बांधिलकी विस्तारताना...

Sri-Sri-Ravishankar
Sri-Sri-Ravishankar

चेतना तरंग
सामान्यत: आपल्याला असे वाटते, की आपल्याकडे स्रोत हवा, त्यानंतरच आपण बांधिलकी पत्करू. मात्र अधिक बांधिलकी पत्कराल तितके स्रोत तुमच्याकडे आपोआप येतील. त्यामुळेच तुम्ही एका जागी बसून आपल्याकडे स्रोत कसे येतील, याची काळजी करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट करण्याचा तुमचा हेतू असल्यास गरज तसेच वेळेनुसार स्रोत प्रवाहित होतात.

तुम्ही सहजपणाने करू शकता तीच गोष्ट करत असाल, तर काहीही प्रगती होणार नाही. तुम्ही स्वतःलाच स्वतःच्या मर्यादेबाहेर थोडेसे ताणायला हवे.

त्यामुळे तुमची क्षमता वाढेल. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे शहर किंवा समाजाची काळजी घेतली, तर ती फार मोठी गोष्ट नव्हे. कारण तुमच्यामध्ये तेवढी क्षमता सहजच आहे. मात्र, ही क्षमता ताणून राज्याची काळजी घेण्याची बांधिलकी पत्करलीत, तर आवश्‍यक ताकद तुम्हाला मिळेलच.

तुम्ही स्वतःच्या क्षमता, बुद्धिमत्तेनुसार जबाबदारी घेता, त्याप्रमाणात आनंदही वाढतो. त्यानंतर, तुम्ही दैवी शक्तीतील एक होऊन जाता. तुम्ही समाज, पर्यावरणासाठी काहीतरी करता, त्या प्रमाणात तुमचीही भौतिक, आध्यात्मिक प्रगती होत जाते. हे असे हृदय आपण प्रत्येकाच्या हृदयाचा एक भाग आहोत, ही जाणीव बाळगते. केवळ स्वतःचाच विचार करत बसणे, हेच निराश होण्याचे तंत्र आहे. तुम्ही बसता आणि केवळ विचार करता, माझे काय, माझ्याबाबत काय घडेल अशा विचारांतून तुम्ही पूर्णपणे निराश व्हाल.

इतरांचा आनंद आणि दु:ख वाटून घेणे हाच वैयक्तिक स्तरापासून वैश्‍विक जाणिवेपर्यंत स्वतःला विस्तारण्याचा मार्ग आहे. तुम्ही वेळेनुसार ज्ञानाचा विस्तार केल्यास नैराश्‍य येणार नाही. तुमचा सर्वांत आतील स्रोत हा आनंद आहे. वैश्‍विक दुःख वाटून घेणे हा वैयक्तिक दुःखावर मात करण्याचा उपाय होय. त्याचप्रमाणे वैश्‍विक आनंद वाटून घेणे हा वैयक्तिक आनंद वाढवण्याचा मार्ग होय. त्यामुळे तुम्ही माझे काय, मी या जगापासून काय मिळवू शकतो हे विचार न करता मी जगासाठी काय करू शकतो हा विचार करा. प्रत्येकजण समाजाबद्दलच्या आपल्या योगदानाचा विचार करेल, तेव्हाच एक दैवी समाज तयार होईल. त्यासाठी आपण आपल्या वैयक्तिक जाणिवा शिक्षित आणि सुसंस्कृत बनवायलाच हव्यात. बांधिलकी आपल्या सोयीला ओलांडते, तेव्हाच ती जाणवते. त्यामुळे सोयीचे आहे, त्याला तुम्ही बांधिलकी म्हणू शकत नाही. तुम्ही केवळ सोय किंवा अनुकूलतेबरोबर गेल्यास तुमची बांधिलकी अधिक गैरसोय निर्माण करेल. सामान्यत: सोयीचे असते ते आरामदायी ठरत नाही. ते तसा भ्रम तयार करते. बांधिलकी आपले स्वातंत्र्य कमकुवत करेल किंवा हिरावून घेईल, असे एखाद्याला वाटते.

एखाद्या आळशी व्यक्तीला बांधिलकी हा छळ वाटेल, मात्र तेच त्याचे सर्वोत्तम औषध होय. बांधिलकी उच्च, महान असेल तितकी ती सर्वांसाठी चांगली असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com