थॉट ऑफ द वीक : पूर्वग्रह व निर्णयक्षमता

Thought-of-the-week
Thought-of-the-week

ऑफिसमध्ये आज बरीच हालचाल दिसत होती. सर्वजण मीटिंगकडे डोळे लावून बसले होते. आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. मीटिंगचा परिणाम सर्वांसाठी निर्णायक होता. खास करून तेजससाठी. तेजस, हुशार व महत्त्वाकांक्षी तरुण. त्याने एम.बी.ए. फायनान्स करून खासगी कंपनीमध्ये करिअर सुरू केले. हुशार असल्याने त्याला बढती लवकर मिळाली. कॉलेजमध्ये त्याचे मित्र त्याच्या हुशारीचा गैरवापर करत, त्याच्याकडून काम करून घ्यायचे; श्रेय मात्र तेजसला देत नसत. ‘आपल्या हुशारीचा गैरवापर होत आहे,’ असे तेजसला वाटू लागले. माझ्या हुशारीचा गैरवापर मी होऊ देणार नाही, असे त्याने ठरविले. ‘माझ्यावर कायम अन्याय होतो,’ असा त्याचा पूर्वग्रह झाला. प्रत्येक परिस्थितीकडे तो ‘माझ्या हुशारीचा गैरवापर होतो आहे व माझ्यावर अन्याय होतो,’ याच पूर्वग्रहातून पाहायचा. एक दिवस त्याला समजले की, कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर अनेक नवीन लोकांची नेमणूक केली आहे. तेजसच्यावरही एका बॉसची नेमणूक झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आपल्यावर अन्याय होतोय व माझ्या हुशारीचे श्रेय नवीन बॉसला मिळेल,’ या पूर्वग्रहाने तो अस्वस्थ झाला. याच अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी तेजसने राजीनामा दिला. आजची मीटिंग याच संदर्भात होती. मीटिंगमध्ये तेजसचा राजीनामा स्वीकारला होता. ऑफिसमधील शेवटच्या दिवशी तो नवीन बॉसला भेटला. भेट पूर्ण होताच तेजसला अश्रू अनावर आले. त्याला एक सत्य उलगडले होते. तेजसच्या चालू कामाचा भार कमी करून, नवीन प्रोजेक्टबरोबरच परदेशात काही काळ जाण्याची संधी त्याला मिळणार होती. आता खूप उशीर झाला होता. तेजसने जेवढे दिसले-ऐकले त्यावरच विश्‍वास ठेवून, पूर्वग्रहाने व्यापलेल्या मन:स्थितीने निर्णय घेतला व सोन्यासारखी संधी गमावली. 

तेजससारखेच आपणही रोज वेगवेगळे निर्णय घेत असतो. प्रत्येक निर्णयाचा परिणाम स्वतःवर व आपल्या भोवतालच्या लोकांवर होत असतो. एखादा बिकट प्रसंग आला की, आपण कोणता निर्णय घेतो यापेक्षा आपली निर्णय घ्यायची प्रक्रिया आपली निर्णयक्षमता ठरविते. या प्रक्रियेमध्ये पूर्वग्रह हा महत्त्वाचा घटक आहे. काही पूर्वग्रह निर्णयक्षमता अधिक जागरूक करतात. उदा. ‘पूर्ण माहिती घेऊन व वेळ घेऊन निर्णय घ्यावा,’ हा पूर्वग्रह नक्कीच योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. पण, तेजसप्रमाणे ‘माझ्यावर कायमच अन्याय होतो,’ हा पूर्वग्रह ठेवल्यास निर्णय चांगला परिणाम देत नाहीत. पूर्वग्रह आपल्या निर्णयक्षमतेवर कसे परिणाम करतात ते पाहू.

1) निर्णयापेक्षा त्याचे परिणाम निर्णयाला योग्य/अयोग्य ठरवतात. त्या परिणामांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील आपले पूर्वग्रह ठरवितात. त्यामुळे, निर्णयक्षमता अधिक बलवान करण्यासाठी, कमकुवत करणारे पूर्वग्रह सोडावेत.

2) आहे त्या परिस्थितीकडे जागरूकपणे पाहिल्यास पूर्वग्रह मनावर विपरीत प्रभाव पाडत नाहीत. अंतर्मनात अयोग्य पूर्वग्रहांचा संच असला, तर आपण क्षणिक शांतता मिळावी म्हणून निर्णय घेतो. यामध्ये शांती मिळते पण परिस्थितीवरचा उपाय नाही.

3) ‘पूर्वग्रहसंचित’ मनात, अस्तित्वात नसलेली भीती जन्म घेते व निर्णयक्षमता कमकुवत करते. अनेकदा भीती दूर करण्यासाठी निर्णय घेतले जातात पण परिस्थिती तशीच राहते.

4) पूर्वग्रहामुळे समोर आलेल्या परिस्थितीकडे आपण एकाच दृष्टिकोनातून पाहतो व अजागरूकतेकडे वाटचाल करतो. पूर्वग्रहाने व्यापलेली निर्णयक्षमता भावी पिढीलीही नकळत शिकवत असतो व नंतर त्याचेच अंधानुकरण होते.

पूर्वग्रहामुळे निर्णयक्षमता जन्म घेते. कोणते पूर्वग्रह उपयुक्त आहेत व कोणते कमकुवत निर्णय घेण्यास भाग पडतील, याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. पूर्वग्रह आपली निर्णयक्षमता ठरवितात, त्यामुळे स्वतःला विचारा ‘मला परिस्थितीचे क्षणिक समाधान हवे की एक जागरूकतेने शोधलेला उपाय हवा?’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com