घुसमटलेलं संगीत

घुसमटलेलं संगीत

चौकटीतली ‘ती’ 
अनुराधा राय. एकेकाळची लोकप्रिय कलावंत. जिच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका रेडिओवर नेहमी वाजत असतात अशी गुणसंपन्न गायिका. तेवढीच देखणी व कुशल नृत्यांगना देखील! आता ‘एकेकाळची’ एवढ्यासाठी म्हणायचं की लग्नानंतरच्या पाच-सहा वर्षांत तिचं संगीत पार कोमेजून गेलंय. ती आता अनुराधा राय नसून अनुराधा चौधरी आहे. डॉ. निर्मल चौधरीची अर्धांगिनी. निर्मल एके काळी तिचं गाणं ऐकून तिच्या प्रेमात पडलेला. तीही त्याच्यावर तेवढंच प्रेम करणारी. पण तो वृत्तीनं सेवाभावी, आदर्शवादी, परोपकारी डॉक्‍टर. वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी शहरात राहिलेला, पण गावी असलेल्या त्याच्या आईचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यामुळं लग्नानंतर जाणीवपूर्वक खेड्यात राहून गरीब रोग्यांची सेवा करण्याचं व्रत अंगीकारणारा. अनुराधाच्या वडिलांनी खरंतर दीपक हा लंडनहून शिकून आलेला मुलगा तिच्यासाठी पसंत करून ठेवलेला असतो. दीपकला संगीतनृत्यादी कलांमध्ये रुची, त्यामुळंच अनुराधाच्या गाण्यावर तो लुब्ध असतो. पण अनुराधाच्या मनात निर्मलनं घर केलेलं. खेड्यात राहायला निघालेल्या निर्मलसारख्या डॉक्‍टरशी लग्न करणं तिच्या वडलांना मुळीच पसंत नसतं. अखेर एके दिवशी अनुराधा घरातून निघून जाऊन निर्मलशी लग्न करते. त्याच्यासोबत गावाकडे संसार थाटते.

‘खेड्यामधले घर कौलारू’ वगैरे रंजन म्हणून ठीक असलं तरी प्रत्यक्षात निर्मलचं गाव गरिबी, रोगराई यांनी वेढलेलं असतं. निर्मल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आसपासच्या गावांतल्या रुग्णांवर मोफत उपचार करत असतो. सायकलीवर, प्रसंगी पायपीट करून तो हिंडत असतो. परिसरातले लोक त्याला देवदूत मानत असतात. रोगराईबद्दलचं गावकऱ्यांचं अज्ञान तो आपल्या परीनं दूर करत असतो. या साऱ्या धबडग्यात साहजिकच घराकडे त्याचं लक्ष नसतं. त्यानं संध्याकाळी लवकर घरी येऊन आपल्याला फिरायला न्यावं, किमान रात्री थकल्या-भागल्या अवस्थेत परत आल्यानंतर चार घास खाऊन विश्रांती घ्यावी, आपल्याशी बोलावं ही तिची अपेक्षा; पण निर्मल घरीदेखील अभ्यासात, संशोधनात गढून गेलेला. त्याच्या या दिनक्रमानं अनुराधा निराश होते. संगीतात मन रमवण्याचा प्रयत्न ती करते, पण इथल्या वातावरणात तिचं संगीत फुलतच नाही. मधल्या काळात दोघांना एक मुलगी होते. तिला सांभाळत ती स्वत:चं दु:ख विसरायचा प्रयत्न करते. ‘लोकांच्या आजारावर संशोधन करत असतोस, पण माझ्या दु:खाचं कारण तू कधी जाणून घेतलंस का?’ ती चिडून त्याला विचारते. त्यावर त्याचं उत्तर ‘काय करू? माझं कामच असं आहे की तुझ्याकडं, घराकडं बघायला मला वेळच मिळत नाही. मी स्वत: काही मौजमजा करत हिंडत नाही. या लोकांच्या सेवेला मी वाहून घेतलंय...’ 

योगायोगानं, नव्हे, ‘अपघातानं’च दीपक पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. दीपक प्रवासात असताना निर्मलच्या गावापाशी त्याच्या मोटारीला अपघात होतो. जखमी झालेल्या दीपकला निर्मल स्वत:च्या घरी उपचारासाठी आणून ठेवतो. तब्येत सुधारत असतानाच अनुराधाच्या संसाराचं वास्तव दीपकच्या नजरेला येतं. तिचं गाणं ऐकून तर तो चकितच होतो. कारण एवढ्या वर्षांनंतरही तिचं गाणं सोन्यासारखं लखलखीत राहिलेलं असतं. दीपक तिला या चक्रातून बाहेर पडण्याचा, शहरात जाऊन गाणं फुलवण्याचा सल्ला देतो. त्याच्या सल्ल्यामुळं तिच्याही आकांक्षा पल्लवित होतात. मनाच्या उद्विग्न अवस्थेत ती निर्मलला घर सोडणार असल्याचं सांगते. समंजस स्वभावाचा निर्मल तिला संमती देतो. दुसऱ्या दिवशी पहाटे दीपक तिला न्यायला येतो. ‘अनुराधा, गाडी आलीय’, असं सांगत निर्मल खाली येतो तर काय, अनुराधा घरात झाडलोट करण्यात दंग. तो तिला कारण विचारतो तेव्हा ती म्हणते, ‘मला थांबवून ठेवायचं धाडस तुझ्यात नाही, हे कबूल, पण निदान ‘जा, चालती हो माझ्या घरातून’ एवढं तरी एकदा म्हण. तेवढा देखील अधिकार नाही का तुझा माझ्यावर?’ पुढच्याच क्षणी त्याच्या छातीवर डोकं ठेवत ती अश्रूंना वाट मोकळी करून देते. निर्मल तिला जवळ घेतो. दीपक निघून जातो. एक घर मोडतामोडता पुन्हा सावरलं जातं. 

हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अनुराधा’ (१९६०) या चित्रपटाची ही नायिका साकारली होती लीला नायडू या १९५९ मधील ‘मिस इंडिया’ ठरलेल्या अँग्लो इंडियन अभिनेत्रीनं. प्रियकराशी लग्न करण्यासाठी वडलांचं घर सोडणारी अनुराधा संगीतकलेसाठी नवऱ्याचं घर सोडण्याचा विचार मात्र अखेरच्या क्षणी मागं घेते. आयुष्यातलं संगीत पार कोमेजून गेलं तरी ती घर सोडत नाही, यामागचं कारण काय? पूर्वापार रूढी? संस्कार? समाजाचे नीतिनियम? की पतीविषयी आत कुठं तरी असलेली आस्था?’... आणि अखेर ते सुखानं राहू लागले’ या छापाचा शेवट असूनही ‘अनुराधा’ तिकीटबारीवर चालला नाही. मग नायिकेला ‘बंडखोर’ दाखवण्याचा विचार साठ वर्षांपूर्वी करणं तर केवळ अशक्‍य! असो. हृषीकेश मुखर्जींचं तरल दिग्दर्शन, राजेंद्रसिंह बेदींचे हृदयाला भिडणारे संवाद, पंडित रविशंकरांचं काळजाला स्पर्श करणारं संगीत यांनी हा चित्रपट संस्मरणीय झाला. बाकी अनुराधा जिंकली की हरली, हा प्रश्‍न ज्यानं त्यानं आपल्या परीनं सोडवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com