कला - मुलांच्या संगोपनाची!

श्री श्री रविशंकर
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
‘कोणतेही मूल आपल्या पालकाचा वारसा चालवते,’ असे पूर्वी म्हटले जायचे. केवळ आर्थिक नव्हे, तर दृष्टिकोन, वर्तन आदींच्या वारशाचाही यात समावेश होतो. एखाद्याचे जीवन आणि व्यक्तिमत्त्वाला चार घटकांमुळे आकार येतो. यातील एक चतुर्थांश हिस्सा पालकांकडून येतो. आणखी एक चतुर्थांश शिक्षण, संगोपन, लोकांशी संपर्क आदींमधून मिळतो. कर्म आणि स्वत:चे अनुभव हे उर्वरित घटक होय. पालकच आपल्या मुलाच्या आयुष्याची अगदी सुरवातीची पायाभरणी करतात. मूल पालकांचे अनुकरण करतच शिकण्याची सुरवात करते. मुलांची निरीक्षणशक्ती सामान्यतः अधिक असते. ती प्रत्येक क्षणी, प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करतात.

पालक रागावतात, खोटे बोलतात किंवा लोकांचा तिरस्कार करतात, तेव्हा मुले हे सर्व ग्रहण करत असतात. त्याचवेळी बहुतेक पालकांना याची जाणीवही नसते. पालकांनी तणावमुक्त असणे महत्त्वाचे असते, कारण पालकांचा ताण किंवा आनंद आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व, वृत्ती मुलांमध्ये हस्तांतरित होत असते. पालक हिंसक वृत्तीचे असतील तर मूलही हिंसक बनते. ते समर्पित असतील तर मुलांमध्येही समर्पणाचे बीज रूजते. त्यानंतर, ती खरोखरच समर्पित आणि परिपक्व होतात. एकीकडे पालकांनी आपली मुले अति आक्रमक न होण्याची काळजी घेतली पाहिजे, दुसरीकडे ती अजिबात प्रतिकार न करणारी न होण्याविषयीही सावध राहावे. मुलांचा कल आक्रमक होण्याकडे असल्यास पालकांनी त्यांना सौम्य बनवायला हवे.

त्याचप्रमाणे, ती अतिलाजाळू आणि नाजूक होत असतील तर त्यांना खंबीर बनविणे हेही पालकांचेच कर्तव्य आहे. आपल्या मुलांमध्ये न्यूनगंड किंवा अहंगंड निर्माण होऊ न देणे, हे पालकांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान होय.

अनेक कुटुंबात पालक मुलांना साधे रागावतही नाहीत, त्यांना हव्या असलेल्या मार्गावरून जाऊ देतात. त्यामुळे, मुले पूर्णपणे कमकुवत होतात. दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाची अतिकाळजी करून त्यांना भयप्रधान किंवा पूर्णपणे बंडखोर बनवतात. खरंतर, सृजनशील, आत्मविश्‍वासू आणि भावनिकरीत्या परिपक्व असलेली मुले बनविणे हे पालकांचे कौशल्यच आहे.

त्याचप्रमाणे, मुलामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण न होता त्यांना चुकांची जाणीव करून देण्याचे कौशल्य पालकांनी शिकण्याचीही गरज आहे. त्याचप्रमाणे, परकेपणाच्या भावनेची भीती न बाळगता चुकांची कबुली देण्याचे धैर्यही मुलांमध्ये रुजवायला हवे. ‘तुमचा मुलगा किंवा मुलगी १६ वर्षांची झाल्यावर त्यांच्याशी मित्रासारखे वागा,’ असे संस्कृतमध्ये म्हटले जातेच. त्यांचे शिक्षक होऊ नका. त्याचप्रमाणे, त्यांना काय करावे आणि काय करू नये, हेही सांगू नका.

तुम्ही केवळ मित्राप्रमाणे त्यांच्या अडचणी जाणून घ्या. तरच, ती तुमच्यासमोर अधिक व्यक्त होतील. कोणताही पूर्वग्रह न बाळगता मुलांना सत्यवादी व्हायलाही शिकवायला हवे. हा पूर्वग्रह मुलांच्या बुद्धिमत्तेआड न येण्याची खात्रीही पालकांनी करावी. आजच्या जगात लोक वंश, धर्म, व्यवसायासह अनेक गोष्टींबद्दल पूर्वग्रह बाळगला जातो. मुलांना सर्वांशी मैत्री करताना मनमोकळा संवाद साधता यायलाच हवा. त्यांना आपली दृष्टी विशाल आणि मुळे खोल रुजविण्यासाठी वाव मिळणे महत्त्वाचे आहे. नैतिक आणि धार्मिक मूल्ये न शिकविलेली मुले पुढे उन्मळून पडतात. वृक्षाला फांद्या फुटल्याप्रमाणे आधुनिकीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया असून वृक्षाप्रमाणेच मुलांची मुळे घट रुजायला हवीत. प्रत्येक मुलाला स्वत:च्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांची, संस्कृतीची थोडीतरी माहिती व्हायला हवी. त्यामुळे तिरस्कार टळेल. पालकांनीच प्रेरक आणि सल्लागार व्हावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar all is well sakal pune today