esakal | यहाँ के हम सिकंदर!
sakal

बोलून बातमी शोधा

Study

रविवार होता. निवांत मस्त कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत होता. थोडे अर्जंट रीपोर्टस होते म्हणून काऊस्लिंग सेंटरला आले. रिपोर्टसचे काम सुरू केले; इतक्यात सागर व त्याची आई अत्यंत टेंशनमध्ये रडत-रडत दरात उभे, त्यांना आत बसवून शांत केले. नंतर त्यांना काय झाले विचारले; तर सागरची आई रडायलाच लागली आणि सागर नुसता उभा! काहीच बोलेना, काहीच हावभाव नाहीत.

यहाँ के हम सिकंदर!

sakal_logo
By
वैदेही जंजाळे, मानसोपचारतज्ज्ञ

रविवार होता. निवांत मस्त कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत होता. थोडे अर्जंट रीपोर्टस होते म्हणून काऊस्लिंग सेंटरला आले. रिपोर्टसचे काम सुरू केले; इतक्यात सागर व त्याची आई अत्यंत टेंशनमध्ये रडत-रडत दरात उभे, त्यांना आत बसवून शांत केले. नंतर त्यांना काय झाले विचारले; तर सागरची आई रडायलाच लागली आणि सागर नुसता उभा! काहीच बोलेना, काहीच हावभाव नाहीत. त्याची आई सांगायला लागली, ‘‘मॅडम, आजकाल सागरला अभ्यासाचे खूप टेंशन येते. त्याच्या वागण्यात खूपच फरक दिसतो. तो नीट बोलत नाही, जेवत नाही, काही विचारले तर ओरडतो, चिडतो. अगदी घरात शिव्यादेखील देतो. अभ्यासामध्ये तर खूपच डाऊन झाला आहे. आजकाल ‘डी ग्रेड’ येतो. फार काळजी वाटते मॅडम. काय करावे कळत नाही. म्हणून याला तडक तुमच्याकडे घेऊन आले. आता तुम्हीच बघा काय करायचे ते.’’ 

सगळे ऐकून घेतल्यावर मी आईला बाहेर पाठवले. विश्‍वासात घेतल्यावर सागर सांगायला लागला, ‘‘मॅडम, माझे अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही. अभ्यास म्हटले की, अंगावर काटे येतात. मित्रांबरोबर गप्पा करणे, टीव्ही बघणे, मस्ती करणे आवडते; अन्यथा खूप डिप्रेशन येते.’’ नेमके कारण कळले होते. एवढ्या लहान वयात या मुलांना स्ट्रेस, डिप्रेशन, एनझायटी, इन्सोमेनिया यांसारख्या सायकोलॉजीकल गोष्टींनी ग्रासले आहे. जग पुढे चालले आहे, तेवढ्याच अडचणी वाढत चालल्या आहेत. 

बालक-पालक संवाद हरवत चालला आहे. संवाद फक्‍त कामापुरताच उरला आहे. त्यात आता टेक्नॉलॉजी, सोशल मीडियाची भर पडली आहे. प्रत्येकाने स्वतःला आरशासमोर उभे राहून एक प्रश्‍न विचारावा, ‘मी माझ्या भूमिकेत (आई/बाबा) परफेक्ट आहे का आणि नसेल तर नेमका प्रॉब्लेम काय आहे, याचे मूळ कारण आहे, हरवत चाललेला संवाद! आता प्रत्यक्षात या संवादाची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. संवाद आणि सोशल मीडिया हे दोन्ही माणसाला मिळालेले वरदान आहेत; पण त्याचा नेमका वापर कसा करायचा हे ज्याला कळेल, तो जगी सर्वात सुखी होईल. 

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करत असताना काही गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असते. एका संस्कृत श्‍लोकामध्ये विद्यार्थी लक्षण काय असावीत व त्याचे फायदे काय आहेत, प्रत्येक दशेतील जीवनशैली/लक्षणे काय असावीत याचे प्रमाण सापडते. 

काकचेष्टा, बकोध्यानम 
श्‍वाननीद्रा, तथैवच, 
अल्पाहारी, ग्रहत्यागी, 
विद्यार्थी पंचलक्षणम. 
काकचेष्टा- आपण कावळा व पाणी ही गोष्ट ऐकलेली आहेच, त्यात कावळ्यांनी त्याचा स्मार्टनेस दाखवला व स्वतःची तहान भागवली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्मार्ट असायला हवे. दिसण्यातला स्मार्टनेस व्हायचे नाही; तर वागण्यातला, आचरणातला, अभ्यासातला व्हावे. विद्यार्थ्याने सहनशील, मेहनती, सातत्य या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. 

बकोध्यानम- बको म्हणजे बगळा. बगळा कसे पाण्यातले मासे बरोबर शोधून काढतो, त्याचप्रमाणे विद्यार्थीसुद्धा फोकस्ड असावा. म्हणजेच त्याने विचलित न होता लक्ष केंद्रित करावे. संपूर्ण लक्ष आपल्या विद्यार्जनाकडे असावे. 

श्‍वाननिद्रा- (डॉग स्लीप) आता तुम्हाला असे वाटेल याचा अभ्यासाशी काय संबंध? संबंध नक्कीच आहे. विद्यार्थ्याने जागृत असावे. ज्ञानप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी नेहमी जागृत असावे.

अल्पाहारी- आता इथे शब्दशः अर्थ न घेता योग्य डाएट असा घ्यावा. विद्यार्थ्यांचा आहार सकस असावा, संपूर्ण असावा, शांत असावा. आहार हा पोटापुरताच नाही तर प्रत्येक इंद्रियांचा आहार सकस असावा. 
जिभेची वाचा - नम्र बोलणे
कानाचा - चांगले ऐकणे
डोळ्यांचा - चांगले बघणे 
बुद्धी - चांगले विचार 
ज्ञानार्जन करताना प्रत्येक इंद्रियाला चांगल्या विचारांनी संस्कारित करावे. त्यामध्ये तत्त्व असावे, समर्पण असावे. 

ग्रहत्यागी- (आश्रम पद्धती, गुरुकुल पद्धत) पूर्वीच्या काळी घरापासून दूर ठेवून आश्रमात ठेवून ज्ञानार्जनासाठी पाठवत असत. आता प्रत्यक्षपणे तसे शक्‍य नाही, पण आपण इथे हे लक्षण आत्मसात करताना स्वतःच्या सोईचा त्याग करावा. तरच तुम्हाला इच्छीत ध्येय साध्य होईल व त्रास होणार नाही.  नेहमी स्वतःच्या अवचेतन मनाला हे गाणे ऐकवा... 

‘यहाँ के हम सिकंदर, 
चाहे तो करले दुनिया अपने 
जेब के अंदर 
हारी बाजी को जितना हमें आता है !’

loading image