esakal | अस्वस्थ वर्तमान
sakal

बोलून बातमी शोधा

Article by Vikas Deshmukh On Aurangabad railway accident

विमानातून आलेल्या या अधिकाऱ्यांना जमिनीवर झोपलेल्या मजुरांच्या वेदना कळतील का, लॉकडाउनमुळे होत असलेले श्रमिकांचे हाल विमानातून दिसतील का, असे अनेक प्रश्न पडले. शिवाय आपणही पांढरपेशी आहोत, हा विचारही स्वतःची चीड आणून गेला.

अस्वस्थ वर्तमान

sakal_logo
By
विकास देशमुख

ज पहाटे-पहाटेच औरंगाबाद येथे रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडले. सहकारी संकेत कुलकर्णी यांनी ई-सकाळवरील बातमीची यूआरएल शेअर केली होती. ती ओपन न करताच केवळ हेडिंग वाचले. सकाळी-सकाळी असं काही वाचायला नको म्हणून दुर्लक्ष केलं. हेडिंग वाचून सुरवातीला फारसं काही वाटलं नाही. वर्तमानपत्रात काम करताना अशा बातम्या नेहमीच येतात, त्या एकदा का वाचकांपर्यंत पोचविल्या की पत्रकारांच्या दृष्टीनं त्यांचं बातमीमूल्य संपून जातं. पुढे घटनेचा फॉलोअप घेणं एवढंच काय ते उरतं. तेही झालं की हा विषय मागे पडतो. त्यावर फारशी चर्चा होत नाही. एकूणच काय तर जगावर माहितीचा भडिमार करणाऱ्या प्रसार माध्यमांमधल्या कर्मचाऱ्यांच्या संवेदना अशा नेहमीच्याच घटनेमुळे बधिर झाल्या. एकाच बातमीत गुंतून पडलो तर पुढची कशी देणार, या प्रॅक्टिकल विचाराने माध्यमातील कर्मचाऱ्यांना याकडे दुर्लक्ष करावंच लागतं. सवयीनं मीही केलं.

संबंधित बीट बातमीदार अंकासाठी सविस्तर बातमी देईल तेव्हा वाचू, असा विचार करीत विरंगुळा म्हणून फेसबूक उघडलं. अविनाश दुधे सरांनी प्रमोद चुंचुरवार यांची शेअर केलेली पोस्ट दिसली. ‘ज्या १६ मजुरांना आज पहाटे रेल्वेने औरंगाबाद जवळ चिरडले त्यांच्या हातात मरताना भाकरी होत्या!’ अशी ती पोस्ट होती. हादरून गेलो. अस्वस्थ, निःशब्द झालो. रोजचंच मढं त्याला कोण रडं म्हणत संवेदना गोठलेल्या मला आतल्या-आत या कामगारांच्या कुटुंबीयाप्रति सहवेदना झाल्या. लागलीच शहर बातमीदार ग्रुप उघडला. एव्हाना रणजित खंदारे सरांनी घटनास्थळांचे काही फोटो शेअर केले होते. ते पाहिले. फोटोत रुळावर पडलेल्या भाकरी, संसार म्हणावा असे काही साहित्य, फाटक्या तुटक्या चप्पल दिसत होत्या. हा अस्वस्थ वर्तमान अधिकच अस्वस्थ करून गेला.

जे मजूर आज ठार झाले ते मध्यप्रदेशातील होते. गावी जाण्यासाठी जालन्यातून रेल्वेरूळ मार्गे पायी आले होते. सरकार परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठवत आहे, हे त्यांना कुठून तरी कळाले. आपल्यालाही आपल्या गावी सरकार पाठवेल, या भाबड्या आशेने ते रेल्वे रूळ तुडवत-तुडवत आले. रेल्वे बंद आहे; त्यामुळे रुळावर झोपायला हरकत नाही, या विचाराने त्यांनी थकलेला देह रुळावर टेकवला. पण, पहाटेच्या अंधारात धाडधाड करीत आलेल्या मालगाडीने साखर झोपेतच त्यांना चिरडले. त्यांच्यापैकी काहींच्या उशाला भाकरीची चळत होती. तीही अस्ताव्यस्त झाली. ज्या भाकरीसाठी ते मध्यप्रदेशातून जालन्यात आले आज त्याच भाकरीसोबत त्यांचा असा अंत व्हावा, या विचाराने काळजाला असंख्य मुंग्यांनी चावा घेतल्या सारखे झाले.

लगेच वरिष्ठ सहकारी अनिलभाऊ जमधडे यांनी दुसरी बातमी दिली की, या अपघाताची चौकशी करण्यासाठी मध्यप्रदेशातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची टीम काहीच वेळात विमानाने औरंगाबादला येणार आहे. संताप आला. विमानातून आलेल्या या अधिकाऱ्यांना जमिनीवर झोपलेल्या मजुरांच्या वेदना कळतील का, लॉकडाउनमुळे होत असलेले श्रमिकांचे हाल विमानातून दिसतील का, असे अनेक प्रश्न पडले. शिवाय आपणही पांढरपेशी आहोत, हा विचारही स्वतःची चीड आणून गेला.

कामगार देशाचा कणा आहे. त्याच्यामुळेच देशाच्या विकासाला हातभार लागतो. पण, अतिश्रीमंत लोकांनी विदेशातून आणलेला कोविड-१९ हा आजार आज झोपडपट्टी भागातील कामगारांनाच झेलावा लागत आहे. लॉकडाउनमुळे कामगारांचाच रोजगार बुडाला, देशाचा आधारस्तंभ असलेल्या कामगारांच्याच नोकऱ्या गेल्या. आता यापुढे निर्माण होणारे परिणाम, महागाई, बेरोजगारी याची झळही या बिच्चाऱ्या कामगारांचाच सहन करावी लागणार आहे.

या सगळ्या संकटात कधी चुकून शांततेची झोप लागली तर कुठून मृत्यू येईल, याची शाश्वतीही या घटनेमुळे राहिली नाही. ते आले होते भाकरीसाठी. भाकरीसोबतच त्यांना मृत्यने गाठावे, हा प्रकार गंभीर आहे. आज मी, माझे पत्रकार मित्र, सहकारी सगळेच यामुळे अस्वस्थ झालो. पण, सवयीनं आम्हाला उद्या ही घटना विसरावीच लागणार आहे. रुळावर पडलेल्या भाकरीचा फोटो डोळ्यांसमोर आला आला की आवंढाही गिळायची हिंमत होत नाही. कॉलेजला असताना कधीतरी वाचलेली नारायण सुर्वेंची कविता आज मन सुन्न करीत आहे, सुर्वे म्हणतात,
‘शेकडो वेळा चंद्र आला
तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात
जिंदगी बरबाद झाली’