esakal | Teacher's day 2019 : शिक्षकांनी वर्गाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांना घडवावे
sakal

बोलून बातमी शोधा

Article on teachers day by A L Deshmukh

पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. शिक्षक ही काही नोकरी किंवा पेशा नाही, ते एक व्रत आहे

Teacher's day 2019 : शिक्षकांनी वर्गाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांना घडवावे

sakal_logo
By
डॉ. अ. ल. देशमुख

शिक्षकदिन 2019 : पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. शिक्षक ही काही नोकरी किंवा पेशा नाही, ते एक व्रत आहे. ज्यामध्ये पावित्र्य, मांगल्य, प्रेम, सद्‌भावना, सत्‌शील, सदाचार, निष्ठा व ज्ञान यांचा समुच्चय झालेला आहे. शिक्षकाचे दुसरे नाव "गुरू' आहे. उपनिषदामध्ये "गुरू' शब्दाचा संपूर्ण अर्थ दिला आहे. तो "गऊ रऊ' असा आहे. "ग' म्हणजे विषयातली गहनता, "उ' म्हणजे उद्‌बोधक, "र' म्हणजे रहस्यमय आणि "ऊ' म्हणजे उत्तरोत्तर ज्ञान.

एखाद्या गहन विषयातील मूळ रहस्याचे उत्तरोत्तर ज्ञान देऊन उद्‌बोधन करणारा तो गुरू, तो शिक्षक. विद्यार्थ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो शिक्षक. एक चिनी विचार आहे - "आम्ही एक वर्षाचा विचार करणार असू, तर धान्य पेरू. दहा वर्षांचा विचार असेल तर फळझाडे लावू, पण आमच्यासमोर पिढ्यांचा विचार असेल, तर आम्ही माणसे घडवू.' माणसे घडवण्याचे काम शिक्षक करतात. वसिष्ठ, विश्‍वामित्र, द्रोणाचार्य, समर्थ रामदास, डॉ. राधाकृष्णन या आचार्यांनी हे केले आहे. आजही याची गरज आहे. 

आज शिक्षण क्षेत्राबद्दल खूप बोलले जाते. राष्ट्रपतींपासून ते गल्लीतल्या माणसांपर्यंत कोणीही शिक्षण क्षेत्राद्दल समाधानी नाही. शिक्षण क्षेत्राचा कणा आहे शिक्षक. आजवरच्या शिक्षण आयोगांनी, विविध शैक्षणिक समित्यांनी, शिक्षणतज्ज्ञांनी ज्या शिफारशी, पद्धती, कल्पना, योजना मांडल्या, त्या प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारा, कृतीत उतरवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. पण समाजात खूप मोठे परिवर्तन झाले आहे, असे काही दिसत नाही. उलट शिक्षकांचा पावलोपावली अपमान होतो, थट्टा होते. खुद्द शिक्षकच आपसात गप्पा मारताना एकमेकाला "मास्तर, कामगार, विमा एजंट, चतवाला, बागायतदार' म्हणून हाका मारतात. शिक्षकी पेशाद्दल खुद्द शिक्षकांचाच असा दृष्टिकोन असेल, तर बाकी समाजाने शिक्षकांकडे आदराने पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?

ज्याला आत्मसन्मान राखता येत नाही, त्याला इतर कसे मान देतील? नागरिक तर सतत म्हणतात, "पूर्वी आमच्यावेळी कसे निष्ठावान शिक्षक होते, आज तसे राहिलेले नाहीत.' शिक्षकांच्या निष्ठा कमी होण्यास सरकारही हातभार लावते आहे. सरकारने शिक्षकांना शालाबाह्य कामांना जुंपून शिक्षकांची विद्यार्थ्यांशी गाठच पडू द्यायची नाही असा चंग बांधला आहे. "आमची विद्यार्थ्यांशी गाठ पडू द्या, आम्हाला शिकवू द्या,' अशी विनवणी शिक्षकांना करावी लागते, त्यासाठी न्यायालयात जावे लागते, हे सरकारला शोभा देणारे नाही. सरकारने विनाअनुदान तत्त्व किंवा स्वयंअर्थसाह्य योजना याद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्याचे धोरण स्वीकारले, पण यामध्ये काम करणारे शिक्षक आजही महिना हजार-बाराशे रुपयांवर काम करीत आहेत त्यांचे काय? त्यांनी कसा साजरा करायचा शिक्षक दिन. उपाशीपोटी त्यांनी कसे द्यायचे उत्तम शिक्षण? 

विद्यार्थी शिक्षकाला देव मानतात. शिक्षकानेही विद्यार्थ्यांमध्ये परमेश्‍वराचे रुप पाहिले पाहिजे. एखादी गोष्ट मुलांना समजली नाही, तर ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितली पाहिजे. वर्गात तर उत्तम शिकवलेच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्यावर डोळस माया करून त्याला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे चिंतन, असे विचार, अशी स्वप्ने शिक्षकांनी पाहावीत. भावी पिढ्यांच्या मनात निराशेचा ध्वनी निर्माणच होणार नाही, याची जबाबदारी शिक्षकांनी घ्यायची आहे.

 आज शाळा, महाविद्यालयांतून आपल्याला विषयाचे शिक्षक भेटतात, पण विद्यार्थ्यांचे शिक्षक दुर्मिळ होत चालले आहेत. शिक्षक मुलांच्या परीक्षेमधील गुणांची चिंता करतात, पण त्यांच्या अंगच्या गुणांच्या विकासाचीही चिंता करायला हवी. डॉ. ाबासाहे ओंडकरांचे उदाहरण याबाबतीत बोलके आहे. त्यांचे शिक्षक विष्णू केळुसकर यांच्यासंधी बाबासाहेबांनी लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, "मी नववीत असताना त्यांनी मला बुद्ध चरित्र वाचायला दिले. मी ते मनापासून वाचले. ते माझी फी पण भरत होते. मला सतत नवीन नवीन पुस्तके वाचायला देत. मी थोडा मोठा झालो, तेव्हा त्यांनीच मला बडोद्याच्या महाराजांकडे नेले. त्यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळवून देऊन शिक्षणासाठी मला परदेशात पाठवले. केळुसकरांनी लहानपणीच माझ्यातल्या क्षमता ओळखल्या होत्या व त्याप्रमाणे पालकत्व स्वीकारून मला मोठे केले.'' एक शिक्षक गुणांना पैलू पाडून डॉ. आंबेडकरांना घडवतो, त्याप्रमाणे आज शिक्षकांनी केळुसकरांचा आदर्श घेतला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांनी शिक्षक दिनी हा संकल्प करायला हवा.

शिक्षकांनी वर्गात तर उत्तम शिकवलेच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्यावर डोळस माया करून त्याला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

- डॉ. अ. ल. देशमुख

loading image
go to top