मुलीच्या साथीमुळेच गाण्याकडे लक्ष (वैशाली माडे)

मुलीच्या साथीमुळेच गाण्याकडे लक्ष (वैशाली माडे)

कमबॅक मॉम 
मी  माझ्या पूर्ण प्रेग्नंसीच्या काळात काम केलं आहे. मी प्रेग्नंट असताना मराठी ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम करत होते. तब्येत सांभाळत मी माझी गायनाची आवड जोपासली. माझं स्वप्न होतं, ते मी माझ्या प्रेग्नंसीच्या काळात पूर्ण करत होते. ‘सा रे ग म प’ कार्यक्रम माझ्यासाठी खास ठरला; कारण माझी मुलगी जन्मली तेव्हा मी हिंदी ‘सा रे ग म प’ करत होते. मुलीला सांभाळत कार्यक्रम कसा करायचा, हा प्रश्‍न होताच. मी नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीला माझ्यापासून दूरही ठेवू शकत नव्हते; मात्र त्या वेळी मी मुलीला सांभाळत हिंदी ‘सा रे ग म प’ कार्यक्रम करण्याचा मनाशी निश्‍चय केला. माझी मुलगी दहा दिवसांची असतानाच मी ‘सा रे ग म प’च्या सेटवर  तिला घेऊन गेले.

तेव्हा मला ‘सा रे ग म प’च्या संपूर्ण टीमनंही फार मदत केली. माझी प्रत्येक गोष्ट समजून घेतली. मला हिंदी ‘सा रे ग म प’च्या संपूर्ण टीमनं सांगितलं होतं, ‘‘तू या कार्यक्रमातून ब्रेक घेऊन पुढील वर्षी पुन्हा नव्या सीझनमध्ये सहभागी होऊ शकतेस.’’ पण मला ही सुवर्णसंधी सोडायची नव्हती, म्हणून मी माझं काम सांभाळत मुलीकडंही लक्ष दिलं. मला प्रेग्नंसीनंतर थोडे दिवसही ब्रेक मिळाला नाही. मी माझं काम सुरूच ठेवलं. मी या काळात आनंदानं, उत्साहानं काम केलं. माझ्या संपूर्ण कुटुंबानं या दरम्यान मला पाठिंबा दिला. प्रेग्नंसीनंतर काम करण्यापासून मला कोणीच थांबवलं नाही. उलट माझ्या निर्णयाचं सगळ्यांनी कौतुक केलं. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ सांभाळत मी माझी आवड जोपासली आणि इथवर पोचले. झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यांपुढं ठेवून मी काम करत गेले. कारण झाशीच्या राणीनंही मुलाला पाठीला बांधून  इतिहास घडवला. 

मी तर फक्त माझ्या दहा दिवसांच्या मुलीला सेटवर घेऊन गेले. मुलीबरोबरच कामालाही प्राधान्य दिलं. माझ्या डोळ्यांपुढं एक ध्येय होतं, ते मी माझ्या मुलीला घेऊन पूर्ण केलं. माझ्या मुलीचं नाव आस्था. आता ती दहा वर्षांची आहे. काम करता करता तिच्याबरोबर मी तिचं बालपणही जगले. माझ्या बालपणात कठीण परिस्थितीमुळे जे मला करता आलं नाही ते मला माझ्या मुलीला द्यायचं होतं आणि ते मी दिलं. ती खूष असल्यावर मीही आपोआप खूष होते. तिच्या चेहऱ्यावरच हास्य बघूनच माझा दिवसभराचा थकवा निघून जातो. आम्ही कुठं बाहेर फिरायला गेल्यावर लोक माझ्याभोवती गर्दी करतात. हे सगळं पाहून मी तिची आई आहे, याचा तिला अभिमान वाटतो. आपली आई ‘सेलिब्रिटी मॉम’ आहे, हे तिच्या डोक्‍यात फिट झालं आहे. आजवर तिनं मला साथ दिली म्हणून मी माझ्या कामाकडं आणि गाण्याकडं नीट लक्ष देऊ शकले. 
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com