मुलांच्या उच्चस्तरीय क्षमता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
माणूस अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे? ‘माणसाला बुद्धी आहे,’ हे अगदी ढोबळ उत्तर झालं. ते बरोबरच आहे, पण अधिक नेमकं उत्तर कुठलं? सर्वच प्राण्यांना डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये असतात. त्यामार्फत मिळणाऱ्या उत्तेजना समजून घेण्याची व वारंवार केलेल्या सरावातून गोष्टी स्मरणात ठेवण्याची क्षमता सर्वांमध्ये असते, प्राणी-पक्षी कमी-अधिक प्रमाणात आपले स्थलांतराचे मार्ग लक्षात ठेवतात, हे आपल्याला विस्मयकारक वाटते. तसे ते आहेच, पण प्राणी-पक्षी या कृती करताना, विचार करताना दिसत नाहीत. म्हणूनच शेकडोंनी विल्डबीस्ट स्थलांतराच्या मार्गावरील कड्यावरून कोसळून मृत्युमुखी पडतात. प्राणी-पक्षी यांच्याकडं ज्या उपजत क्षमता असतात, त्या निम्नस्तराच्या समता मानल्या जातात.

माणसाच्या मेंदूकडं या प्राण्यांपेक्षा अधिक वरच्या दर्जाच्या क्षमता असतात, हे स्पष्ट करताना डॉ. मंजिरी निंबकर म्हणतात, ‘या क्षमता म्हणजे जाणीवपूर्वक जोपासलेली, अध्ययनातून प्राप्त झालेली व मेंदूत रुजलेली वर्तणूक असते. तार्किक विचार करणं, एखाद्या गोष्टीकडं जाणीवपूर्वक लक्ष देणं, इंद्रियसंवेदना जाणीवपूर्वक जाणून घेणे इ. उच्च स्तराच्या क्षमता या जाणीवपूर्वक व अध्ययनपूर्वक जोपासलेल्या असतात, हे महत्त्वाचं.’

दिसलेल्या, ऐकलेल्या, चाखलेल्या माहितीवर जेव्हा जाणीवपूर्वक, नियोजनबद्ध पद्धतीनं प्रक्रिया केली जाते, तेव्हा त्या माहितीचे मेंदूच्या उच्च दर्जाच्या क्षमतेत रूपांतर होते. उदा. निळा रंग ओळखणं ही निम्नस्तरीय क्षमता झाली, पण आकाशी, मोरपंखी, जांभळा... अशा विविध छटा ओळखणं ही उच्चस्तरीय क्षमता होय.

मोठ्या आवाजाकडं अथवा एखाद्या दृश्‍याकडं लक्ष वेधलं जाणं नैसर्गिक आहे, पण भोवतीच्या गोंगाटाकडं लक्ष न देता एखाद्या कामात रमणं ही उच्चस्तरीय क्षमता आहे. मुलांमध्ये लहानपणापासून ही क्षमता जाणीवपूर्वक जोपासली नाही, तर वर्गात मुलं बोलत असताना, शिक्षकांच्या बोलण्याकडं लक्ष देणं अवघड जातं.

घोकंपट्टीनं लक्षात ठेवणं ही निम्नस्तरीय क्षमता, पण दोन-तीन गोष्टींमधील सहसंबंध जाणू घेऊन काही तंत्रे व क्‍लृप्त्या वापरून लक्षात ठेवणं ही उच्चस्तरीय क्षमता बनते. उदा. पदन्यासाचा आकृतिबंध बोलत बोलत लक्षात ठेवणं, उच्चस्तरीय क्षमतांपर्यंत जाणीवपूर्वक पोचावं लागतं. आई जेव्हा ‘बाळानं लाल बॉल घेतला का?’ म्हणते तेव्हा आपण उचलला तो बॉल होता, तो लाल होता, याची मुलाला जाणीव होते. मग आई बॉलवर हात फिरवून ‘बॉल गोल आहे’ म्हणजे तेव्हा मुलाच्या मनात बॉल, गोल, लाल या शब्दांच्या प्रतिमा उमटतात व त्यांच्यात नातं जडतं. पुढं बॉलबद्दल येणाऱ्या नवनवीन माहितीशी जुनी माहिती जोडली जाऊन ती ‘संकल्पना’ अधिकाधिक दृढ होत जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today