थॉट ऑफ द वीक : अपेक्षापूर्तीचा संघर्ष

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच info@supriyapujari.com
Friday, 11 September 2020

सध्या आपण स्व-जागरूकता या विषयाचा अभ्यास करत आहोत. स्वजागरूकता म्हणजेच कोणत्याही प्रसंगांचा आपल्या भावविश्वावर होणारा परिणाम ‘जसा आहे तसा’ पाहणे व अनुभवणे. कोणताही ‘अर्थ व निष्कर्ष’ न लावता. स्वजागरूकतेचा मार्ग खूप आनंददायी आहे. तो आनंद घेण्यासाठी आधी त्यातील अडथळे समजून घेणे व त्यावर मात करणे आवश्यक आहे. हे अडथळे आपल्याला खूप काही शिकवतात.

सध्या आपण स्व-जागरूकता या विषयाचा अभ्यास करत आहोत. स्वजागरूकता म्हणजेच कोणत्याही प्रसंगांचा आपल्या भावविश्वावर होणारा परिणाम ‘जसा आहे तसा’ पाहणे व अनुभवणे. कोणताही ‘अर्थ व निष्कर्ष’ न लावता. स्वजागरूकतेचा मार्ग खूप आनंददायी आहे. तो आनंद घेण्यासाठी आधी त्यातील अडथळे समजून घेणे व त्यावर मात करणे आवश्यक आहे. हे अडथळे आपल्याला खूप काही शिकवतात. मात्र, आपण त्याकडे जागरूकतेने पाहत नाही. आपण सुरवातीला ‘पूर्वग्रह’ हा स्वजागरूकतेमधील पहिला अडथळा समजून घेतला. स्वजागरूकतेमधील दुसरा अडथळा म्हणजे ‘भीती’ व त्याचे अनेक प्रकार आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम व त्यावरचा उपाय समजून घेतला. स्वजागरूकतेमधील तिसरा अडथळा आज समजून घेऊ. तो म्हणजे ‘अपेक्षापूर्तीचा संघर्ष.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकदा रोहनने त्याच्या बायकोसाठी सरप्राईज बर्थडे साजरा करायचा ठरवला. त्याला सुचेल तशी मनापासून सर्व तयारी केली. काही मित्र-मैत्रिणींना बोलावले व तो बायकोची वाट पाहत बसला. बायको कशी प्रतिक्रिया देईल, याची कल्पना करू लागला. बायको घरी येताच तिला सरप्राईज मिळाले; पण ती नेहमीसारखी आनंदी व उत्साही वाटली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने बायकोला याचे कारण विचारताच बायकोने तिचा अपेक्षाभंग झाल्याचे सांगितले. हे कळताच रोहनदेखील उदास झाला- कारण त्याने खूप मेहनत करून तयारी केली होती. बायकोची हवी तशी प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे त्याचाही अपेक्षाभंग झाला होता. खरे म्हणजे चूक कोणाचीच नव्हती; पण अपेक्षाभंग मात्र दोघांचाही झाला.

आपल्या आयुष्याचा आधार आपली अपेक्षा असते. कधी कौतुकाची अपेक्षा, कधी प्रेमाची, कधी सन्मानाची तर कधी प्रतिष्ठेची अपेक्षा. थोडा सखोल विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की या अपेक्षा इतर गोष्टींमध्येही प्रामुख्याने दिसतात. उदाहरणार्थ, जोडीदाराकडून अपेक्षा, मित्र परिवाराकडून अपेक्षा, पालकांकडून अपेक्षा, पाल्यांकडून अपेक्षा इत्यादी. आपण नुसत्या अपेक्षाच नाही, तर त्या अपेक्षांच्या व्याख्या व वर्णनं मनात स्पष्ट करीत असतो. काही जवळच्या लोकांकडून केलेली सर्वांत महत्त्वाची अपेक्षा म्हणजे ‘आपल्याला नक्की काय हवे हे समोरच्याने न सांगता ओळखावे.’ आपण कळत नकळत आपल्या भावना, आपला वेळ व आपले प्रेम त्याच व्यक्तींना देतो जे आपली अपेक्षा पूर्ण करतात. जोपर्यंत लोक आपली अपेक्षा पूर्ण करतात, तोपर्यंत आपल्याला ते हवेहवेसे वाटतात; पण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी मात्र आपण काय करतो? आजपर्यंतचे जपलेले जिव्हाळ्याचे नाते, चांगला दृष्टिकोन व सकारात्मक विचार क्षणात नाहीसे होतात व आपण पूर्वग्रह बाळगतो. पूर्वग्रहाचा परिणाम कसा होतो हे आपल्याला माहिती आहेच. अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळी जन्म घेतो ‘अपेक्षापूर्तीचा संघर्ष.’

हा संघर्ष लहान गोष्टींपासून चालू होतो खरा; पण तो कालांतराने असंतोष, बदला घेण्याची भावना व कटुता निर्माण करतो. मग निरपेक्ष व्हावे का, लोक आपल्याकडून अपेक्षा करतात त्याचे काय, असे प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभाविक आहे. याची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रथम या संघर्षाचा उगम शोधायला हवा. संघर्षाचा उगम व त्यावर उपाय आपण आगामी लेखात पाहू. लक्षात ठेवा, तुम्ही अपेक्षा करणे व त्या पूर्ण होण्यासाठी संघर्ष करणे यातील फरक ओळखाल त्यावेळी तुम्ही अर्धी लढाई जिंकली असे समजा!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Supriya pujari on thougth of the week

Tags
टॉपिकस
Topic Tags: