#MokaleVha : मोबाईल अन् मुले

Mobile and child
Mobile and child

'शांभवी... आज मी तुला एकटीलाच बोलावले होते. मला तुझ्याशी सविस्तर बोलायचंय. तू मुलाला सोबत का घेऊन आलीस?'' 

'मॅडम... अहो, सोहम खूपच मागे लागला. आईकडे रहायलाच तयार होईना, पण आपल्याला बोलता येईल. तो येथेच मागे बसून राहील. आपल्याला काहीही त्रास देणार नाही. 

सोहमची चुळबूळ सुरू होती. आईची पर्स तो मागत होता... "आई... दे ना लवकर' असं म्हणून त्याचा हट्ट सुरू झाला होता. शांभवीने पर्समधील मोबाईल काढला, हेडफोन काढले, त्याच्या हातात दिले. त्याला मागच्या खुर्चीवर बसवलं आणि तिने माझ्याशी बोलायला सुरवात केली. 'मॅडम... आता दोन तास तरी तरी एका जागेवरून हा हलणार नाही आणि आपल्यालाही त्रास देणार नाही. गेम खेळत बसेल. एकदा त्याची गेम सुरू झाली, की त्याला कशाची शुद्ध नसते. त्यात तो चांगला रमून जातो. आणि आपलंही काम होतं.'' 

सहा वर्षांचा सोहम मोबाईल हातात घेऊन त्या स्क्रीनच्या दुनियेत हरवून गेला. मुलगा एकाजागी आणि शांत बसावा म्हणून शांभवीसारखे कितीतरी पालक मोबाईलचा आधार घेतात. प्रवासात मुले त्रास देऊ लागली, की त्यांच्या हातात मोबाईल देतात. लहान मुलाने जेवण करावे म्हणून मोबाईलवर गाणी लावून दिली जातात. कार्टून लावून दिली जातात. घरात पाहुणे आले... मुले दंगा करतात, बोलून देत नाहीत... अशा वेळी मोबाईल हातात देऊन त्यांना शांत बसवलं जातं. मुलं आजारी असतील तर त्यांना दुखवू नये म्हणून अगदी सहज त्याला मोबाईल हातात दिला जातो, आणि मुलांना त्याची इतकी सवय लागते की "स्क्रीन बघणे हा माझा हक्क आहे' असे मुलांना वाटू लागते. 

मोबाईलमधल्या खेळाचं, त्यात असणाऱ्या थ्रिलचे मुलांना आकर्षण वाटू लागतं. त्यातील दुनियेत ती हरवून जातात. त्यातच स्वतःची प्रतिमा शोधू लागतात. आपल्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणारी ही. कोणती शक्ती आहे याची जाण त्यांना नसतेच... तोच विचार करण्याचे त्यांचे वयही नसते. परंतु तरीही ती ब्लू व्हेल चॅलेंज, पोकेमन गो, अँग्री बर्ड, पबजी यांसारख्या खेळांच्या व्यसनाला बळी पडतात. स्क्रीन मिळाला नाही, की त्या दिवशी ती बेचैन होतात. शाळतेही त्यांचे लक्ष लागत नाही. अस्वस्थता वाढत राहते. ही परिस्थिती आता दिसू लागली आहे. 

बदलत्या जीवनशैलीत समाज माध्यमांशिवाय राहणे अगदी अशक्‍य आहे. त्यामुळे आपल्या मुलांना नवनवीन शिकायला मिळावे, मुले मागे पडू नयेत म्हणून मुलांच्या हातात वेगवेगळे स्क्रीन दिले जातात. मुले जन्माला यायच्या आधीपासूनच गर्भसंस्कार स्क्रीनच्या माध्यमातून केले जातात. मोबाईलवर विशिष्ट गाणे लावले, की गर्भातील अर्भकाची हालचाल जाणवते, असेही मी काही गरोदर महिलांकडून ऐकले आहे. दोन वर्षांच्या मुलांनाही मोबाईल हाताळणे सहज जमते. यु ट्युबवरील स्वतःच्या आवडीची गाणी ते स्वतः शोधून काढतात. "आताची स्मार्ट युगातील पिढी स्मार्टच आहे,' असे आपण सहज म्हणून जातो. पण या स्क्रीनचे किती दुष्परिणाम होतात याची सवय लागली, की काय होते हे डॉ. शीतल आमटे यांनी त्यांच्या एका लेखात स्क्रीनचा अतिवापर किती वाईट आहे याचे सविस्तर वर्णन केले आहे. सन 2011 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने यावर एक संशोधन केले असून, मोबाईलच्या स्क्रीनमधील रेडिएशन मुळे होणारे परिणाम वायुप्रदूषणाइतके घातक असल्याचे नमूद केले आहे.

कॅलिफोर्नियातील विद्यापीठात काही मुलांवर प्रयोग करण्यात आले आणि त्या संशोधनातून असे दिसून आले, की ज्या मुलांना गर्भात असल्यापासून आणि जन्मानंतर सतत इलेक्‍ट्रॉनिक स्क्रीनच्या जवळ ठेवण्यात आले होते, ती मुले इतर मुलांपेक्षा 50% अधिक चंचल बेचैन आणि आत्ममग्न असणारी होती. डॉ. ओम गांधी यांनी केलेल्या अभ्यासात त्यांनी असे म्हटले आहे, की मुलांची हाडे पातळ असतात, त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक स्क्रीनमधून येणारी रेडिएशन मुलांना मेंदू, डोळे याच्याच्या खोलवर जाऊन तेथील पेशी नष्ट करतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर याचा परिणाम होतो. मुले एकलकोंडी होतात. काही नैराश्‍यामध्येही जातात. 

मुले थोडी मोठी झाल्यानंतर म्हणजेच पौगंडावस्थेत गेल्यानंतर त्यांच्यात शारीरिक बदलही होत असतात. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी शाररिक आकर्षक निर्माण होते. आणि सर्वांत जवळचा आणि परिपूर्ण माहिती देणारा मित्र आपल्याजवळ आहे असे त्यांना वाटते, तो म्हणजे मोबाईल, इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीतून लैंगिकतेबद्दलची अवास्तव माहिती त्यांना नको त्या वयात मिळते आणि लैंगिक भावनेला उत्तेजन मिळाल्यामुळे लहान वयातच त्यांच्याकडून गुन्हे घडतात. 

मोबाईलचे व्यसन लागलेल्या या वयातील मुलांच्या दैनंदिनीबद्दल विचार केला तर लक्षात येईल, की या मुलांच्यातील एकाग्रता कमी होते. झोपेच्या, खाण्यापिण्याच्या सवयी बिघडलेल्या असतात. आंघोळीपासून अभ्यासापर्यंतच्या गोष्टी टाळल्या जातात किंवा पुढे ढकलल्या जातात. घरातील व्यक्तींशी संवाद कमी असतो... नातेसंबंध बिघडतात. मुले एकटी पडतात. काही मुलांचे मित्रही खूप कमी असतात. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण इंटरनेट हवंच अशी अवस्था निर्माण होते. सध्या तरुण वयातील अनेक मुले या प्रकारचे वर्तन करीत आहेत, हे दिसून येते. स्टॅनफर्ड विद्यापीठात झालेल्या अभ्यासात एका मानसशास्त्रज्ञाने इंटरनेटचा अतिवापर हा ऑबसेसिव्ह - कम्पलसिंव्ह डिसऑर्डर (OCD) या विकारामध्ये मोडतो असे म्हटले आहे. यामुळे एखाद्या गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देणं दुसऱ्याला दुखावणं, अशा सवयी लागतात आणि नातेसंबंधावर परिणाम होतोच, पण स्वतःच्याही भावनांचा निचरा करता न आल्याने न्यूनगंड, नैराश्‍य अशा मानसिक आजारांचेही प्रमाण वाढते आहे. 

आपल्या मुलांना आणि स्वतःला सोशल मिडियाचे व्यसन लागू नये म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुले अनुकरणातून शिकत असतात. पालक सतत मोबाईलवर असतील तर मुलांना ती सवय आपोआपच लागणार आहे. समाजमाध्यमांपासून लांब राहणे अशक्‍य असले तरी गरजेपेक्षा अधिक इंटरनेटचा वापर स्वतःच टाळायला हवा.

मुलांच्या हातात कमीत कमी वेळ स्क्रीन असेल असा प्रयत्न करायला हवा, त्यासाठी मुलांना इतर आवडीच्या छंदामध्ये गुंतवणे, त्यांच्याशी संवाद साधणे, मोकळ्या हवेत खेळायला नेणे, वैज्ञानिक खेळणी मुलांना देणे असे उपाय करून पाहावेत. मोबाईल हातात देऊन त्याला शांत बसण्यापेक्षा कागद-पेन्सील देवून चित्र काढायला देणे, वाचन, संगीत यांची आवड निर्माण करणे महत्त्वाचे आहे. 

सोशल मिडियाच्या वापराबाबत जागरूक होऊन त्याचा वापर आपल्या विकासासाठी आणि गरजेपुरता करायचा ठरवलं आणि याबाबतच कौशल्य आत्मसात केलं तर त्याचे दुष्परिणाम टाळणे सहज शक्‍य आहे. आजची पिढी स्मार्ट घडवायची असेल तर पालकांनी स्मार्ट होणं गरजेचं आहे. योग्यवेळी योग्य माध्यमांचा उपयोग करून मुलांना आभासी जगापासून दूर ठेवून वास्तवाची ओळख देणं आणि नियंत्रित वापराबाबत मुलांना समज द्यायला हवी. फेसबुक, व्हॉटसऍप, स्नॅपचॅट, यु ट्युब, इन्स्टाग्राम यापासून दूर राहणं मुलांना शक्‍य नाही. कारण प्रवाहाच्या सोबत जावं लागणार आहे. परंतु याचा वापर हे व्यसन होऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com