वैराग्य आणि विश्रांती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही आनंदी असता, तेव्हा मन प्रसरण पावते. वेळ खूप छोटा वाटतो. तुम्ही दुःखी असता, तेव्हा मन आकुंचित होते आणि वेळ खूपच मोठा वाटतो. मनाचा समतोल असतो, तेव्हा तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. काळाच्या आघातापासून मुक्तता करून घेण्यासाठी बरेचजण मद्यप्राशन करतात, झोपतात. पण मन सुस्त असते किंवा थाऱ्यावर नसते, तेव्हा ते स्वत्वाचा अनुभव घेऊ शकत नाही. समाधी (न-मन अवस्था किंवा समयातीतता) ही खरी शांती आहे. काही क्षणांची समाधी मनाला खूप शक्ती देते. मनाला निरोगी करण्याचे हे सगळ्यात मोठे साधन आहे. विचार म्हणजे बाकी काही नसून या क्षणी उठलेला एक तरंग आहे. त्या क्षणालासुद्धा त्याचे स्वतःचे मन आहे, असे एक विशाल मन, ज्याच्याकडे संघटनांची अनंत शक्ती आहे. झोप लागण्यापूर्वी आणि झोपेतून उठल्याक्षणी जाणिवेच्या संधिप्रकाशाच्या क्षणी मनापलीकडील कालातीत अवस्थेचा अनुभव घ्या. जीवन हे आकार आणि निराकार यांचा सुंदर संयोग आहे. भावनांना आकार नसतो; पण त्याच्या साक्षात्काराला आकार असतो. आत्म्याला आकार नाही, पण त्याच्या वस्तीस्थानाला आकार आहे. त्याचप्रमाणे सुज्ञपण आणि कृपा यांना आकार नाही, तरीपण ते आकारातून व्यक्त होतात. निराकाराला क्षुल्लक लेखण्याने तुम्ही जड, भोगवादी आणि त्रासलेले व्हाल. आकाराला क्षुल्लक लेखण्याने तुम्ही सर्वसंग परित्यागी, भ्रमित व्हाल किंवा भावनेच्या स्तरावर कोलमडून जाल.

वैराग्य : गाढ शांततेतून ईश्वर अवतरतो कृतीवरून नाही. तुमची सर्व आध्यात्मिक कृत्ये ही तुम्हाला निःशब्द करण्यात मदत करणारी असतात. तुम्ही परमानंद आणि शांतता यांचा आनंद घेणे सोडत नाही, तेव्हाच तुमची प्रगती होते; अन्यथा आसक्ती उफाळून येते. अस्तित्वच तुम्हाला शांती आणि आनंद देऊ इच्छित असेल, तर उत्तम! कारण आनंद हाच तुमचा स्थायिभाव आहे. पण, आनंद उपभोगण्याच्या नादात तुम्ही ‘आहे-पणा’पासून, ‘मी काही आहे’, ‘मी शांत आहे’, ‘मी आनंदी आहे’ या विचारस्थितींमधून घसरत जाल आणि पाठोपाठ येते, ‘मी दुर्दैवी आहे’. ‘मी आहे’ असे म्हणायला धैर्य लागते. ‘मी आहे’ हेच वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे सर्वांचा स्वागतपूर्वक स्वीकार करणे. तुम्ही कुठेही असाल तिथे निःपक्षपाती राहू शकता. वैराग्य हे एकाग्र ऊर्जा जागवते. ऐहिक सुखात गुंतल्याने निष्क्रियता येते. तुम्ही वैराग्यात असाल तर आनंद तिथेच आहे. वैराग्य कमतरतेचा भाव काढून टाकते, तर तीव्र इच्छा विपुलतेचा अभाव दर्शविते.

सर्वत्र विपुलता, समृद्धता आहे, तेव्हा वैराग्य आपोआप येते आणि वैराग्य असते, तिथे समृद्धी, विपुलता सहज येते. कार्य आणि विश्रांती हे जीवनाचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. या दोन्हीमध्ये संतुलन राखणे हे एक कौशल्यच आहे. केव्हा काय हवे आणि किती हवे हे समजण्यात सुज्ञपणा आहे.

विश्रांतीत कार्य आणि कार्यात विश्रांती - यांना एकमेकांत शोधणे - हीच अंतिम मुक्ती आहे. कामापेक्षा, कठीण कामाची आठवणच थकव्याला जास्त कारणीभूत होते. तुम्ही खूप मेहनत केली आहे या विचाराने विश्रांतीची गुणवत्ता बिघडते. काही लोक परिणामांची पर्वा न करता नुसती मेहनत करण्यातच अभिमान बाळगतात, त्यांना हे माहीत नसते की काही न करणेही विश्रांती आहे. विश्रांती थोडी असली तरी चांगल्या प्रतीची विश्रांती तजेला आणते. विश्रांतीची गरज असेल तेव्हा तुमचे शरीर ती आपोआपच घेईल.

विश्रांतीची गरज आहे याचा विचार न करता, ती घेणे हे जास्त विश्रांतीदायक आहे. इच्छारहितता, वैराग्य आणि समाधी या तीन पूर्ण विश्रांती आहेत. विश्रांतीची गरज आहे हा विचार तुम्हाला बेचैन करतो. खूप काम करायचे आहे या विचारानेच थकवा येतो. खूप मेहनत केली आहे या विचाराने स्वतःची कीव येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today