सोशल-बिशल : उलटा बायोस्कोप!

वरुण सुखराज
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

आता तुम्हाला आपण `खेल खेल मे` (#टेनइयर्सचॅलेंज) काय करून बसलोय ते कळेल. कळतेय का गंमत या खेळातली? संगणकालासुद्धा लहान मुलासारखं शिकवलं जातं. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माहितीने भरलेली एक मोठी अंकलिपी आपण या संगणकांसाठी तयार करतोय. 

गेल्या वर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त फेसबुकवर मराठीप्रेमींच्या पोस्टची गर्दी होती. त्यात फेसबुक टिमकडून आलेली एक छोटीशी नोटीसवजा सूचनाही होती. बहुतेकांच्या टाईमलाईनवर होती ती. पण अनेकांच्या ती बहुधा लक्षातही आली नसावी.

आज त्या नोटीसची आठवण यायचं एक कारण म्हणजे जगभरात सर्वात जास्त ट्रेडिंग असलेला चेहऱ्यांचा खेळ. त्या खेळाचं नाव आहे #टेनइयर्सचॅलेंज. गेल्या फेब्रुवारीतली ती नोटीसची पोस्ट आणि हे #टेनइयर्सचॅलेंज यांचं नेमकं नातं समजून घ्यायला हवं. सूचनेत असलेले शब्द वेगळे असतीलही, पण त्याचा (खरा) अर्थ असा होता की आता कोणीही कुठेही, कधीही अपलोड केलेले तुमचे फोटो फेसबुक शोधून काढू शकणार आहे.

याचा (आपल्याला सांगितलेला) फायदा हा की तुम्ही जर तुमच्या कोणा मित्राने किंवा मैत्रिणीने अपलोड केलेल्या एखाद्या फोटोमध्ये असाल पण तुम्हाला टॅग केलेलं नसेल तरी तुम्हाला ते कळेल. यात फेसबुकचा हेतू वाईटच होता असं नाही म्हणायचंय, पण हा फक्त चांगुलपणाच नक्कीच नसावा. कारण याचा एक स्पष्ट अर्थ असा होता, की फेसबुक तुमचे सगळे फोटो स्कॅन करतंय आणि अर्थातच त्याची माहिती जमवतंय.

उदाहरणच द्यायचं, तर ऑफिसमध्ये `सिक लिव्ह` टाकून तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहात. तिथं जावून सेल्फी किंवा फोटो काढला असेल नसेल, पण तिथे एखाद्याने सेल्फी काढताना तुमचा तुमचा चेहरा टिपला गेला असेल तर? आणि तो फोटो फेसबूकला अपलोड झाला तर?

फेसबुक त्या अनोळखी माणसाने काढलेला फोटो तुमच्या समोर ठेवून तुम्हाला दाखवणार, की या फोटोत मागे दिसणारे गृहस्थ आपणच आहात, (कल्पना करा हा फोटो तुमच्या समोर न ठेवता, तुमच्या बॉस समोर ठेवला तर? किंवा त्याने योग्य मोबदला देऊन तो मिळवला तर?)

यातलं काय चुक आणि काय बरोबर याची चर्चा नंतर करू पण यातला गोपनियतेचा मुद्दा सर्वात महत्वाचा. हीच चिंता जगातील तज्ज्ञ मंडळी सतत व्यक्त करीत आहेत. राईट टू प्रायव्हसीसाठी भांडत आहेत.

आपल्या सगळ्यांच्याच फेसबुक खात्यात या सेटीग्ज आजही आँन आहेत. (त्या बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे हे आपल्याला माहितच नाही) आपल्याला हे कळतय की तिकडे फेसबुकच्या सर्व्हर रुममधील काही शक्तीशाली संगणक आपले चेहरे ओळखू शकतायत कारण त्यांना त्यासाठीचं प्रशिक्षण दिलं गेलंय.

आणि आता पुढची पायरी.. तुमच्या चेहरेपट्टीमध्ये, तुमच्या शरिरयष्टीमध्ये गेल्या दहा वर्षात झालेले बदल, त्या बदलांचा साधारण पॅटर्न कसा असू शकतो हे जर एखाद्या संगणकाला शिकवायचं असेल तर...?

आता तुम्हाला आपण `खेल खेल मे` (#टेनइयर्सचॅलेंज) काय करून बसलोय ते कळेल. कळतेय का गंमत या खेळातली? संगणकालासुद्धा लहान मुलासारखं शिकवलं जातं. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माहितीने भरलेली एक मोठी अंकलिपी आपण या संगणकांसाठी तयार करतोय. 

  • पण हे सर्व कशासाठी? 

बायो-मॅट्रीक डाटा हा शब्द हल्ली आपण अनेकवेळा ऐकतो, याचा सोपा अर्थ आहे आपल्या शरिराची विशिष्ट ओळख असलेली माहिती. आधार कार्ड काढताना आपण सर्वांनी डोळे आणि बोटं स्कॅन करून आपलं एक स्वतंत्र आणि एकमेवद्वितीय ओळखपत्र बनवून घेतलंय. आपली प्रत्येकाची विशिष्ट माहिती असलेला हाच तो `बायो-मॅट्रिक डाटा` आज जगातली सर्वात मोठी संपत्ती ठरतोय. आधारद्वारे आमची वैयक्तिक माहिती चोरत असल्याची ओरड करणारे अनेकजण स्वतःच्या हातातला मोबाईल अनलॉक करण्यासाठी चेहरा किंवा बोटांचे ठसे वापरत असतात आणि मोबाईल बनवणाऱ्या छोट्या मोठ्या कंपनीकडे हेच `बायोमॅट्रिक्` स्वखुशीने सोपवून मोकळे झालेत.

इतिहास असं सांगतो की, तंत्रज्ञान आणि नवे शोध यांचा सगळ्यात पहिला फायदा हा राज्यकर्त्यांना किंवा राजकारण्यांना होतो. गेल्या काही काळात इंटरनेट आणि पर्यायाने सोशल मिडिया यांनी एक फार महत्वाचा बदल आपल्या समाजरचनेत आणि मुख्यत्वे राजकारणात घडवून आणलाय, तो म्हणजे माणूस स्वतंत्र विचार करु लागलाय. पुर्वी सत्ताकारणामध्ये झुंडीला महत्व होतं आणि आहे. या झुंडींच्या म्होरक्यांना खिशात ठेवणं ही एकगठ्ठा मतांची हमी होती. पण आता परिस्थिती बदलतेय. प्रत्येकाच्या हातात सहजपणाने माहिती पोहोचतेय. त्यामुळे झुंडीचं राजकारण बाजूला ठेवून आता प्रत्येक व्यक्तिला स्वतंत्रपणे लक्ष्य करून आपल्या बाजूला वळवून घेणं ही गरज बनलीय.

सोशल मिडीयावरच्या भिंतीवर जसं अख्ख जग पाहू शकतो आपण तसंच त्यातूनही आपल्यावरही नजर ठेवता येत असेलच ना. आपले विचार, आपल्या आवडी

निवडी, आपण कोणासोबत आणि कुठे जातोय या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती आपण, कधी जाणिवपुर्वक कधी अनाहूतपणे स्वतःहून देऊन बसतोय. या माहितीचा वापर करणारे अनेक जण आहेत. आपल्या सुरक्षा यंत्रणा, आपल्याला सोयी सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत तसेच राजकिय पक्ष देखील आहेत. 
या सर्व माहितीचा वापर काही चांगल्या गोष्टींसाठीही होतोय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक हरवलेल्या लोकांना कमी वेळात शोधून काढणं शक्य झालं आाणि याच समाजमाध्यमांमुळे आंदोलकसुद्धा पकडले जातायत.
 
आजवर जगातल्या सर्वच माध्यमांना राजकीय हस्तक्षेपाचा सामना करावाच लागलाय.पण आता हा हस्तक्षेप थेट आपल्या आयुष्यात होणार आहे. कारण आपणच या समाजमाध्यमांचे खरे बातमीदार आहोत. आपल्या या माहितीवर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकिय पक्ष करणार  हे नक्की.

या सगळ्या परिस्थितीचं सोप्पं वर्णन करण्यासाठी एक शब्द सुचतोय. बायोस्कोप. पुर्वी गावागावात फिरणारा हा बायोस्कोप सोलापुरातल्या एखाद्या माणसाला दिल्लीचा कुतुबमिनार दाखवायचा पण नव्या तंत्रज्ञानामुळे आता तोच बायोस्कोप उलटा फिरलाय आणि सोलापूरच्या गल्ल्यातल्या हालचाली आता दिल्लीत बसून दिसतायत. हे सगळं केवळ वाईटच आहे का? आणि हे सगळं आपण थांबवू शकतो का? उत्तर एकच, नाही. मग? 

सतर्क राहणे हाच उपाय.  या सोशल साईट्सवर घडणारे छोटे-मोठे बदल, समाजमाध्यमांवर आपल्या `सोयीसाठी` किंवा आपल्या `करमणुकीसाठी` म्हणून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. त्यासाठी महत्वाची आहे माध्यमसाक्षरता.

एखाद्या बेफीकिर मनाला किंवा राजकिय पक्षांना उघड पाठिंबा असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना, जाऊ दे आमची माहिती,  काय फरक पडतो? असा प्रश्न पडूच शकतो. त्यांनी एक गोष्ट आवर्जून ध्यानात ठेवायला हवी ती म्हणजे एका टप्यावर या माहितीचा वापर करणारे एत्तद्देशीय राजकारणी असले तरी ह्या उलट्या बायोस्कोप चे मालक मात्र कोणी तरी भलतेच आहेत आणि ते प्रचंड ताकदवानही आहेत.

अर्थात या सगळ्याचा आणखी एक अर्थ असा देखील होतो की `थ्री इडियटस्` मधल्या रांचोला कुणाच्या तरी फोटोमधून शोधायला आता फार वर्ष लागणार नाहीत! पण त्याबरोबरच आणखी एक गोष्ट विसरायला नको... की तो रांचोचा फोटो मिळाला होता तो चतुरला. आणि तो काही रांचोचा मित्र नव्हता! उत्साहाच्या भरात आपली खडा न् खडा माहिती समाजमाध्यमांवर टाकणाऱ्यांसाठी आणखी एक चतुर किस्सा... मार्क झुकरबर्गला जेव्हा अमेरिकन काँग्रेसने विचारलं की `काल रात्री तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहिलात हे सांगू शकता का?` त्यावर झुकरबर्ग म्हणाला, `ती माझी वैयक्तिक बाब आहे आणि त्याची माहिती मला जगासमोर आणायची नाही.`

- (लेखक माध्यमतज्ज्ञ आहेत)

Web Title: Article On Ten Years Challenge Trend On Social Media