esakal | शार्दूल पुन्हा फॉर्मात! (सुनंदन लेले)
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul-Thakur

घोट्याच्या दुखापतीतून सावरून भारतीय संघात परतल्यावर शार्दूल ठाकूर हा क्रिकेटपटू पुन्हा फॉर्मात आला आहे. चांगला खेळ करून ठसा उमटवता आल्यानं त्याचा विश्‍वास वाढला आहे. शार्दूलशी प्रत्यक्ष संवाद साधून मांडलेला त्याचा प्रवास. 

शार्दूल पुन्हा फॉर्मात! (सुनंदन लेले)

sakal_logo
By
सुनंदन लेले saptrang.saptrang@gmail.com

मुंबई हे क्रिकेटचं माहेरघर असं म्हटलं, तर त्या क्रिकेटचं आजोळ शिवाजी पार्क आहे. दादर, शिवाजी पार्क भागातून किती क्रिकेटपटू पुढं आले याची मोजणी कठीण होईल. काही खेळाडूंकरता घर जवळपास असल्यानं शिवाजी पार्कवर क्रिकेटचे पहिले धडे गिरवायला जाणं त्या मानानं सोपं गेलं. शार्दूल ठाकूरकरता मात्र सगळंच खूप कठीण होतं- कारण तो मूळचा पालघरचा. अंतर पटकन समजावं म्हणून सांगतो, की शिवाजी पार्क ते बोरिवली अंतर २७ किलोमीटर आहे आणि बोरिवली ते शिवाजी पार्क अंतर ८७ किलोमीटरचं आहे. भारतीय संघात विश्‍वासाचं स्थान पुन्हा मिळवलेल्या शार्दूल ठाकूरशी गप्पा मारण्याचा योग जमून आला आणि त्याचा क्रिकेट प्रवास ऐकून त्याच्याबद्दलचं प्रेम अधिक वाढलं. त्याच्याशी झालेल्या गप्पा त्याच्याच शब्दात मांडतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरुवातीचा काळ 
तसं बघायला गेलं, तर मी गावाकडचा. मला पालघरचा असल्याचा सार्थ अभिमान आहे. लहान असताना मुंबईला खेळायला यायचो, तेव्हा काहीसं बुजायला व्हायचं. मुंबईच्या मुलांची स्टाईल बघून वाटायचं, की काही कमतरता तर नाही ना आपल्यात? कारण त्यांची क्रिकेट किट्स मस्त असायची. चालणं, बोलणं एकदम झकास. गावाकडं सगळं नाही बघायला मिळत. मीच नाही; पण गावाकडून येणारी सगळीच मुलं असाच विचार सुरुवातीला करतात. मग जरा रुळायला लागलो. एक होतं- मी क्रिकेट खेळायला खूप प्रवास करायचो. त्या प्रवासानं मला मानसिकदृष्ट्या कणखर बनवलं. आमचं घराणंच खेळाडूंचं होतं. माझे वडील नरेंद्र ठाकूर क्रिकेटबरोबर उत्तम व्हॉलिबॉल खेळायचे. काका जगन्नाथ ठाकूर उत्तम क्रिकेटपटू होते. तेच गुण माझ्यात आले असावेत. 

बारा वर्षांचा असल्यापासून पालघरहून मी बोरिवलीला येत होतो, तेव्हा एका बाजूचाच प्रवास दोन तासांच्या पुढचा व्हायचा. मला रेल्वे प्रवासात इतकी माणसं अनुभवायला मिळायची. जीवनाशी जुळवून घ्यायला तिथंच शिकायला मिळतं. अडचणीतून मार्ग काढायला तोच प्रवास शिकवतो. झालं गेलं विसरून जाऊन परत नव्या दमानं कामाला लागायला तोच प्रवास उपयोगी पडला. क्रिकेटमध्ये असंच असतं, की एखादा दिवस खराब जातो; पण त्याचा विचार करून मग चुका सुधारून नव्यानं दम लावावा लागतो. दोन तास प्रवास, मग तीन तास सराव आणि मग परत दोन तास प्रवास करून मला घरी जाता यायचं. इतकंच म्हणीन, की केलेल्या कष्टांचं चीज झालं. 

लाड सरांची शिकवणी 
शालेय क्रिकेटमध्ये मी एकदा चांगला खेळ केला; पण आमचा संघ हरला. समोरच्या स्वामी विवेकानंद शाळेचे प्रशिक्षक दिनेश लाड सर माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांनी मला लगेच बोरिवलीला शिफ्ट करायचा आग्रह धरला. लाड सर नुसते बोलले नाहीत, तर त्यांनी पुढील वर्षी मला स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश मिळवून दिला. शाळेचे मुख्याध्यापक पटेल सरांनी सगळ्याच क्रिकेटपटूंना शाळेच्या फीमध्ये सवलत दिली. इतकंच नाही, तर बऱ्याच वेळा मी दोन किंवा तीन दिवसांचा सामना असला, की खेळ झाल्यावर सरांच्या घरीच झोपायला जायचो. नुसता मीच नाही तर रोहित शर्मावरही सरांनी असंच प्रेम केलं. लाड सरांचं ते प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही. 

लाड सरांनी किती मुलांना मदत केली असेल क्रिकेट देव जाणे. सरांची अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी कोणाही मुलाकडून खास प्रशिक्षणाकरता वगैरे कधी पैसे घेतले नाहीत. मुलगा चांगला असला आणि त्याच्यात क्रिकेट खेळण्याची क्षमता आणि मेहनत करायची वृत्ती दिसली, की लाड सर त्याच्याकरता वाट्टेल ते करायचे. प्रशिक्षक म्हणून दिनेश लाड सर नेहमी सगळ्या खेळाडूंना नैसर्गिक खेळ करायला प्रोत्साहन द्यायचे. क्रिकेटची संस्कृती जपत खेळण्याबाबत ते कमालीचे आग्रही होते. त्यांचा संस्कारांचा ठसा माझ्या मनावर कायमचा उमटलेला आहे. 

मुंबईच्या वयोगटातल्या क्रिकेट संघात जाणं मला खूप कठीण गेलं नाही. याचं कारण होतं- मी नुसता वेगवान गोलंदाज नव्हतो, तर मी बऱ्यापैकी चांगली फलंदाजी करायचो. लाड सरांनी सरळ बॅटनं खेळायचे धडे गिरवून घेतले होते, त्याचा हा परिणाम असेल. त्यातून मुंबई क्रिकेटमध्ये लहान वयात कोणी आडव्या बॅटनं खेळताना दिसला, तर कधीकधी पायचित नसतानाही पंच त्याला बाद द्यायचे. फलंदाजाला सरळ बॅटनं खेळण्याचं महत्त्व पटावं म्हणून कदाचित ते असे करत असावेत. तो काळ असा होता, की मी माझ्या काकांच्या घरी बोरिवलीला राहायचो. माझे काकाही चांगलं क्रिकेट खेळले होते. 

मुंबई क्रिकेटचा देदीप्यमान इतिहास मी अभ्यासला होता. मला आठवतं ते म्हणजे पालघरला खेळत असताना मार्केटकर नावाचे पंच सामन्यांना यायचे. काहीसे वयस्कर होते ते. मुंबई क्रिकेटचा त्यांना खूप अभिमान होता. ते मला मुंबई क्रिकेटच्या कमाल कहाण्या सांगायचे. कोणी दुखापत असताना सामना लढवला, तर कोणी कठीण काळातून संघाला सावरून सामना जिंकू कसा दिला अशा त्या रोमांचक कहाण्या ऐकून मी पेटून उठायचो. त्यामुळे मुंबई रणजी संघात निवड झाली, तेव्हा मात्र मी हरखून गेलो होतो. सुरुवातीच्या वर्षातच मला दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरसोबत रणजी संघात जागा मिळाली होती. ती मोठी शिकवणी होती माझ्याकरता. सचिन सामन्याकरता कशी तयारी करतात हे जवळून बघायला मिळालं- ज्याचा मोठा परिणाम माझ्या मनावर झाला. 

यश-अपयशाची सापशिडी 
सन २०१४-१५च्या मोसमात मी ४८ बळी मिळवले होते आणि २०१५ -१६ क्रिकेट मोसमात मी रणजी अंतिम सामन्यात ८ बळी मिळवले- ज्यामुळं निवड समिती माझ्याकडे अजून बारकाईनं बघू लागली, असं मला वाटतं. सन २०१६च्या वेस्ट इंडीज दौऱ्याकरता माझी भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली- जो माझ्याकरता प्रचंड आनंदाचा क्षण होता. पदार्पणाच्या सामन्यात मला दुखापत झाली, तेसुद्धा केवळ काही चेंडू टाकल्यावर- तेव्हा खूप वाईट वाटलं. त्यानंतर परत खेळून मी काही उपयुक्त कामगिरी भारतीय संघाकरता केली; पण गेल्या वर्षी माझ्या घोट्याला दुखापत झाली. काय सांगू, दुखरा घोटा घेऊन मी दीड वर्षं खेळलो होतो; पण जोशामध्ये कमी नव्हती.

डॉक्‍टरांनी ऑपरेशनकरता घोटा उलगडला, तेव्हा खूप दुखापत झल्याचं लक्षात आलं- कारण मी खेळणं चालू ठेवलं होतं. मात्र, ऑपरेशन चांगलं केलं गेलं. पाच महिने मेहनत करून मी ऑपरेशननंतर परत क्रिकेट मैदानावर उतरलो. 

या सर्व घडामोडींतून इतकंच समजलं, की दुखापत होणं कोणाच्या हाती नाही. कष्ट करणं आणि दुखापत होऊ नये म्हणून प्रयत्न करणं आपल्या हाती आहे. त्यातून जर दुखापत झाली, तर खेळाडूनं तो जीवनाचा भाग असल्याचं समजून त्यातून सावरायला सज्ज व्हायला पाहिजे. मला बऱ्याच खेळाडूंनी हेच समजावलं, की जे झालं ते झालं हे समजून घ्यायला पाहिजे. दुसरं समजलं म्हणजे कठीण काळातून गेल्यावर ‘आपली माणसं कोण’ याची ओळख पटली. 

माझं नशीब इतकं चांगलं, की भारतीय संघात मला विराट कोहलीच्या आणि आयपीएल संघात मला आता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायची संधी मिळाली आहे. दोघं कमाल खेळाडू आहेत आणि दोघांची संघाला हाताळण्याची शैली वेगळी आहे.

विराट कोहली आक्रमक कर्णधार आहे. त्याला समोरच्या संघाला संधी हाती आल्यानंतर चेपून टाकायला आवडतं. धोनीची खासियत अशी आहे, की सामना कितीही अडचणीत गेला तरी त्यातून मार्ग काढायची क्षमता त्याच्या सुपीक डोक्‍यात असते. धोनीभाई विकेटकीपर असल्यानं त्यांना गोलंदाज काय करतो आहे आणि फलंदाज काय कोनातून फटके मारायची शक्‍यता आहे याचा खूप जबरदस्त अंदाज असतो. दोघांनाही खेळाडूंना कसं हाताळायचं, हे बरोबर उमगतं. खूप शिकायला मला मिळालं आहे दोघांकडून. विराटने फिटनेसची अविश्‍वसनीय पातळी गाठली आहे. आम्हा सगळ्यांकरता तो आदर्श आहे. 

लय कायम ठेवायची आहे 
घोट्याच्या दुखापतीतून सावरून भारतीय संघात परतल्यावर मला चांगला खेळ करून ठसा उमटवता आल्यानं विश्‍वास वाढलाय. लोकांनी माझ्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा केली नव्हती. तो चांगला धक्का मी देऊ शकलो याचा आनंद होतो. मी सरळ बॅटनं फलंदाजी करू शकतो याचा मला आत्मविश्‍वास होता. त्यानं आडव्या बॅटनं फटके मारणंही जमतं. अत्यंत अटीतटीचे सामने खेळताना मला मजा येते आहे. कधी बॅट हाती घेऊन तर कधी शेवटचं षटक टाकून मी संघाला विजय हाती घ्यायला मदत करू शकलो. विराट कोहलीनं मला त्याची पावती ट्विटरवरून दिली तेव्हा मजा वाटली. 

मी इतकंच म्हणीन, की रणजी पदार्पण केल्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास धमाल झालाय माझा. माझ्या घरच्यांनी मला खूप मोलाची साथ दिली आहे. मुंबई क्रिकेटच्या खूप खेळाडूंनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आता फक्त मला चांगल्या खेळाची लय कायम ठेवायची आहे. त्याकरता डोकं शांत ठेवून मेहनत करायची आहे. सामन्यात कामगिरी होईल का नाही, सामना जिंकू का नाही असे विचार मागं ठेवून चांगला भक्कम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे.