Edu
Edu

मुलांना शिकू द्या गणिती कौशल्ये

बालक-पालक
मुलांना ‘गणित’ अवघड जातं, खूप मुलं गणितात नापास होतात. त्यामुळं आठवीपासून गणित ऐच्छिक करावं, असं अनेकदा सुचवलं जातं. असं करणं कितपत योग्य, व्यवहार्य ठरेल? ‘गणित हवं की नको?’ या लेखात डॉ. विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी हा प्रश्‍न नेमकेपणानं मांडला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे -

   गणित ही आधुनिक विज्ञानाची भाषा आहे. गणिताशी ‘कंफर्टेबल’ नसलेला कोणताही विद्यार्थी आधुनिक विज्ञानाच्या जगात कमजोर ठरू शकतो. 

   गणिती कौशल्य असणं आणि त्या आधारे सारासार विवेकानं निर्णय घेणं, हे आज जबाबदारीच्या कोणत्याही पदास आवश्‍यक ठरतं. त्यामुळं कुणालाही ज्ञान आणि कौशल्यापासून वंचित ठेवणं हे त्यांना दुय्यमत्व स्वीकारायला भाग पाडणं ठरेल. 

आता प्रश्‍न आहे तो गणित अवघड जातं याचा. गणित शिकण्यासाठी खास बौद्धिक क्षमता लागते ती ज्या मुलांकडे नसेल, त्यांना काय करायचं? डॉ. विवेक माँटेरो आणि गीत महाशब्दे स्पष्ट निर्वाळा देतात की, प्रत्येक सर्वसामान्य मुलालाही चांगलं गणित शिकता येईल. मात्र, त्यासाठी गणिताचं ‘सार्वत्रिकीकरण’ करायला हवं. पाठांतर करून गणिताच्या परीक्षा पास होता येत नाहीत. पण ‘समजे’च्या आधारावर ते पूर्णतः शिकवता येतं. समजेवर आधारित ‘शिकवणं’ हा गणिताच्या सार्वत्रिकीकरणाचा मार्ग आहे. प्रत्येक मुलास स्वतः कृती, प्रयोग करायला मिळाल्यासच गणित शिकता येईल. 

गणिताच्या अनेक भाषा असतात. अंकाचिन्हांची भाषा ही त्यातली फक्त एक भाषा आहे. वस्तूंची भाषा, कृतींची भाषा, आकारांची भाषा, चित्रांची भाषा.. अशा अनेक भाषा आहेत. वस्तुभाषा आणि कृतिभाषा या सर्वांत सहज आणि नैसर्गिक भाषा आहेत. 

गणिताच्या संकल्पना या भाषांमध्ये मुलं अगदी सहज शिकतात. वस्तू भाषेतून संकल्पना शिकणं ही पहिली पायरी. त्यापुढची पायरी म्हणजे ती समज लिखित अंकचिन्हांमध्ये रूपांतरित करणं.

यावर आधारित ‘सक्रिय जनगणित’ हा कार्यक्रमही विकसित झाला आहे. पहिली ते चौथीच्या अनेक वर्गांमध्ये तो यशस्वीपणे राबवला जात आहे. ‘अवघड गणिता’च्या समस्येवरचं ते एक सोपं, व्यवहार्य उत्तर आहे. एखादा विषय किंवा क्षमता शिक्षणातनं वजा करणं हा कुठल्याच समस्येवरचा 
उपाय असू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com