मौन चाफा : निरोप...

अश्रूंचे आणि फुलांचे संदर्भ जवळपास सारखेच असतात. मात्र, फुलांचे संदर्भ कळले, तरीही ते काळजाच्या कप्प्यात तसेच दडवून ठेवायचे असतात
मौन चाफा : निरोप...
sakal

अश्रूंचे आणि फुलांचे संदर्भ जवळपास सारखेच असतात. मात्र, फुलांचे संदर्भ कळले, तरीही ते काळजाच्या कप्प्यात तसेच दडवून ठेवायचे असतात. निरोपाच्या क्षणी फुलांचे काही संदर्भ अलगद ओंजळीत पडतात, ते तसेच्या तसेच जपून ठेवायचे आणि विसरून जायचे असतात.

प्रवास नीट सुरू राहतो अन् नेमके निरोपाचे वळण कधी येते, हे आपले आपल्यालाच कळत नाही. निरोपाच्या या वळणावर अश्रू असतात किंवा मग फुलेही. फुलांचेच अश्रू होतात की अश्रूंची फुले होतात, हे सांगता आलेले नाही आतावर कुणालाच; पण अश्रूंचे संदर्भ कळले नाही तर आयुष्याचे हसे होते. अश्रूंचे आणि फुलांचेही संदर्भ तसे जवळपास सारखेच असतात. मात्र, फुलांचे संदर्भ कळले तरीही ते काळजाच्या कप्प्यात तसेच दडवून ठेवायचे असतात.

भेट त्यांचीही अशीच निरोपाचीच. आता कॉलेजचा अखेरचा दिवस. म्हणजे अखेरच्या वर्षाची अखेरची परीक्षा अन् त्याचा अखेरचा पेपर. त्याचा एमएचा अन् तिचा बीएचा. आता यानंतर कॉलेज सुटणार, ही व्याकूळता साऱ्यांच्याच मनात. फुलांच्या परड्याच ती रिती होणार अन् पुढे तशीच राहणार... त्यासाठीची घालमेल वेगळी होती.

त्यांचे ठरले होते, ‘‘तुझा पेपर संपला की तू कॉलेजच्या मागे जे तळं आहे, त्याच्या काठावर जो वनविभागाचा बगिचा आहे, तिथे येऊन गुलमोहराच्या झाडाखाली बसून वाट बघ...’’ दोघांनीही एकमेकांना हे सांगून ठेवले होते. ती अगदी कनिष्ठ महाविद्यालयापासूनच याच कॉलेजला होती. तोही असावा कदाचित, मात्र तो कॉलेजचे जे नायक असतात तशातला. कुठेही तोच समोर. अग्गाऊगिरी भरलेली अंगात. एकदा भारताचा संघ क्रिकेटची मॅच जिंकला म्हणून त्याने प्रिन्सिपल सरांना सांगून कॉलेजला सुट्टी द्यायला लावली होती... कोण हा महाभाग, याची तिला उत्सुकता लागली आणि मग एका मैत्रिणीने दाखविले, तो बघ तोच...

तो चित्रही छान काढायचा. स्नेहसंमेलनात प्रदर्शनात त्याने आपले एक चित्र ठेवले होते. हिच्या एका सिनियर मैत्रिणीने ते चोरले आणि मुद्दाम हिच्याकडे ठेवले. हिच्यावर कुणालाच संशय येणार नाही, असा तिचा अंदाज.

त्याने मात्र नेमके हुडकून काढले. हिला गाठलेच. ही तेव्हा फर्स्ट इयरला होती अन् तो एमएच्या प्रथम वर्षाला. ही कॉलेजहून परतत असताना तो समोर आला आणि म्हणाला, ‘‘तू माझे चित्र नाही, काळीज चोरले आहेस. परत घ्यायला आता येतो मी सोबत!’’

‘‘मी काहीच चोरलेले नाही. ठेवले मात्र माझ्याकडे आहे हे नक्की... चित्र तर मी परत करेन; पण काळीज चोरीला गेले असेल, तर ते माझ्याकडे नाही.’’ ती त्याला असा अचानक समोर पाहून धडधडली होती अन् तरीही तिला हे असे बोलणे कसेकाय सुचले तिचे तिलाच माहिती. तो हसला. तिच्या घरी तिच्यासोबत गेला. स्वत:ची नीट ओळख करून दिली. आई, बाबांच्या पाया पडला. हे चित्र हिच्याकडे ठेवले होते ते न्यायला आलो, असे सांगितले. ‘‘लुच्या आहे लेकाचा, खूप स्टाईल मारतो आहे.’’ असे ती मनाशीच म्हणाली. कॉलेजला वरची दोन बटणे उघडीच असायची शर्टची त्याच्या. आता मात्र शर्ट कॉलरबंद होता. वडिलांनी साधेपणाने सांगून टाकले, ‘‘अरे हे चित्र तर त्या तमकीने ठेवायला दिले होते ना?’’ अरे देवा! याला नाव कळलेच कुणी चोरले होते चित्र तिचे. जाताना फाटकाशी म्हणाला, ‘‘थँक्स... तू खूप चांगली आहेस. चित्र नेतो आहे; पण...’’

‘‘पण, काळीज तुला तिच्याचकडून न्यावे लागेल, बाबांनी चुकून तिचे नावही तुला सांगूनच टाकले.’’

‘‘मी चित्रालाच काळीज म्हणालो होतो... पण, आता माझे काळीज खरोखरीच इथे राहिले आहे.’’ असे म्हणत तो निघून गेला. आपल्या आयुष्यातला फुलांचा मोसम सुरू झालेला आहे, हे तिला तेव्हाच कळले.

त्यानंतर गेली दोन-अडीच वर्षे ते असेच कॉलेजच्या मागच्या त्या तळ्याकाठच्या बगिचात भेटत राहिले होते. ती भेटल्यावर त्याच्यातला अनिल कपूर जाऊन तो अमोल पालेकर झालेला. त्याला शिक्षण संपताच आपल्याला नोकरी लागली पाहिजे, याची आस लागली. तो बऱ्यापैकी नम्र झाला. आज त्यांची ही निरोपाची भेट होती.

तो आला. तिच्या बाजूला बसला. तिचा हात हाती घेतला त्याने. हलकेच तो सोडवून घेत ती म्हणाली, ‘‘माझ्यासाठी स्थळ शोधणे सुरू झाले आहे. दिवाळीनंतरचा हा किमान दहावा तरी कार्यक्रम...’’

‘‘म्हणजे इतक्या मुलांनी तुला नकार दिला तर...’’ तो हसत म्हणाला. ‘‘एकही नकार आलेला नाही; पण एका मुलाला मी कायमचा होकार दिला असल्याने मी किल्ला कसाबसा लढवत ठेवलेला आहे.’’ ती म्हणाली.

आता उद्या आणखी एक मुलगा बघायला येणार आहे. तो सर्वार्थाने चांगला आहे, असं बाबा म्हणतात. दिसायला चांगला, कुठले व्यसन नाही, नोकरी चांगली, गावात स्वत:चे घर आहे, एकच बहीण अन् तिचेही लग्न झालेले. आई-वडील दोघेही नोकरीचे होते, त्यामुळे घरची स्थिती उत्तमच, वडिलोपार्जित शेतीही आहेच अन् विशेष म्हणजे, दोघांच्याही पत्रिकेचे गुण जुळतात...

‘‘हो का... मग कधीचा काढायचा मुहूर्त?’’

‘‘अरे, असे बाबा म्हणत होते...’’

‘‘तू काय म्हणतेस?’’

त्यापेक्षाही तूच आता काही म्हणायला हवेस, असे ती म्हणाली. तो सांगत राहिला, गेली दोन वर्षे तो नोकरीच्या मागे लागला आहे. त्याने घरी इंग्रजीचे ट्युशन क्लासेसही सुरू केले आहेत.

‘‘हं, आता तू सांगितलेस त्या मुलातले बरेच गुण माझ्यातही आहेत, एकच की माझ्या घरची आर्थिक स्थिती मध्यम आहे. शेतीवाडी नाही. मला नोकरी नाही.’’

मग तो अंर्तमुख झाला. शून्यात हरविला. ‘वयात आलेल्या मध्यमवर्गीय घरच्या मुलाला नोकरी नावाचा अवयव फुटलाच पाहिजे. नाही तर तो षंढ ठरतो...’ त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तिने त्याला जवळ घेतले. त्याचे डोके मांडीवर ठेवून थोपटत राहिली. माझे किती प्रेम आहे तुझ्यावर हे पुन्हा पुन्हा सांगितले. तो म्हणाला, ‘‘हे सगळेच खरे आहे; पण आता पुढे काय?’’

तिने अचानक घड्याळात पाहिले. बापरे! पाच वाजून गेलेले आहेत. दोन वाजता पेपर संपला होता. आता घरी जायला हवे; नाही तर शोधाशोध सुरू होईल माझी... अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील...

त्यालाही हे कळत होते. तो म्हणाला, मग आता पुढे काय? कारण, तो आता त्याच्या गावी जाणार होता. इथे तो शिक्षणाच्या निमित्ताने खोली करून राहात होता. ते दोघेही बगिचाच्या फाटकाशी आले. आता निरोपाचा क्षण आलाच होता. तोही सायंकाळच्या सातच्या गाडीने गावी जाणार होता. तिच्या घरच्यांनी तिला या वर्षी उजवूनच टाकायचे हे नक्कीच केलेले. तिने बॅग सायकलला लावली. आता तिला निघावेच लागणार होते... त्याने पुन्हा विचारले, ‘‘काय करायचे?’’

‘‘तू नोकरी शोध. मी इकडे किल्ला लढविते. तुला नोकरी लागली तर तू माझ्या बाबांना पत्र पाठव; अन् माझा किल्ला ढासळला अन् माझे लग्न ठरले, तर मी तुला पत्रिका पाठवेन!’’

त्याच्यापर्यंत तिचे हे वाक्य सार्थकपणे पोहोचले तोवर ती खूप दूरवर निघून गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com