वैवाहिक जीवन फुलविण्यासाठी...

sri sri ravishankar
sri sri ravishankar

चेतना तरंग
गैरसमज किंवा चुका : केवळ शब्दांमधूनच संघर्ष सुरू होतो. त्याचप्रमाणे लोक संपत्तीही शब्दांच्याच माध्यमातून मिळवतात. त्यामुळेच शब्द खूप मोजून वापरायला हवेत. सामान्यत: लोकांमध्ये काही गैरसमज असतात, तेव्हा ते ‘चल आपण याबद्दल बोलूयात,’ असे म्हणतात. मात्र त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही पुढे चला. त्याचप्रमाणे जोडीदाराकडे भूतकाळाबाबत कोणतेही स्पष्टीकरण मागू नका. चूक झाल्यावर ती घडून गेलेली असते, एवढेच. दुसरे काही नाही. पुढे चला. तुम्ही चूक केल्यावर तुमच्याकडे दुसरी व्यक्ती त्याचे स्पष्टीकरण मागते, हे चित्र डोळ्यासमोर आणा. या वेळी स्वतः स्पष्टीकरण देणे किंवा अगदी स्वतःचे समर्थन करणेही अवघड बनते. त्याचे एक प्रकारचे ओझे होते. इतर व्यक्तीच्या मनात अपराधित्वाची भावना निर्माण होऊ देऊ नका.

आपला जोडीदार नाराज असेल, तर दुसऱ्याने शांत राहायचे असते. दोघेही एकावेळी नाराज झाले, तर मोठीच समस्या निर्माण होते. आपला जोडीदार नाराज आहे, हे लक्षात घेऊन त्याला किंवा तिला पुरेसा वेळ द्यायला हवा. तुम्ही या वेळी जोडीदाराला तू नाराज का आहेस, असे विचारता कामा नये. एखादा जोडीदार नाराज झाल्यास दुसरा रागावतो आणि त्याच्याकडून नाराज न होण्याची अपेक्षा करतो. ही मोठीच चूक होय.

   प्रेमावर शंका नको : तुम्ही जोडीदाराच्या प्रेमावर शंका उपस्थित करू नका. तुम्हाला तो प्रेमळ न वाटल्यास त्याच्यावर तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस, असा आरोप करू नका. त्याऐवजी तू माझ्यावर इतके प्रेम करतोस का, असे विचारा. कल्पना करा, कुणी तुमच्यावर तुम्ही त्यांच्याबाबत दयाळू नसल्याचा आरोप सतत करत असेल. तुम्ही मित्रत्वाने वागत नसल्याचे म्हणत असेल, तर तुम्हाला काय वाटेल. सदासर्वकाळ केवळ तक्रारी करणाऱ्या व्यक्तीचा सहवास कुणालाच हवाहवासा वाटत नाही. सतत स्पष्टीकरण द्यावे लागणाऱ्या आणि प्रेमाचा पुरावा मागणाऱ्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला तरी आवडेल का? हे एक प्रकारचे ओझेच, त्यामुळे, तुम्ही कंटाळून जाल. चांगला सहवास नेहमीच तुमच्यातील चैतन्य जागवतो. एखादी व्यक्ती चांगल्या मनःस्थितीत नसल्यास तिला चल विसरून जा, पुढे चल, असे म्हणणारी व्यक्ती सर्वांनाच आवडते. इतरांना प्रेरित करणाऱ्या, उत्साही व्यक्तीचा सहवास सर्वांनाच आवडतो. त्याचप्रमाणे, प्रश्‍न, शंका विचारणारी, स्पष्टीकरण मागणारी व्यक्ती कुणालाच आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला प्रश्‍न विचारू नका. सतत तक्रारही करू नका. जोडीदाराकडे मागणी करू नका. मागण्या प्रेम नष्ट करतात. त्याचे तुमच्यावर प्रेम आहे, हे गृहीत धरा.

स्वतःसारखे राहा : तुम्ही नैसर्गिक आणि साधे राहा. नातेसंबंध नैसर्गिकरीत्या विकसित होऊ द्या. तुम्ही ते विकसित करण्याचा प्रयत्न करता तेव्हा काहीसे कृत्रिम होता. त्यामुळे तुमचे वर्तनही कृत्रिम होते. एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते तुमच्या लक्षात येतेच. अशावेळी तुम्ही दूर निघून जाता. तुम्हाला खुल्या मनाची, नैसर्गिक, प्रामाणिक व्यक्ती आवडते, तुम्हीही मग तसेच व्हा, मग इतरांना आवडाल. तुम्ही स्वतःचेच राहा, नैसर्गिक राहा. माफ करण्यामुळे आणि वर्तमानक्षणात राहण्यामुळे खूपच फरक पडतो. वेळेबरोबर पतीपत्नींना एकमेकांच्या अपेक्षा, समाधानात बदल होत असल्याचे जाणवते. योग आणि ध्यानाच्या सरावामुळे नातेसंबंध अधिक चांगले होतात. त्यामुळे, व्यक्ती प्रभावीरीत्या संवाद साधण्यास शिकते. संयमी बनते. माफ करण्यास शिकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com