मनातील गाठी सोडवताना (श्री श्री रविशंकर)

मनातील गाठी सोडवताना (श्री श्री रविशंकर)

चेतना तरंग
सत्संग म्हणजे वास्तवाची सोबत होय. सत्याच्या सहवासात राहणे म्हणजे सत्संग. केवळ तुम्हाला माहीत नसलेली अवघड, गुंतागुंतीची गाणी म्हणणे म्हणजे सत्संग नव्हे. संगीत हा सत्संगाचा एक भाग. तर्क हा त्याचा दुसरा भाग होय. सखोल ध्यानातील प्रतिसाद आणि स्वत:सोबतच राहणे हा सत्संगाचा तिसरा भाग आहे. त्यासाठीची योग्य गोष्ट तरी कोणती, ज्यामुळे तुम्हाला हलकेफुलके वाटेल. तुमच्या विचारापेक्षा समस्या खूपच क्षुल्लक भासतील. तुमच्या समस्यांना अतिशयोक्तीपूर्ण दाखविणारा सत्संग खरा नव्हेच. तुम्ही लोकांचा आपल्याबद्दलचा विचार पूर्णपणे सोडून देता आणि स्वत:शीच प्रामाणिक, विश्‍वासू बनता, तोच खरा सत्संग होय. सामान्यतः उत्सवी लोक खोलात जात नाहीत, तर शांतता अनुभवणारे लोक उत्सव साजरा करीत नाहीत. मात्र, सत्संगात शांतता आणि उत्सव दोन्हींचे मूल्य राखले जाते.

तुमच्यामध्ये खोलवर शांतता निर्माण करणे हाच संगीताचा, तर आयुष्यात गतिशीलता आणणे हा शांततेचा हेतू असतो. संगीत हे ‘लाया योग’ आहे. लाया हा समाधीचा (दिव्यत्वाशी एकता) सर्वांत उच्च प्रकार आहे. आवाज ऊर्जेचा प्रकार आहे. तुमचे संपूर्ण शरीर अणूपासून बनले आहे. तुम्ही भजन म्हणता तेव्हा आवाजरूपी ऊर्जेची कंपने तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणात शोषली जातात. मायक्रोफोन आवाज शोषून त्याचे रूपांतर इलेक्‍ट्रिसिटीत करतो, त्याचप्रमाणे हे आहे. शरीर ही कंपने जाणिवेत बदलते. तुम्ही बसून गप्पा मारता किंवा हिंसक वृत्ती भडकावणारे संगीत ऐकत असाल तर ते तुमच्या शरीराकडून शोषले जाते. त्यातून तुमच्यात फारशी चांगली भावना निर्माण होत नाही. तुम्ही ज्ञान प्राप्त करत असता किंवा मनापासून मंत्रपठण करत असता तेव्हा तुमच्यातील जाणिवेची पातळी उंचावते. तुम्ही सत्संगात बसता तेव्हा तुमचे पूर्ण शरीर ऊर्जेत मिसळून जाते आणि रूपांतर घडते. यामुळे तुमच्यात ऊर्जा पल्लवित होते आणि चैतन्य निर्माण होते. आवाजाची ऊर्जा सहजपणे मनात शिरते. आपले शरीर पृथ्वी, जल, हवा, अग्नी आणि अवकाश या पंचतत्त्वांनी बनलेले असते. अवकाशाचा स्वभाव आवाजाचा आहे आणि आवाज सर्वांना एकत्र करतो. तुमच्या संपूर्ण शरीरात आवाजाचा प्रतिध्वनी उमटत राहतो. मन आणि चैतन्य अशाच प्रकारे तयार होते. आपले मन आणि चैतन्य किंवा जाणीव खूप प्राचीन आहे. अगदी हजारो वर्षांपूर्वीची.

तुम्ही जाणिवेच्या विविध पातळ्यांवर जाता तेव्हा तिथे वेगवेगळ्या भाषा असतात. आपल्या जाणिवेची सर्वाधिक जुनी पातळी संस्कृतसारखी जगातील सर्वांत जुनी भाषा समजू शकते. आपण बसलेलो असतो, विचार करतो किंवा गप्पा मारतो तेव्हा प्रत्येकाचे मन विविध प्रकारे विचार करतो. कुणीही एकसारखा विचार करत नाही. मात्र, संस्कृत भजन म्हटल्यावर प्राचीन असणारे मनही या सर्व जुन्या भजनांचा प्रभाव ओळखते. भजन, मंत्र मनावर खोल ठसा उमटवतात. एखाद्या ब्रशच्या धाग्याप्रमाणे ते मनातील सर्व गाठी दूर करतात. मंत्राचा अर्थ माहीत नसला तरी आपण तो म्हणतो, तो त्याच्या सकारात्मक फायद्यामुळेच. केवळ अर्थापेक्षाही आवाज महत्त्वाचा ठरतो. तुम्ही गाणे म्हणता तेव्हा डोळे झाकून संगीताशी एकरूप व्हा. भजन म्हणजे गाणे म्हणणे नसून ती एक प्रकारची देवाणघेवाण आहे. सत्संग, ध्यान, भजन आदींतून जीवन तालबद्ध होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com