नकारात्मकतेपासून मन दूर ठेवायचंय? 'हे' करा! (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

तुमच्या मनात सतत काय चालू असते, याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? आपले मन सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात हिंदोळत असते. नेहमी घडून गेलेल्या गोष्टींचा किंवा काय करायचेय, याचा विचार करत राहते.

मनाच्या या स्थितीची, उदा. आता हा लेख वाचत असताना तुमच्या मनात काय चालले आहे याची जाणीव असणे, हे ज्ञान आहे. पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवर जाऊन माहिती मिळू शकते. उदा. वजन कसे कमी करावे, मुलाखतीची तयारी कशी करावी वगैरे. पण, स्वतःच्या मनाची सजगता पुस्तक वाचून येत नाही. मनाची आणखी एक वृत्ती अशी की, ते नकारात्मकतेला चिकटून राहते.

उदा. दहा सकारात्मक घटनांच्या नंतर एक नकारात्मक घटना घडल्यास मन त्या नकारात्मक घटनेला चिकटून राहील. दहा सकारात्मक घटना सहज विसरते, मात्र ध्यानामुळे तुम्हाला या दोन्ही वृत्तींची जाणीव होते. तुमचे मन तुम्ही वर्तमानकाळात परत आणू शकता. आनंद, उल्हास, उत्साह, क्षमता आणि परिणामकारकता या सर्व गोष्टी वर्तमान क्षणातच आहेत. मानवी मन फार गुंतागुंतीचे आहे. तुम्ही ध्यान करून तुमच्या मनावर संस्कार केलेत तर, मनाची नकारात्मकतेला चिकटून राहण्याची वृत्ती नाहीशी होऊन जाते. तुम्हाला वर्तमान क्षणात राहण्याची क्षमता मिळते आणि भूतकाळाला सोडून देणे जमू लागते. 

मनाच्या स्थितींचे संतुलन साधणे 
तुमच्या जीवनात आव्हानात्मक परिस्थितीत योग्य निवड करण्यासाठी मनाच्या विशेष दक्षतेची गरज असते. अशा परिस्थितीत मनाच्या वेगवेगळ्या स्थिती निर्माण होतात. या स्थिती तुमच्या परवानगीने येत नाहीत. उलट, त्या नेमक्‍या आपल्या इच्छेच्या विरुद्ध असतात. ध्यानाने मनाच्या निरनिराळ्या स्थितींमध्ये संतुलन आणता येते. ध्यान न करण्यामागचे लोकांचे सर्वांत मोठे कारण म्हणजे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, एकदा ध्यान करू लागल्यावर त्यांच्या लक्षात येते, की त्यांच्याकडे बराच वेळ आहे. ते आता मन नीट एकाग्र करू शकतात. जास्त काम होते. इतकेच नाही, तर ध्यानाच्या नियमित साधनेमुळे भावी घटनांचा अंदाज येण्याची क्षमता वाढते. मनाच्या एकाग्रतेने दक्षता वाढते आणि विश्राम करण्याने मनाची विशालता वाढते. दैनंदिन जीवनात ध्यानाचा समावेश करण्याने चेतनेची पाचवी स्थिती, म्हणजे वैश्‍विक चेतनेचा उदय होतो. वैश्‍विक चेतना म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड हा स्वत्वाचाच भाग आहे, हे जाणणे. यामुळे, प्रेमाची भावना वाढते. आपल्या जीवनातील विरोधी शक्ती आणि त्रास यांना सहन करण्याची शक्ती मिळते. क्रोध आणि नैराश्‍य हे लाटेप्रमाणे क्षणिक भावना बनतात. 

ध्यान म्हणजे या क्षणाचा स्वीकार करणे आणि प्रत्येक क्षण पूर्णपणे सखोलतेने जगणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Sri Sri Ravishankar in All is Well of Sakal Pune Today