तिखटजाळ!

सुनील देशपांडे
शनिवार, 25 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

चौकटीतली ‘ती’ 
गुजरातच्या सौराष्ट्र भागातलं एक छोटंसं खेडं. काळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधीचा. मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची वाळवून तिखट, मसाला तयार करून पाठवला जात असतो. सरकारचा कर गोळा करण्यासाठी अधूनमधून सुभेदाराची स्वारी येत असते. सोबत शिपायांचा लवाजमाही असतो. विदेशी सरकारचे हे देशी हस्तक म्हणजे गावकऱ्यांचे कर्दनकाळच जणू! घोड्यांवर स्वार होऊन आलेले हे शिपाई दोन-चार दिवस मुक्काम ठोकणार, गावातल्या शेळ्या, कोंबड्या जबरदस्तीनं उचलून फस्त करणार, असा जोर-जबरदस्तीचा खाक्‍या. गावचा भ्रष्ट सरपंच आपली गैरकृत्यं झाकण्यासाठी रंगेल सुभेदाराची सर्व प्रकारे ‘बडदास्त’ ठेवायला सज्ज असतो. याही वेळी नदीकिनाऱ्यावर सुभेदाराचा पडाव असाच पडलेला. नदीवर पाणी भरायला आलेल्या स्त्रियांच्या घोळक्‍यातली एक स्त्री सुभेदाराच्या नजरेला पडते.

त्याच्या मनात भरते, पण ती त्याला दाद देत नाही. पहिल्याच भेटीत सुभेदाराला चार शब्द सुनावून निघून जाते. ती असते सोनबाई. कष्ट करून, आब राखून घर चालवणारी. लोचट पुरुषी नजरा ओळखत अशा लोकांना त्यांची जागा दाखवून देणारी. तिचा नवरा मात्र महाआळशी. कोणत्याही कामावर न टिकणारा. त्यातच त्याला रेल्वेची नोकरी लागल्यानं तो शहराकडे निघून जातो. ती एकटीच राहते हे कळताच सुभेदाराची वासना भडकते. काहीही करून सोनबाईला वश करायचंच, या ध्यासानं तो वेडापिसा होतो.

पुन्हा एकदा तो तिला नदीवर गाठतो. बळजबरीनं तिचा हात पकडतो. सोनबाई त्याच्या कानशिलात लगावून पळून जाते. अपमानानं सुभेदाराचा तिळपापड होतो. त्याच्या हुकमावरून शिपाई तिचा पाठलाग करत जातात. त्यांना चुकवत सोनबाई मिरची-मसाल्याच्या कारखान्यात आश्रय घेते. सुभेदारासाठी आता हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कारखान्याचा मालक, गावचा सरपंच यांना धमक्‍या देत तो सोनबाईला आपल्यासमोर हजर करण्याचा हुकूम सोडतो. कारखान्याचा वृद्ध चौकीदार अब्बूमियाँ मात्र तिला अभय देतो.

शिपाई बाहेरून दरवाजावर धडका मारतात, धमक्‍या देतात. पण चौकीदार त्यांना भीक घालत नाही. गावकऱ्यांच्या वतीनं सरपंच सुभेदाराकडे रदबदली करू पाहतो. पण ‘सोनबाई हवीच’ या हट्टानं तो पेटलेला असतो. ‘माझं ऐकलं नाहीत तर सारा गाव जाळून टाकीन,’ या त्याच्या धमकीनं गावकरी संकटात सापडतात. कारखान्यात अडकून पडलेल्या अन्य स्त्रियाही सोनबाईला हा ‘दुराग्रह’ सोडून सुभेदाराची इच्छा पूर्ण करण्याचा सल्ला देतात. परंतु स्वत:च्या शीलरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेली सोनबाई तो सल्ला धुडकावून लावते. त्यातच कामगारांमधल्या एका महिलेला फीट येते. सगळ्याजणी तिला सावरतात. गरोदर असलेल्या दुसऱ्या एकीची धसक्‍यानं प्रसूती होते. तेही संकट कसंतरी निभावतं. पण बाहेर शिपायांचा पहारा तसाच असतो.

एका असहाय क्षणी सोनबाई सुभेदाराकडं जायला तयार होतेसुद्धा. पण अब्बूमियाँ तिला धीर देत अडवून ठेवतो. सुभेदारानं ग्रामस्थांना दिलेली मुदत संपताच शिपाई दरवाजा तोडून कारखान्यात घुसतात. अब्बूमियाँ गोळीबारात मारला जातो. वासनांध सुभेदार सोनबाईजवळ पोचतो. ती त्याच्या तावडीत येणार तोच-कारखान्यातल्या अन्य स्त्रिया सुभेदारावर थेट चाल करून येतात. पोत्यावर रचून ठेवलेली लाल तिखटाची भुकटी पोत्यासकट त्याच्या तोंडावर फेकून मारतात. एकापाठोपाठ एक झालेल्या त्या तिखटजाळ माऱ्यानं सुभेदार कोसळतो. नेस्तनाबूत होतो.

प्रख्यात गुजराती लेखक चुनीलाल मडिया यांच्या ‘अंत:स्रोत’ या कथेवर दिग्दर्शक केतन मेहता यांनी बनवलेल्या ‘मिर्च मसाला’ (१९८७) या चित्रपटातली ही खंबीर सोनबाई रंगवली होती स्मिता पाटीलनं. स्मिताच्या अकाली मृत्यूनंतर काही दिवसांतच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तिच्या अभिनयाचा आणखी एक धगधगता आविष्कार समोर आला. हा संपूर्ण चित्रपट स्मितानं तोलून धरला होता. अर्थात, यात लेखक-दिग्दर्शकाचा वाटाही तेवढाच मोलाचा. सोनबाई स्वाभिमानी आहे, पण उर्मट नाही. नवऱ्यानं कामधंदा करावा यासाठी तिचा जीव तिळतिळ तुटतो. पण हाच नवरा नोकरी लागली म्हणून शहराकडं जायला निघतो, तेव्हा ती व्याकूळ होत ‘जाऊ नको, शहर माणसांना गिळून टाकतं,’ असं त्याला विनवते.

घोड्यावर बसलेल्या सुभेदाराला पाहून नदीवरच्या अन्य स्त्रिया पळून जातात तेव्हा सोनबाई त्याच्या नजरेला नजर भिडवत, ‘या ठिकाणी माणसं पाणी पितात, जनावरांना पाणी पाजण्याची जागा पुढं आहे,’ असं थंडपणे सुनावते. त्यावर ‘या जनावराला पाणी पाजणार का?’ या सुभेदाराच्या निर्लज्ज सवालावर ‘माणसाप्रमाणं पाणी पिण्यासाठी आधी कमरेत वाकून हाथ पुढं करावा लागतो,’ या शब्दांत ती त्याचं तोंड बंद करते. असे अनेक प्रसंग स्मितानं कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता केवळ डोळ्यांच्या बोलीनं साकार केले. डोक्‍यावर दोन-दोन कळशा ठेवून चालण्यातली तिची सहजताही लक्षात राहणारी. सिनेमा संपल्यानंतर आठवणीत राहते ती ‘प्रत्यक्ष माझ्या नवऱ्यानं सांगितलं तरी मी सुभेदाराकडं जाणार नाही,’ असं ठामपणे म्हणणारी स्मिता आणि तिच्या नजरेतला तो तप्त अंगार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Sunil Deshpande maitrin supplement Smita Patil sakal pune today