सदगुण, दुर्गुण आणि ज्ञान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही खूप नशीबवान आहात, ही एकच गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही हेच विसरता तेव्हा खिन्न होता. खेद तुमची दुर्गुण, सद्‌गुणांबद्दलची आसक्ती दर्शवितो. तुमचे दुर्गुण तुम्हाला खिन्न करतात, पण तुम्ही स्वतःला महान समजता तेव्हा इतरांना दोष देऊ लागता; ही गोष्टदेखील तुम्हाला खिन्न करते. संपूर्ण आनंदरूप असलेल्या आत्म्याकडे तुम्हाला परत आणणे, हा शोकाचा उद्देश असतो. मात्र, हा समज प्रत्यक्ष ज्ञानातून-जाणिवेतून येतो. ज्ञान शोकाला आत्म्याचा मार्ग दाखवते. ज्ञानाशिवाय शोक संपत नाही, तर उलट वाढतो. ज्ञान शोकास संपविते.

केवळ ज्ञानाच्या सहाय्यानेच तुम्ही दुःखाच्या पलीकडे जाऊ शकता. या मार्गावर तुमच्यापाशी सर्व काही आहे. हे सुंदर ज्ञान सर्व आस्वादांनी परिपूर्ण आहे. चातुर्य, हास्य, सेवा, शांती, गायन, नर्तन, उत्सव, यज्ञ, तक्रारी, प्रश्न, गुंतागुंत आदींचा त्यात समावेश होतो. तुम्हाला पुण्याईमुळेच श्रद्धा प्राप्त होऊ शकते. तुमच्यापाशी श्रद्धा नसल्यास तुम्हाला आंतरिक सुख मिळणार नाही आणि प्रापंचिक सुखही लाभणार नाही. श्रद्धेमुळे आनंद उमलतो. आनंदामुळे शारीरिक जाणीव राहत नाही. दुःख आणि वेदनांमध्ये तुम्ही शारीरिक जाणिवेला घट्ट धरून ठेवता. तुम्ही आनंदात असता, तेव्हा तुम्हाला शरीराचे भान नसते. पण दुःखी असल्यावर तुम्हाला शरीरातही दुःखाची, पीडेची जाणीव होते.

प्रश्न -  साधना करताना शरीराच्या निरनिराळ्या भागांवर ध्यान का केंद्रित केले जाते?
गुरुदेव - बाण पुढे जावा यासाठी तो धनुष्याच्या प्रत्यंचेला लावून मागे खेचावा लागतो. याप्रकारे शरीराच्या निरनिराळ्या भागांवर ध्यान लावल्याने शारीरिक बंधांपासून मुक्तता लाभते.

तुम्ही दुःखी असल्यास तप, वैराग्य आणि शरणागती यापैकी कशाचा अभाव आहे ते पाहा. परिस्थिती सुखद असो की दुःखद, वर्तमान क्षणाचा पूर्ण स्वीकार करणे म्हणजे ‘तप’. ‘मला काही नको’ आणि ‘मी कुणी नाही’ असा वैराग्याचा, ‘शरणागती’चा अर्थ आहे. मी इथे आपल्याकरिता, आपल्या आनंदाकरिता आहे. तुम्ही असंतुष्ट असल्यास या तिन्हींची उणीव आहे. परिस्थितीला तप मानून तुम्ही स्वीकार केलात, तर तुम्ही असंतुष्ट राहणार नाही. ‘मला काही नको’ या वैराग्याच्या अवस्थेत तुम्ही कुरकुर करणार नाही आणि तुम्ही शरणागत व्हाल तेव्हाही तुमची काही तक्रार असणार नाही. तुम्ही असे आपल्या इच्छेने केले नाहीत, तर नंतर हताश होऊन कराल. ‘हे असे काही जमणार नाही,’ असे सुरवातीला तुम्ही म्हणाल. पण शेवटी रागाने आणि निराशेने तुम्ही म्हणाल, ‘‘मी हरलो, मला काही नको.’’ माझ्यापाशी दुसरा कोणता पर्याय नाही, खड्ड्यात जाऊ दे.’’ तप, वैराग्य, शरणागती या तिन्ही गोष्टी तुमचे मन पवित्र बनवतात आणि तुम्हाला आनंदित करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today