ऑन एअर : पैसा आणि बुद्धिप्रामाण्यवाद!

On-Air
On-Air

राजकारण, समाजकारण, धर्मकारण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना दोन्ही मतप्रवाहांना आपणच बरोबर आहोत, असा ठाम विश्वास असतो. आपण लॉजिकली सगळा विचार केलेला आहे, असं प्रत्येकालाच वाटतं.

बुद्धिप्रामाण्यवादाचा हा भ्रम आपल्यामध्ये प्रचंड फूट पाडत आहे, हे दाखवायचा मी प्रयत्न या सदरातून केला आहे. गंमत अशी, की सगळ्यांनाच माझं म्हणणं पटतंय. पण, हे सगळं स्वतःला सोडून इतरांना लागू होतं, असं सगळ्यांनाच वाटतंय. म्हणून, मी वेगवेगळ्या प्रकारच्या बायसीज (‘बायस’चे अनेकवचन) म्हणजे पूर्वग्रहांबद्दल वेगवेगळी उदाहरणं देतोय. आजचा पूर्वग्रह आणि विषय अत्यंत खासगी आहे. भक्त विरुद्ध विभक्त, आस्तिक विरुद्ध नास्तिक थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि फक्त ‘आपण विरुद्ध पैसे’ एवढाच विचार करूया.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बार्गेनिंग पॉवर...
मराठी माणसाचं आणि पैशाचं नातं समजून घेणं एखादी गुप्तहेर किंवा अगाथा ख्रिस्ती यांची रहस्यकथा वाचण्यासारखं आहे. यातल्या कुठल्याच पात्राचं मोटिव्हेशन, हेतू कळत नाही. लोक बोलतात एक; पण वागतात वेगळेच. आपल्याला पैसा, मालमत्ता, यात काहीही रस नाही; दोन वेळची कष्टाची, स्वाभिमानाची भाकरी मिळाली तरी आपण आनंदी राहू, असं म्हणणाऱ्या मागच्या पिढीनं दिवाणी दावे आणि प्रतिदावे लावून न्यायपालिका तुंबवून टाकली आहे. आम्हाला दिखाऊपणा आवडत नाही, असं म्हणणाऱ्या याच पिढीनं कर्ज काढून मुलींची भव्यदिव्य लग्नं लावली. असो. सुखी संसाराच्या अनेक गुरुकिल्ल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची म्हणजे बार्गेनिंग करता आलं पाहिजे. २५ रुपये किलोचा कांदा आपण २० रुपयांत कसा आणला, हा किस्सा आपण आठवडाभर सगळ्यांना सांगतो! अर्थात, ब्रँडेड दुकानात आपण बार्गेन करत नाही. खरं तर तिथं दुकानदाराला डिस्काउंट देण्याइतकं मोठं मार्जिन असतं. घर किंवा गाडी अशा मोठ्या ब्रँडेड खरेदीच्या वेळी आपण बार्गेनिंग करतो. पण, त्यात एक महत्त्वाचा फरक असतो. पाच लाखांच्या गाडीवर आपण काही हजार रुपये डिस्काउंट आणि काही हजार रुपयांच्या अॅक्सेसरीज मिळवतो. गाडी आता ४.७ लाखांना पडते. जिथं तीस हजार रुपये कमी झाले तिथं आणखी पाच रुपये सहज कमी होऊ शकतात. पण, आपण आणखी पाच रुपयांचा डिस्काउंट मागत नाही. कारण, आपण उलट विचार करतो. पावणेपाच लाख रुपये देतोय, ५ रुपयांनी काय फरक पडणार आहे?

आर्थिक घबाड पूर्वग्रह
बुद्धिप्रामाण्यवादानुसार पाच रुपयांची किंमत पाचच रुपये असते, मग ते कांद्यातून येवो किंवा गाडीतून. पैसा कुठून कसा मिळाला याचा त्याच्यावर ठसा नसतो. आपण मात्र पैशाला वेगवेगळी लेबलं लावतो. आपलं वागणं लॉजिकल नाही, सायको-लॉजिकल आहे! अचानक अनपेक्षितपणे मिळालेला पैसा अपेक्षित मिळकतीपेक्षा वेगळा जाणवतो. याला मी ‘आर्थिक घबाड पूर्वग्रह’ म्हणतो. नेहमीचा पगार, उत्पन्न वापरून आपण काय विकत घेतो याच्या मर्यादा ठरलेल्या असतात. ठरावीक किमतीचे फोन, हॉटेल, कपडे यांवर आपण सामान्यतः खर्च करतो, पण अपेक्षा नसताना आलेला बोनस किंवा भेट मात्र आपण अशा गोष्टींसाठी वापरतो, ज्या घेणं योग्य नाही असं आपण ठरवलेलं असतं! खरंतर हे घबाड अगदी छोटंही असतं, पण ते खर्च करायचे मेंटल रुल्स वेगळे असतात. ‘घबाड पूर्वग्रह’ हा आतापर्यंत आपण बघितलेल्या ‘बायसीज’पेक्षा खूप छोटा आहे, पण तो माणूस विरुद्ध माणूस नसून माणूस विरुद्ध पैसा असल्यामुळं भावनिक गोंधळात न पडता आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाच्या सीमा सहज दाखवू शकतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com