सद्‌गुणांचे ऋणी व्हा

Ravishankar
Ravishankar

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
प्रश्न - परमेश्वर समृद्ध, संपन्न व परिपूर्ण आहे आणि आपण सारे परमेश्वराशी जोडलेले आहोत. तरीही काहीजण वगळता आम्हा सर्वजणांवर कर्ज कसे? त्यांच्याकडे सर्व काही आणि आमच्याकडे मात्र काही नाही, असे का?
उत्तर -
 तुम्हाला फक्त पैसाच कमी पडतो का? तुम्ही म्हणता मी ऋणी आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला काहीतरी मिळाले आहे, नाहीतर तुम्ही ऋणी कसे व्हाल? ज्यांना काही मिळाले त्यांनी आपण ऋणी आहोत, असे समजावे. जास्त समृद्धी असेल, तितके जास्त ऋणी आहोत, असे तुम्हाला वाटेल आणि तुमच्यात कृतज्ञता व ऋणी भाव निर्माण होईल आणि तेव्हा तुमच्याकडे समृद्धी येईल. स्वतःला ऋणी समजा, कृतज्ञ व्हा. त्यातून समृद्धी वाढते. समृद्धी आणि ऋण हे एकत्र राहतात. तुम्हाला वाटते तुम्ही ऋणी आहात, पण तुम्ही खरे तसे नसता. तरीही तुम्ही पूर्णपणे ऋणी आहात असे वाटणे, हे बरे आहे. कारण तुमच्याकडे आहे ते तसेही तुमचे नाहीच - अगदी तुमच्या शरीरासकट. तुम्ही तुमचे शरीर, ज्ञान, तुम्हाला मिळालेल्या गोष्टी आणि तुमचे स्वतःचे आयुष्य याबद्दल अमर्याद ऋणी असता, तेव्हा तुम्ही त्या विधात्याची समृद्धी अनुभवता.

सद्‌गुण 
सद्‌गुण हे अभ्यासपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्हाला गृहीत धरावे लागते की, ते आहेतच. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ‘‘अर्जुना, दुःख करू नकोस, तू सद्‌गुणांसोबतच जन्मला आहेस.’’ जिज्ञासूने हे लक्षात ठेवायला हवे की, तो सदगुणांबरोबरच जन्मला आहे. नाहीतर तो जिज्ञासू होऊच शकला नसता. तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्यात सद्‌गुण नाहीत आणि मग ते मिळविण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्ही अपयशी व्हाल. बहुतेक वेळा तुम्ही सद्‌गुणांच्या आधारावर स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना करता.

तुमची त्यांच्याबरोबर तुलना करू नका. तुम्ही ज्याचे कौतुक करता ते दुसऱ्यांमधील सद्‍गुण ओळखा. हे समजून घ्या की, ते तुमच्यात बीजाच्या स्वरूपात आधीपासूनच स्थिर आहेत. तुम्ही फक्त त्याचे संवर्धन करायचे आहे. जीवनमूल्ये तुमचा स्वभावच बनेपर्यंत त्यांचा सराव करा. मित्रत्व, करुणा आणि ध्यान हे तुमचा स्वभावच आहेत, हे जाणवेपर्यंत त्यांचा सराव चालू ठेवा. एखादे कार्य करताना तुम्ही त्याच्या परिणामाकडे लक्ष देता, ही त्यातील त्रुटी. ती कृती स्वभावतःच घडते तेव्हा तुम्ही त्याच्या परिणामात अडकत नाही आणि ती कृती तुम्ही सहज करत राहता. तुमच्या स्वभावातूनच होते ती क्रिया थकवा आणि निराशा येऊ देत नाही. उदा. दात घासणे, स्नान करणे हे तुमच्या जीवनाशी इतके एकरूप झाले आहेत की, यांसारख्या दैनंदिन आन्हिकांना कार्य असे असतच नाही. हे करताना कोणताही कर्ताभाव नसतो. सेवा ही तुमच्या स्वभावाचा भाग बनून जाईल, तेव्हा ती कर्ता-भावाशिवाय होत राहील.

प्रश्न - करुणा, ध्यान आणि सेवा हे स्वभावच झाले आहेत, हे कसे जाणवते?
उत्तर -
 जेव्हा तुम्ही त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com