मुलांना बक्षिसं द्यावीत का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांना बक्षिसं द्यावीत का? हा प्रश्‍न तसा निरर्थक वाटू शकतो. चांगल्या कामासाठी बक्षीस द्यायलाच हवं. मुलांना त्यामुळं प्रोत्साहन मिळतं. शिवाय किती आनंद होत असतो. बक्षीस मिळाल्यानं केलेल्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतं...

हे सारं असलं तरी मुलांना बक्षिसं देऊ नयेत असं समरहिलच्या संस्थापकाचं, अर्थात ए. एस. नीलचं मत होतं. त्यामागील स्वतःची भूमिका स्पष्ट करताना नील म्हणतो, ‘बक्षिसं एका अर्थी नकारात्मक असतात. बक्षिसं देण्यामुळं मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. बक्षिसांमुळं अत्यंत वाईट उद्दिष्टाला पाठिंबा मिळतो.’ नीलचे हे विचार काहीसे धक्कादायक आहेत, पण बक्षिसं नकारात्मक असतात कारण ती वरवरची असतात. एखाद्या गोष्टीबद्दल बक्षीस देणं याचा खरा अर्थ, ती कृती करण्याचा अनुभव महत्त्वाचा नाही असा होतो. मुलांनी एखादी कृती करायला हवी करण्यातल्या अनुभवाचा आनंद घेण्यासाठी, बक्षिसाच्या आशेनं नव्हे. 

बक्षिसं द्यायची म्हणजे स्पर्धा आल्या, पण नीलचा स्पर्धेला मुळातच विरोध आहे. कारण दुसऱ्याला पराभूत करणं या वाईट उद्दिष्टाला स्पर्धा पद्धतीमुळंच प्रोत्साहन मिळतं. बक्षिसांमुळं मुलांना मत्सर वाटायला सुरवात होते. मौज म्हणजे नील बक्षिसं आणि शिक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानतो.

नीलच्या मते खरं तर मुलांना अनेक गोष्टींमध्ये नैसर्गिकपणे रस वाटत असतो. पण त्या गोष्टी त्यांना आनंदानं करू न देता आपण ‘शिक्षा आणि बक्षिसं’ यामुळं मुलांना एखाद्या विषयात जबरदस्तीनं रस घ्यायला भाग पाडतो, म्हणजे तसा प्रयत्न करतो. पण- रस वाटणं हे उत्स्फूर्त असतं.

जबरदस्तीनं लक्ष द्यायला लावता येतं, कृतीला उद्युक्त करता येतं, रस नाही निर्माण करता येत. केलेल्या कामाबद्दल वाटणारं समाधान हेच खरं बक्षीस असतं, हे विसरून मुलांना ज्यातून आनंद मिळत नाही अशा गोष्टी आपण करायला लावतो. मुलांना रटाळ वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास केल्याबद्दल बक्षिसं देऊन आपण नेमकं काय साधतो? केवळ बक्षिसांच्या अपेक्षेनं केलेला अभ्यास किंवा शिक्षेच्या भीतीनं पाळलेली शिस्त... दोन्ही निरर्थक असतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today