पोपट कांबळे आणि नक्षीनक्षीची चप्पल! (ऐश्वर्य पाटेकर)

Aishwary-Patekar
Aishwary-Patekar

शाळेत जायला निघालो होतो. पोपटबाबा चांदवडच्या बाजारात चपला विकायला निघाला होता. एक भलंमोठं ओझं त्याच्या डोक्यावर अन् दुसरं बारकं हातात होतं. दहिवद गाव आमच्या गावापासून मैलभर तरी लांब होतं. मला पोपटबाबाविषयी वाईट वाटलं. मी तसाही शाळेला दांड्याच मारायचो. पोपटबाबाला थोडीशी मदत करावी असं मला वाटलं म्हणून मी पोपटबाबाला हाक मारली...

मी जेजुरीला अद्याप गेलेलो नाही. जेजुरीला जायची तशी गरज भासली नाही; पण याचा अर्थ, खंडोबा हे दैवत मला आवडत नाही, असा अजिबातच नाही. आवडतं. मात्र, आख्खी जेजुरीच जर मला हाकेच्या अंतरावर असल्यावर ती सोडून कसा जाऊ? माझी गल्ली सोडली की भेंडीचं एक झाड लागायचं. एवढंच काय ते अंतर. तेच पोपट कांबळेचं घर. हे घर म्हणजे जेजुरीचीच गजबज. गावची जत्रा आली की कानात सदोदित ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ घुमत राहायचा. पोपटबाबाच्या दारी खंडोबाचा गोंधळ चालायचा. तो एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल आठ दिवस. तुणतुण्याचा नाद...खंजीरीची गाज...वाघ्या-मुरळीचा नाच...अन् भंडाऱ्यात बुडालेली रात. तेव्हा गावावर उगवणारा सूर्यही भंडाऱ्याचाच सदरा अंगात घालून असल्यासारखा! झाडांनाही भंडाऱ्याचीच जणू पानं-फुलं फुटलेली. झाडावर बसणारे पक्षीही भंडारा पांघरून...वाटाही भंडाऱ्याच्या अन् मळेही भंडाऱ्याचेच...!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावभर खंडोबा. खंडोबाची जेजुरी. जेजुरीत सारं गाव अन् खंडोबामय झालेले लोक. पोपटबाबाच्या अंगातही खंडोबा यायचा. पोपटबाबाचं घुमणं भारून टाकायचं. पोपटबाबा पायात खडावा म्हणजे धारदार खिळ्यांची चप्पल घालायचा. पोपटबाबाच्या पायाला एकही खिळा इजा करत नसे अन् जेव्हा होमातल्या ढणढणत्या विस्तवाची वाट पोपटबाबाच्या अनवाणी पायांसाठी केली जायची तेव्हा इकडे आमच्याच पायाला चटका बसल्यासारखं व्हायचं; म्हणजे काळजाला चटका बसायचाच! मात्र, पोपटबाबाच्या पायाला चटका काही बसायचा नाही. देवच जर का त्याच्यावर मेहरबान असेल तर त्याला चटका कसा बसेल?
जत्रेच्या दिवशी रात्री तमाशा असायचा; त्या संध्याकाळी तकतराव निघायचा. तमाशातले कलावंत सजवलेल्या रथात बसलेले, काही उभे असायचे अन् वाजंत्री वाजवत त्याची मिरवणूक साऱ्या गावभर. यसुंताबाबाचं संबळ अन् पोपटबाबाचा नाच पाहण्यासारखा असायचा. हे आठ दिवस पोपटबाबाचे असायचे. एरवी, वर्षभर त्याचं चप्पल तयार करायचं काम खंड न पडता सुरू असायचं. लासलगावचा रविवारचा बाजार अन् सोमवारचा चांदवडचा. हे दोन बाजार तो करायचा म्हणजे आठवडाभर तयार केलेल्या चपला या बाजारांत जाऊन विकायचा.

तेव्हा सारं गाव गरिबीतच जगत होतं. तसा पोपटबाबाही गरीबच; पण या माणसानं कधी कुणाचा एक रुपयाही उसना घेतला नसेल. रात्रंदिवस मेहनत करायचा. रापीला देव मानायचा. खंडोबा तर होताच त्याच्यात. त्यानं लावलेल्या भंडीच्या झाडाखाली आम्हा पोराचा अड्डा असायचा. गावात दुष्काळ तर पाचवीला पूजलेला. पिण्याच्या पाण्याची मारामार. तरी पोपटबाबानं भेंडीचं झाड हिरवं ठेवलं होतं. कदाचित्, आम्हा पोरांची किलबिल त्याला ऐकावीशी वाटत असावी. कारण, त्यानं आम्हाला कधीच हुसकावून लावलं नाही. कारण, आमला गावात कधी इथून, तर कधी तिथून हुसकावून लावलं जातच असायचं. 

खरं तर तेव्हा माझ्या वयाच्या कुठल्याच पोराच्या पायात चप्पल नसायची. त्यामुळे पायात किती काटे खुडायचे याची गणती नाही. कुणी ना कुणी रोज लंगडत चालायचं. चप्पल आली ती फक्त डॉक्टरांच्या पक्याच्या पायात. कारण, तो डॉक्टरांचा मुलगा होता; मग काय, पोरांसाठी ती मोठी गंमतच. पक्याच्या भोवती आम्हा पोरांचं मोठं कोंडाळं जमायचं. ज्याला त्याला उत्सुकता चप्पल पायात घालून पाहायची. आम्ही सगळे त्याच्या मागं लागलो, ‘आम्हाला घालून बघू दे...’ म्हणून. पहिला मान मिळाला मोतीरामच्या पग्याला. पग्यानं चप्पल पायात घातली अन् तो मारुतीच्या देवळाजवळून गरका मारून आला.

‘आरं, लईच भारी वाटतं भो...लईच मवमऊ! आपून चालून ऱ्हायलोय असं वाटतच न्हाई, येक बी खडा पायाला टोचत न्हाई.’’
‘आरं, पायात चप्पल आसल्यावं कह्याला खडं टोचत्याल? तू बापजल्मात पायात कधी चप्पल घातली न्हाई म्हनून तुला तसं वाटतंय,’’ गण्यानं त्याला खिजवलं.
‘तूच कधी घातली रं? येवढा सांगून ऱ्हायलाय ती?’’
‘येडा झाला का पऱ्या...? म्या मावशीच्या घरी जातो नं नासिकला, तं माह्या मावसभावाच्या चपला पायात घातल्याय म्या. तू कहाढ बघू...म्या घालून बघतो आता,’’ संतू म्हणाला.
‘मला काय इच्यारून ऱ्हायला? चपलीच्या मालकाला इच्यार!’’
‘दी रं पग्या, संतूला दी,’’ पक्या म्हणाला.
संतूनं चप्पल घातली अन् चक्कर मारून आल्यावर तो म्हणाला : ‘‘आरं, खरंच रं, माह्या मावसभावाच्या चपला बी काईच न्हाईत ह्या चपलांच्या म्होरं!’’
‘म्या म्हन्लो व्हतो नं तुला!’’
‘बघू, आता मला घालून बघू दी,’’ तान्ह्या अधीरतेनं संतूला म्हणाला.
‘पक्या, घालू द्यायच्या का तान्ह्याला?’’ संतूनं जाणीवपूर्वक विचारलं!
‘न्हाई! परवा लई शानपणा करत व्हता त्यो...’’
‘काय नगं दिऊ... जाय! गेल्या उडत तुह्या चपला,’’ तान्ह्या रागानं म्हणाला.
‘तान्ह्या, नगं जळू पक्याच्या चपलायवर.’’
‘तू तं पक्याची स्टेपनीचंय!’’
‘पग्या, कह्याला त्येच्या तोंडाला लागून ऱ्हायलाय रं? गाढवाला काय गुळाची चव!’’ पक्यानं त्याला बाजूला केलं.
‘ऐ पक्या, कशाला गाढावबिढाव करून ऱ्हायला रं?’’
‘भावड्या, तुला कोन म्हनून ऱ्हायलंय? त्येचा येवढा कैवार घेऊन ऱ्हायला तू त्यो? तुहा काय भाऊ लागून गेलाय का त्यो?’’
‘हायेच!’’
‘चल, तूबी माह्या चपला नगं बघू. तुह्या त ‘बस की बात’च न्हाई चप्पल घेनं!’’ पक्याला माझा रागच येऊन त्यानं माझी ऐपतच काढली. मग मी तरी कशाला माघार घेऊ? मीही टोला लगावलाच.
‘ऐ पक्या, चाल सटक! नगं चपलंचा दिमाख दावू. मला काई घ्यायची न्हाई चप्पलबिप्पल.’’
‘चपलीचा येवढाच दिमाख आसंल तं गळ्यात बांधून हिंड! का रं भो, भावड्या?’’ तान्ह्या माझा कैवार घेत म्हणाला.
‘न्हाई तं काय!’’
‘भावड्या, त्यासाठी ऐपत लागंती!’’
पक्यानं चपलेवरून मला हिणवलं असलं तरी मी काही ते मनावर घेतलं नव्हतं. चप्पल नसलेला मी काही एकटाच होतो का? मनाची समजूत घालायला परिस्थिती शिकवत असते; पण मनात राहतंच नं! त्यावर थोडाच इलाज असतो? 
पक्या म्हणाला तेही खरंच होतं की! चप्पल घ्यायची ठरवली असती तरी माझी कुठं तेवढी ऐपत होती?

शाळेत जायला निघालो होतो. पोपटबाबा चांदवडच्या बाजारात चपला विकायला निघाला होता. एक भलंमोठं ओझं त्याच्या डोक्यावर अन् दुसरं बारकं हातात होतं. दहिवद गाव आमच्या गावापासून मैलभर तरी लांब होतं. मला पोपटबाबाविषयी वाईट वाटलं. मी तसाही शाळेला दांड्याच मारायचो. पोपटबाबाला थोडीशी मदत करावी असं मला वाटलं म्हणून मी पोपटबाबाला हाक मारली...
‘काय रं, काय म्हन्तो?’’
‘पोपटबाबा, ते येक वझं द्या माह्या डोक्यावं.’’
‘आरं, तुही साळा?’’
‘आजूक कुढं भरलीया! तवशीक तं म्या यिईन बी माघारी.’’
उन्हाळ्याचे दिवस...वाट तापलेली...पायाला चटके बसत होते...डोक्यावर चपलांचं ओझं...पण यातला एकही जोड  घ्यायची आपली ऐपत नाही असं वाटत राहिलं.
दुसऱ्या दिवशी भेंडीच्या झाडाजवळ आम्ही पोरं खेळत असताना पोपटबाबानं मला हाक मारून बोलावलं. 
मी गेलो.
‘काय म्हन्ता, पोपटबाबा?’’
पोपटबाबानं काहीही न बोलता माझ्या हातात चपलांचा जोड ठेवला. मला वाटलं, तो कुण्या गिऱ्हाइकला द्यायला त्यानं माझ्याकडे दिला की काय, म्हणून मी पोपटबाबाला विचारलं : ‘‘कुनाला निऊन द्यायच्याय का चपला?’’
‘आरं येड्या, खास तुह्यासाठी शिवल्याता!’’
‘पोपटबाबा, माह्या आईकड येवढं पैसं कुढलं?’’
‘पैसं कोन मांगतया? म्या भेट दिल्याता तुला!’’
माझा तर आनंद गगनात मावेना. आज ना उद्या आपल्यालाही पक्यासारख्या चपला मिळतील असं वाटलं होतं; पण त्या इतक्या लवकर मिळतील, त्याही अशा पद्धतीनं, अशी कल्पनाच केली नव्हती मी! काल माझ्या पोळणाऱ्या पायांचा चटका पोपटबाबाला जाणवला असावा. 

चप्पल तर इतकी सुंदर होती नक्षीनक्षीची...की काही विचारू नका! पक्याच्या चपलेपेक्षाही खूप भारी. अर्थात्, नंतर त्याला मी खिजवलं होतं चपलेवरून! ती चप्पल मी सहसा वापरायचो नाही. आई रागवायची मला ‘आरं येड्या, तुहा पाय का तेवढाच राहनार हाये का? घ्यायाची वापरून तर’’ 

पण मी आईचं कधी ऐकलं नाही. जपूनच ठेवली. त्याला कारण आहेच, आज खूप माणसं आपल्या आसपास आहेत. मात्र, एकमेकांच्या चटक्यांची जाणीव होईल असा एक तरी माणूस सापडेल का आपल्याला? पूर्वी वस्तूच्या अभावातनं नातं घट्ट होत जायचं. आता वस्तूच वस्तू...कुणालाच कुणाची गरज उरलेली नाही! तेव्हा उन्हाळ्याची वाट चालताना पायाला चटका बसायचा, आताही जगभर वेगवेगळ्या प्रकारे चटका बसणारी कितीतरी माणसं असतील; पण कुठं पोहोचतो चटका आपल्यापर्यंत! त्यासाठीच पोपटबाबासारखी माणसं आपल्या आयुष्यात यायला हवीत. 

पोपटबाबाच्या ओट्यावर खंडोबाची तळी भरायला मी कितीदा तरी गेलो असेन.
‘आगडदुम नगारा
सोन्याची जेजुरी...
पायमे तोडा निळा घोडा...
मस्तकी तुरा, बेंबी हिरा
अंगावर शाल, सदाही लाल
म्हाळसा सुंदरी, आरती करी
देव ओवाळी नाना परी
खोबऱ्या कुटका भंडाऱ्याचा भडका
बोला सदानंदाचा येळकोट..

यातली सोन्याची जेजुरी मी खूप शोधायचो माझ्या कल्पनेत अन् निळ्या घोड्यानं तर आजतागायत माझा पिच्छा सोडला नव्हता. कुठं कुठं शोधत फिरलो असेन मी तो निळा घोडा. त्याचा कुठं शोध लागतो का? हा घोडा माझ्या इतका जिवाचा का होऊन गेला हे मला काही सांगता येणार नाही! मात्र, मी अशी कल्पना करायचो की, निळ्या घोड्यावर बसून मी गावात रपेट मारतोय अन् माझ्या बरोबरीची सारी मुलं माझ्याकडे ‘हे काय अद्भुत’ म्हणून नवलानं पाहत आहेत.
पोपटबाबा वारल्याची बातमी कानावर आली, तेव्हा वाटलं की आपली जेजुरी हरपली. विस्तवावर चालणारे पायच जर पोपटबाबा आपल्या बरोबर घेऊन गेला तर मागं उरलेल्या खडावांचा उपयोगच काय? माझ्या घराच्या हाकेच्या अंतरावरची जेजुरी, ती शोधायची कुठं? खरोखरच्या जेजुरीला जायचं जरी मी ठरवलं तरी त्या जेजुरीला पोपटबाबाच्या जेजुरीची सर थोडीच येणार? म्हणूनच मी आता कल्पनेतही शोधत नाही जेजुरी...अन् निळ्या घोड्यानंही पोपटबाबा गेल्यानंतर माझा पिच्छा सोडला...मात्र, पोपटबाबानं मला दिलेली नक्षीनक्षीची चप्पल मी अजूनही जपून ठेवलीय!

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com