गांधी, टागोर काय सांगत होते?

गांधी, टागोर काय सांगत होते?

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांना जसं आणि जे शिक्षण आज दिलं जातं आहे, त्यात अनेक त्रुटी आहेत, हे खरं "शिक्षण' नव्हे, याबद्दल आता जागृती होऊ लागली आहे. पण महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी केव्हाच तिकडे लक्ष वेधलं होतं. आपण मात्र फारसं लक्ष दिलंच नाही. नेमकं काय म्हणत होते गांधी? काय सांगत होते टागोर? गांधीजींनी म्हटलं, ‘मुलांचं शिक्षण हे त्यांच्या अवतीभवतीच्या ‘मूलोद्योगां’शी जोडायला हवं.’ हा अतिशय वेगळा, सर्जक विचार होता. जे उद्योग मुलं पाहताहेत, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत, ते करता करता मुलं विविध विषयांचं शिक्षणही सहजतेनं घेऊ शकतील याची गांधीजींना खात्री वाटत होती. ते म्हणत ‘मुलांची मुळं जमिनीत रुजवा व त्यांना भविष्य पाहण्याची दृष्टी द्या’ त्याचा संबंध इथल्या मातीशी आहे. तो संबंध मुलांच्या लक्षात यायला हवा असेल तर परिसराचा समावेश मुलांच्या शिक्षणात व्हायला हवा. म्हणजेच शिक्षण परिसराशी जोडायला हवं. परिसरातल्या जीवनाशी जोडायला हवं. 

हा झाला गांधीजींचा शिक्षण विचार. काहीसा असाच, पण मुलांच्या कल्पनाशक्ती व सर्जनशक्तीला वाव देणारा विचार टागोर करत होते. मुलांना आपलं आपण शिकू द्यायचं... आवश्‍यकता वाटेल (तीही मुलांना!) तिथे मदतीचा हाच द्यायचा. यातून सर्जनशीलता फुलते, यावर त्यांचा विश्‍वास होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे टागोर काय, गांधीजी काय दोघांचाही मुलांच्यातल्या निर्मितिक्षमतेवर दृढ विश्‍वास होता. पण आजच्या शिक्षणात काय झालंय? 

आपण शिक्षण एका व्यवस्थेत बांधण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी सरसकट त्याच पद्धतीनं तेच शिकायचं अशी व्यवस्था सोपी आणि सोयीची असते. सर्वांना त्यात बसवणं सोपं जातं आणि जे कुणी त्या व्यवस्थेत बसत नाहीत त्यांना बाजूला काढणं सोपं जातं. मुख्य म्हणजे शिकवणाऱ्याला फार कष्ट करावे लागत नाहीत. जे शिकत नाहीत, त्यांच्या जबाबदारीतून शिकवणारा मोकळा होतो. ती मुलं ‘शिकायला लायक नसलेली’ ठरवलं की झालं! 

हे बदलायचं असेल तर, बदलाची दिशा कोणती? उत्तर अगदी सोपं आहे. अशी दिशा घ्यायची जी मुलांच्या ‘शिकण्या’ला पोषक असेल. म्हणजेच काय तर मुलांना जे आणि जसं शिकायला आवडेल, तशी आपल्या शिक्षणाची रचना करायला हवी, हे आपण कधी करणार आहोत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com