हणजे मुलांना गोष्ट सांगणं. विविध गोष्टी ऐकवणं, गोष्टीत नाना भावना येतात, शब्दांचे चढ-उतार येतात. हे सारं मुलं गोष्ट ऐकता ऐकता नकळत शिकत जातात. नंतर ऐकलेली गोष्ट त्यांनी सांगावी असं सुचवलं तर उत्साहानं सांगतातही.

लहान मुलांची संवाद क्षमता वाढवण्यात पालकांचा त्यांच्याशी होणारा संवाद महत्त्वाचा असतोच, पण बाहेरच्या जगाशी संवाद करण्याच्या संधीही द्यायला हव्यात. त्यांना घराबाहेर वावरू देणं, घरातही शक्‍य त्या सर्व गोष्टी करू देणं गरजेचं ठरतं. ते कपाट उघडून वस्तू बघत असतं. त्यातून होणाऱ्या पसाऱ्याचं त्याला भान नसतं. वस्तू हाताळण्यातून, नव्या गोष्टी स्वतः करून बघण्यातून त्याच्याशी संबंधित शब्दांचे अर्थ मुलाला समजणार असतात.

त्यामुळं या साऱ्या गोष्टी मुलाला जाणीवपूर्वक करू द्यायला हव्यात. अन्यथा, भोवतालच्या परिसरातच आपण मुलाला अनोळखी करून टाकू. मग ती कोणाकडं जाणार नाहीत की तोंड उघडून बोलणार नाहीत. 

मुलं टीव्ही बघतात, त्यातूनही त्यांची शब्दसंपत्ती वाढू शकते, पण टीव्हीचं माध्यम एकतर्फी असतं. ते वापरायचंच असेल तर ते जे पाहतील त्यावर तुम्हीच त्यांच्याशी बोललं पाहिजे. फक्त संवाद क्षमतेसंदर्भातच नव्हे, अवलोकन, आकलन, विश्‍लेषण या त्यांच्या क्षमता विकसित होण्यासाठी पालकांनी त्याचं ऐकलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणखी एक त्यांच्या बोलण्यातल्या आपल्या सोयीच्या नसलेल्या गोष्टींकडं सोईस्करपणे दुर्लक्ष करणं, आपल्याला हवंय तेच त्यांच्याकडून वदवून घेणं हे वागणं बरं नव्हे! त्याचाही मुलांच्या संवाद क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत असतो. मूल संवादाच्या बाबतीत लवकरात लवकर स्वतंत्र, स्वयंपूर्ण होईल याची काळजी त्याच्या भोवतालच्या मोठ्यांनीच घ्यायची असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today