#MokaleVha : लग्न म्हणजे दडपण नव्हे...

Marriage
Marriage

आज प्री-वेडिंग शूटिंग पूर्ण झाले. लग्नाला आता अवघे वीस दिवस राहिलेत. कितीतरी गोष्टी अजून पूर्ण करायच्या आहेत. पार्लरमध्ये जाऊन ट्रायल द्यायची आहे, मेंदीच्या संगीताची तयारी आहे. लग्नातील साड्या, शालू, त्याच्यावरचे मॅचिंग, त्यावर शोभणाऱ्या पारंपरिक दागिन्यांचा सेट तयार करायचा आहे. बापरे नेहाची लिस्ट संपतच नव्हती. सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा झालेला, त्यानंतर हळूहळू कपडे खरेदी, रुखवताच्या वस्तूंची खरेदी, सगळ्यांच्या मानापमानाची आणि लग्नातील सोन्याच्या दागिन्यांची खरेदी यामध्ये वेळ गेला. आता तीन महिने राहिले, दोन महिने राहिले, असे मोजता मोजता अवघ्या वीस दिवसांवर लग्न आलं आहे. आता जसे दिवस अगदी जवळ येऊ लागले तसे हुरहुर आणि अनामिक भीतीही तिला वाटू लागली आहे.

तुझा इथला शेवटचा वाढदिवस, तुझ्यासोबतची ही शेवटची फॅमिली टूर असं प्रत्येक वेळेला सगळे म्हणायला लागले की, तिच्या काळजात चर्रर्र व्हायचे. इतकी का मी या घरापासून तुटणार आहे? इतकी का या घरातल्या माणसांना मी परकी होणार आहे? प्रत्येक गोष्टीत ताईशी भांडणारा बंड्याही आता फारच शहाण्यासारखा वागतोय. ‘ताई तू बघ तुझ्या आवडीचा पिक्‍चर, क्रिकेटचा सामना मला मोबाईलवरही बघता येईल. ‘एरव्ही क्रिकेट बघू देत नाही म्हणून थैमान घालणारा बंड्या, इतका सरळ कसा वागतोय याचं आश्‍चर्य वाटत होतं, पण त्यामुळे मनात काहूर दाटून आले. 

लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले आहेत तसतशी एक अनामिक भीती तिला वाटू लागली आहे. इतके दिवस माहेरी तिची स्वतंत्र खोली म्हणजे तिचे विश्‍वच होतं. पण आता सासरी गेल्यावर वन बीएचकेमध्ये राहावे लागणार. त्या घरात सासू-सासरे अविवाहित नणंद सगळेच असणार. कसं होणार आपलं? त्यांच्या घरी फार तिखट खात नाहीत म्हणे.

एकदा खरेदी झाल्यानंतर ती त्यांच्या घरी जेवायला गेली होती. सगळे पदार्थ अगदी मिळमिळीत. आता तर रोज असलंच जेवायला लागणार, मीच स्वयंपाक करायचं ठरवलं तर? पण आपण केलेला स्वयंपाक त्या लोकांना आवडेल का? त्याची आई फारच परफेक्‍शनिस्ट आहे म्हणे. त्यांच्याएवढी स्वच्छता कशी जमणार? त्यांना नाहीच रुचलं तर? एक ना अनेक शंका मनात येऊ लागल्या की झोपच येत नाही. खरं तर सासरची मंडळी खूप चांगली आहेत, पण नंतर बदलणार तर नाहीत ना? तो इतका प्रेम करतो. माझा एकही शब्द खाली पडू देत नाही, पण लग्न झाल्यावर त्याचा ‘नवरोबा’ तर होणार नाही ना? तो समजून घेईल ना?

लग्न अगदी जवळ येऊन ठेपलं की, प्रत्येक मुलीच्या मनात अशा वेगवेगळ्या विचारांची आवर्त प्रत्यावर्त उमटत राहतात. आता आपलं सगळं बदलणार ही जाणीव आणि सगळं ॲडजस्ट होईल ना? ही अनामिक भीती मनात दाटते. आनंद, उत्सुकता, आश्‍चर्य, भीती, हुरहूर. काहीतरी हातातून निसटतंय आणि काहीतरी गवसलंय अशा संमिश्र भावना एकाच वेळी मनात दाटून येतात आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येतो. इतकी वर्षं आपली असणारी सर्व माणसं सोडून जायचं आणि सर्व नवीन माणसांना आता आपलं करायचंय. हे कळत नकळत एक दडपण आणि ओझं मनावर असतं. नियोजित किंवा ठरवून केलेल्या विवाहात हा प्रकार अधिक असतो, प्रेमविवाहातील आव्हानं अजून वेगळ्या स्वरूपाची असतात. पालकांच्या मनाविरुद्ध लग्न होत असेल तर हे दडपण अधिकच वाढलेलं असतं. फक्त ‘त्याला’ ती ओळखत असल्याने त्याच्यावरचा विश्वास अधिक असतो. नियोजित विवाहात त्याच्यापासून सगळेच तिच्यासाठी अनोळखी असतात.

त्यालाही असते दडपण...
लग्नाच्या आधी त्यालाही दडपण असते, ती आपल्या घरात रुळेल का? माझ्या नातेवाइकांना मनापासून स्वीकारेल का? अशा शंका ‘त्याच्या’ही मनात असतात. आजकाल लग्न मोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे ते अनुभव लक्षात घेऊन त्यालाही भीती असतेच. 

‘लग्न सुरळीत पार पडेल ना?’ हे दडपण तर दोन्हीकडच्या पालकांना असतेच. लग्नात कोणतंही विघ्न येऊ नये असे दोन्हीकडच्या नातेवाइकांना वाटत असते. आपला जावई मुलीची नीट काळजी घेईल ना? तिचे सासू-सासरे, इतर नातेवाईक तिला त्यांच्या घरात सामावून घेतील ना? असा विचार मुलीच्या आई-वडिलांच्या मनात येतो. मुलाचेही आई-वडील दडपणाखाली असतातच. ‘ही मुलगी आपल्या घरात नीट राहील ना?, कुटुंब तोडणार तर नाही ना? आपल्या घरात सुख, आनंद घेऊन येईल ना? असे दडपण त्यांच्यावरही असतेच.

लग्नामध्ये आनंदसोहळ्याच्या पडद्याआड असणारी ही अनामिक भीती दोन्ही कुटुंबीयांनी पळवून लावायला हवी. लग्नामध्ये केवळ दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत, तर दोन कुटुंबे एकत्र येतात. दोन्हीकडच्या नातेवाइकांनी रुसवे-फुगवे, मान-अपमान न बाळगता एकमेकांशी मोकळेपणाने वागायचे ठरवले तर मनातील ही भीती पळून जाईल. मुली आता शिकलेल्या आहेत, त्यांना त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. मी त्याच्या आई-वडिलांना आपलं म्हणेन, पण त्यानेही माझ्या आई-वडिलांचा स्वीकार करावा, अशी तिची अपेक्षा आहे. कमवती पत्नी ही फक्त स्वतःची बचत आणि माहेर भरणारी नसावी तर आपल्याही कुटुंबाला आधार देणारी असावी, अशी त्याचीही अपेक्षा आहेच. म्हणूनच एकमेकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन स्वतःमधील बदलाची तयारी ठेवून, निष्ठेने आणि मनापासून गुणदोषांसह आयुष्याच्या जोडीदाराचा स्वीकार केला तर लग्न हे दडपण न राहता खऱ्या अर्थाने एक आनंदसोहळा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com