esakal | अथांग, विलक्षण... तरीही उपेक्षित! (उदय कुलकर्णी)
sakal

बोलून बातमी शोधा

Uday-Kulkarni

विख्यात चित्रकार, छायाचित्रणकार, दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांचा ‘सैरंध्री’ हा मूकपट प्रदर्शित झाल्याला नुकतीच (ता. सात फेब्रुवारी १९२०) शंभर वर्षं पूर्ण झाली. पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’नं तयार केलेला हा चित्रपट पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. स्वतः तयार केलेला स्वदेशी कॅमेरा, फिल्म धुण्याची रसायनशाळाही स्वतःचीच असा संपूर्ण भारतीय बनावटीचा हा मूकपट पेंटर यांनी आकाराला आणला. ‘सैरंध्री’च्या प्रदर्शनशताब्दीनिमित्त पेंटर यांच्या कारकीर्दीवर हा धावता दृष्टिक्षेप... 

अथांग, विलक्षण... तरीही उपेक्षित! (उदय कुलकर्णी)

sakal_logo
By
उदय कुलकर्णी udaykd@gmail.com

विख्यात चित्रकार, छायाचित्रणकार, दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांचा ‘सैरंध्री’ हा मूकपट प्रदर्शित झाल्याला नुकतीच (ता. सात फेब्रुवारी १९२०) शंभर वर्षं पूर्ण झाली. पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’नं तयार केलेला हा चित्रपट पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. स्वतः तयार केलेला स्वदेशी कॅमेरा, फिल्म धुण्याची रसायनशाळाही स्वतःचीच असा संपूर्ण भारतीय बनावटीचा हा मूकपट पेंटर यांनी आकाराला आणला. ‘सैरंध्री’च्या प्रदर्शनशताब्दीनिमित्त पेंटर यांच्या कारकीर्दीवर हा धावता दृष्टिक्षेप... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माणसं विलक्षण असतात. माणसं अथांगही असतात. भारतीय चित्रपटसृष्टीला ज्यांच्यामुळे कलात्मकतेचा स्पर्श पहिल्यांदा झाला त्या ‘कलामहर्षी’ बाबूराव पेंटर यांच्या व्यक्तिमत्त्वात अथांगपणा व विलक्षणपणा यांचा लक्षणीय मिलाफ होता. या व्यक्तिमत्त्वाविषयी जितकं जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तितकं आजही नवं काही सापडत जातं. खंत इतकीच की या माणसाचं मोठेपण जगासमोर नीटपणानं कधी मांडलं गेलं नाही. दादासाहेब फाळके यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ असा मान बहाल करण्यात आला. चित्रपटक्षेत्रातल्या असामान्य कामगिरीसाठी केंद्र सरकारनं त्यांच्या नावे सर्वोच्च पुरस्कार ठेवला. बाबूराव पेंटर यांच्याबाबत असं काही ना केंद्र सरकारनं केलं, ना राज्य सरकारनं; पण म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया भक्कम करण्यासाठी पेंटर यांनी दिलेलं योगदान कमी प्रतीचं ठरत नाही. 

सध्या बाबूराव पेंटर यांच्या नावाचं नव्यानं स्मरण केलं जात आहे. हे स्मरण केलं जाण्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, ‘सैरंध्री’ हा बाबूराव पेंटर यांचा संपूर्ण भारतीय बनावटीचा चित्रपट प्रदर्शित झाला त्याला शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीचा चित्रपट तयार करण्याचं स्वप्न मुळात आनंदराव पेंटर व बाबूराव पेंटर या दोन बंधूंनी पाहिलं होतं. इंग्लंडमधून मागवलेला कॅमेरा दाखवायला फाळके यांनी नकार दिला. दरम्यान, या बंधूंनी मुंबईतल्या नळबाजारात जाऊन एक प्रोजेक्‍टर खरेदी केला होता. कनवटीला पैसे नव्हतेच; पण मोठी स्वप्नं पाहणारी माणसं छोट्या-मोठ्या अडचणींनी निराश होत नाहीत. घरातले किडुकमिडुक दागिने विकून त्यांनी प्रोजेक्‍टरची खरेदी झाली. कोल्हापुरात सध्या शनिवार पोस्ट म्हणून ओळखलं जाणारं पोस्ट ऑफिस आहे त्या जागेत पेंटरबंधूंनी ‘शिवाजी थिएटर’ सुरू केलं. परदेशातून येणारे चित्रपट या थिएटरमध्ये दाखवण्यात येत. थिएटरचं अंतरंग त्यांनी इतकं सुंदर सजवलं होतं की प्रेक्षक सिनेमा पाहण्याआधी सजावट पाहण्यातच रंगून जात.

चित्रकलेचं कोणतंही रीतसर प्रशिक्षण घेतलं नसलं तरी ‘ललितकलादर्श’ व ‘गंधर्व नाटक मंडळी’सारख्या नाटकमंडळींसाठी नाटकातल्या दृश्‍यांचे पडदे पेंटरबंधू रंगवत आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाला दाद मिळण्याआधी या बंधूंनी रंगवलेल्या दृश्‍यांच्या पडद्यांनाच रसिकांच्या टाळ्या मिळत. पैजेवर अशा टाळ्या वसूल करण्याची क्षमता असणाऱ्या या बंधूंनी आपलं थिएटर उत्तम सजवावं यात नवल नव्हतं. 

एक दिवस कोल्हापूर संस्थानचे अधिपती थिएटरमध्ये आले. त्यांनी सजावट पाहिली आणि प्रश्‍न केला, ‘भिंती एवढ्या चांगल्या रंगवल्या; पण सिनेमा सुरू झाला की त्यावरची चित्रं अंधारात जातात. त्यापेक्षा रूपेरी पडद्यावरच हलती चित्रं का काढत नाही?’ 

आधीपासून मनात असलेल्या स्वप्नाला यामुळं नव्यानं चालना मिळाली. प्रोजेक्‍टरनं चित्र प्रक्षेपित करता येतं, मग तशीच किमया उलट करता आली तर चित्रीकरणाचा कॅमेरा का तयार होणार नाही, असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला आणि प्रोजेक्‍टरवर निरनिराळे प्रयोग सुरू झाले. हे दोन्ही भाऊ चित्रपटनिर्मितीचं स्वप्न पाहत आहेत हे कळल्यावर बालगंधर्व, केशवराव भोसले आणि वीरकर यांच्या नाटकमंडळींनी आपल्या नाटकाच्या एका शोचं उत्पन्न या बंधूंच्या स्वप्नाला हातभार म्हणून दिलं. जोमानं प्रयत्न सुरू असतानाच आनंदराव पेंटर यांचं निधन झालं आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी एकट्या बाबूराव यांच्यावर येऊन पडली. आर्थिक अडचण होतीच; पण ती दूर करण्यासाठी तानीबाई कागलकरांनी मदतीचा हात दिला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वदेशी कॅमेरा तयार करून, फिल्म धुण्याची रसायनशाळाही स्वतःचीच तयार करून मूकपट आकाराला आणण्यात आला तो म्हणजे ‘सैरंध्री’. ता. एक डिसेंबर १९१८ ला ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना झाल्यानंतर ता. सात फेब्रुवारी १९२० ला पुण्यातल्या ‘आर्यन’ थिएटरमध्ये ‘सैरंध्री’ प्रदर्शित झाला.

लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहून पेंटर यांचं केवळ मुक्तकंठानं कौतुकच केलं असं नाही, तर पुण्यात त्यांचा जाहीर सत्कार घडवून त्यांना ‘सिनेमाकेसरी’ हा किताबही प्रदान केला. या चित्रपटात स्त्रीभूमिका महिलांनीच वठवल्या.(स्त्रीभूमिकाही पुरुषांनीच वठवण्याचा तो काळ होता). स्त्रीभूमिका महिलांनीच वठवाव्यात याबद्दल पेंटर आग्रही होते. कोणत्याही दृश्‍याचं चित्रीकरण करण्याआधी त्या प्रसंगाचं स्केच तयार करणं ही पद्धत त्या वेळी पेंटर यांनी सुरू केली. आता नव्या तंत्रात याला ‘स्टोरी बुक तयार करणं’ असं म्हणतात! ‘सैरंध्री’त ज्या महिलांनी काम केलं होतं त्यांची नावं होती गुलाबबाई आणि अनसूयाबाई. आज ही नावं सिनेरसिकांच्याही विस्मरणात गेली आहेत. यापैकी अनसूयाबाईंना तर उतारवयात कोल्हापूर नगरपालिकेच्या ‘सावित्रीबाई फुले रुग्णालया’त दाई म्हणून काम करावं लागलं. 

‘सैरंध्री’मधली दृश्‍यं इतकी प्रभावी होती की ब्रिटिश सरकारनं काही दृश्‍यांना कात्री लावली. कीचक म्हणून ज्यांचा वध केला असं दाखवण्यात आलं होतं त्या सरदार बाळासाहेब यादव यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर हजर करून ते जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागला होता! 

पेंटर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक गोष्टी दिल्या. त्या तंत्राच्या स्वरूपातल्या होत्या, त्याचप्रमाणे आशय-विषय व मांडणीच्या स्वरूपातल्याही होत्या. सूर्यप्रकाशात चित्रण करता यावं म्हणून स्टुडिओचं छत तशा प्रकारचं बनवणं, विजेचा वापर करून चित्रीकरण करणं, विजेचा वापर न करता रात्रीच्या वेळी चित्रीकरण करणं, रिफ्लेक्‍टर्सचा वापर करणं, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मोठी पोस्टर्स आणि होर्डिंग्ज बनवणं, फेड इन-फेड आऊट तंत्राचा, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करणं, भारतीय सिनेमाला पौराणिक विषयांकडून ऐतिहासिक विषयांकडं आणि ऐतिहासिक विषयांकडून वास्तववादी विषयांकडं वळवणं, साहित्यिकांना चित्रपटांसाठी लिहितं करणं अशा अनेक गोष्टींचं श्रेय पेंटर यांच्याकडे जातं. नारायण हरी आपटे, ना. सी. फडके अशा साहित्यिकांना पेंटर यांनी मूकपटांच्या जमान्यात मूकपटांची टायटल्स लिहायला राजी केलं. समांतर चित्रपटांची चळवळ सन १९८० च्या आसपास रुजली. वास्तववादी आणि कलात्मक चित्रपट भारतात पहिल्यांदा बनवण्याचं श्रेय सत्यजित रे यांना दिलं जातं; पण मूकपटांच्या जमान्यात पेंटर यांनी ‘सावकारी पाश’सारखा पहिला वास्तववादी कलात्मक चित्रपट तयार केला होता. चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या शब्दांत सांगायचं तर ‘ ‘सावकारी पाश’ हा बाबूराव पेंटर यांचा चित्रपट म्हणजे त्यांनी तयार केलेल्या सर्व चित्रपटांचा ‘कौस्तुभमणी!’ ’ 

केवळ सामाजिक प्रश्‍नांना वाहिलेल्या ‘सोशल रिफॉर्मर’सारख्या साप्ताहिकाचे संपादक नटराजन यांनी त्या काळी ‘सावकारी पाश’वर आवर्जून अग्रलेख लिहिला होता एवढं सांगितलं तरी ‘सावकारी पाश’चं महत्त्व लक्षात येईल. 

दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांच्या क्षमतांमधला फरक अधोरेखित करण्यासाठी अनेकदा एक खरी गोष्ट सांगितली जाते. ‘गंगावतरण’ या चित्रपटाचं चित्रीकरण करताना फाळके यांना हिमालयाच्या पर्वतराजीचं दृश्‍य चित्रित करायचं होतं. हे चित्रीकरण कोल्हापूर परिसरात करण्यासाठी त्यांनी हातकणंगले तालुक्यातल्या आळते गावाजवळचा रामलिंगचा पूर्ण डोंगर चुन्यानं रंगवून घेतला होता. पेंटर यांना मात्र असंच दृश्‍य स्टुडिओत सेट उभारूनसुद्धा प्रत्ययकारीपणानं चित्रित करता आलं.

पेंटर हे कोल्हापूरसारख्या ठिकाणी उत्तम काम कसं करतात हे पाहण्यासाठी देशभरातून; विशेषत: दक्षिण भारतातून, अनेक निर्माते-दिग्दर्शक कोल्हापुरात येत असत. सन १९३४ मध्ये देवकीकुमार बोस यांनी ‘सीता’ या चित्रपटाचं बाह्य चित्रीकरण कोल्हापूर परिसरात केलं. ते पेंटर यांच्या चित्रीकरणस्थळीही मुद्दाम गेले. दृश्‍य रंगवलेल्या पडद्यासमोर चित्रीकरण सुरू होतं. पडद्यावर सिनेमा पाहताना दृश्‍यामध्ये जी खोली जाणवायची तशी रंगवलेल्या पडद्यामध्ये जाणवत नव्हती. बोस यांनी त्याबाबत पेंटर यांना विचारलं असता ते म्हणाले : ‘‘नुसत्या डोळ्यांनी नव्हे, तर रंगवलेल्या पडद्यांकडे आता कॅमेऱ्यातून पाहा!’’ बोस यांनी तसं पाहिलं आणि ते थक्क झाले. कॅमेराअँगल कोणता असणार आहे याचा विचार करूनच पेंटर यांनी दृश्‍यांचे पडदे रंगवलेले होते. 

अजय देवगणची भूमिका असणाऱ्या ‘तान्हाजी’ या, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या, चित्रपटाला लोकप्रियता मिळाली आहे. पेंटर यांनी कोणत्याही तांत्रिक सुविधा उपलब्ध नसताना पन्हाळगडाच्या परिसरात रात्रीच्या वेळी वीज न वापरता ‘सिंहगड’ या चित्रपटासाठीची लढाईची दृश्यं कशी चित्रित केली असतील याचीही चर्चा ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्तानं नव्यानं होत आहे. त्या काळात ‘सिंहगड’ला प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती, त्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी सरकारनं करमणूककर सुरू केला. याच चित्रपटासाठी १० फूट बाय २० फूट आकाराची पोस्टर्स शिळाप्रेसवर तयार करण्यात आली होती. भारतीय चित्रपटसृष्टीत जाहिरातींसाठी पोस्टर्स बनवणं ही प्रथा इथूनच सुरू झाली. 

पेंटर यांना अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण, लेखन यांसारख्या कला जशा अवगत होत्या, तशाच चित्रकला व शिल्पकलाही अवगत होत्या. पेंटर यांच्या चित्रकलेवर काही पाश्‍चात्य चित्रकारांची छाप होती. काही भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रंही पेंटर अभ्यासत असत. सन १९३० च्या सुमाराला पेंटर यांनी केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे तत्कालीन संचालक सॉलोमन यांनी त्यांचा सत्कार केला होता. पेंटर यांनी पुतळे बनवण्यासाठी स्वत:ची ‘ओतशाळा’ निर्माण केली होती.

अनेकांना कल्पना नाही; पण मुंबईत लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याचं ठरलं आणि शिल्पकार म्हणून रघुनाथ कृष्ण फडके यांची निवड करण्यात आली होती. टिळकांवर असणाऱ्या भक्तीपोटी फडके यांनी हे काम करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं; पण ब्राँझ धातूमध्ये पुतळ्याचं ओतकाम करण्यासाठी आवश्‍यक ते पैसे फडके यांना मिळाले नाहीत आणि त्यांचा स्टुडिओ विकला जाण्याची स्थिती निर्माण झाली. पेंटर यांना ही माहिती कुठून तरी समजल्यानंतर त्यांनी मुंबईत धाव घेतली आणि पुतळ्याचे मोल्ड कोल्हापुरात आणले. पेंटर यांनी त्या काळी जी मदत केली त्यामुळेच पुढं लोकमान्यांचा ब्राँझचा पुतळा ओतवला गेला आणि आज तोच दिमाखानं मुंबईत चौपाटीवर उभा आहे. 

बाबूराव पेंटर यांचा जन्म ता. तीन जून १८९० चा. पेंटर यांनी केलेल्या पेंटिंग्जच्या छायाचित्रप्रती बनवून त्या प्रतींचं प्रदर्शन भरवण्याचा उपक्रम चित्रपटदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या पुढाकारानं पेंटर यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी कोल्हापुरात राबवण्यात आला होता. 

या उपक्रमातून प्रेरणा घेऊन जागतिक मराठी परिषदेनं मुंबईतही असं प्रदर्शन भरवून पेंटर यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्तानं मराठीबरोबरच इंग्लिशमध्येही स्मरणिका तयार करण्यात आली होती. जगभरात चित्रपटकलेचं प्रशिक्षण देणाऱ्या विविध नामवंत संस्थांकडं इंग्लिश स्मरणिका पाठवण्यात आली. हे सगळं मुंबईतले चित्रपटनिर्माते विनय नेवाळकर यांच्या कार्यालयातून करण्यात आलं होतं. साहजिकच, नेवाळकरांकडे जगभरातून प्रतिक्रिया आल्या. ‘असं विलक्षण काम भारतीय चित्रपटसृष्टीत करणाऱ्या माणसाविषयी आम्हाला आजपर्यंत कधी काही कळलंच नव्हतं...खूप लिहायला पाहिजे या माणसाच्या कर्तृत्वाबद्दल आणि ते जगभर पोचवायलाही पाहिजे...’अशा स्वरूपाच्या त्या प्रतिक्रिया होत्या. 

जगभरातून अशा प्रतिक्रिया आल्या; पण अजूनही ‘कोल्हापूर चित्रनगरीला कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचं नाव द्यावं आणि तिथं त्यांच्या चित्रांची व त्यांनी केलेल्या चित्रपटांविषयीची गॅलरी निर्माण करावी’ या दिवंगत अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी केलेल्या मागणीला न्याय मिळू शकलेला नाही. कारण, मुळात कोल्हापूर चित्रनगरीला अजूनही चित्रनगरीचं अपेक्षित रूप योग्य स्वरूपात आलेलंच नाही! 

loading image