भागू पावल्या (ऐश्वर्य पाटेकर)

Aishwary-Patekar
Aishwary-Patekar

...तेव्हापासून गावानं कानाला खडा लावला. भागू पावल्याची ‘औकात’ दुखावली जाईल असं कधी वागायचं नाही. तो कुणाचाच कुणी नव्हता, तरी साऱ्यांचाच होता. त्यानं गाव कधी सोडलं नाही. काही लोक त्याला थापाड्या म्हणायचे... काही जण म्हणायचे, बावळा आहे...तर काही जण म्हणायचे की तो देवाचा अवतार आहे...! 

भागू पावल्या बोलत असतो काहीबाही. लोक म्हणतात, ‘बोलायला काय जातंय? बोलायला काही दाम मोजावा लागत नाही!’ 
तो घटक्यात उडवतो आकाशात विमान...घटक्यात आडगावी आगगाडी चालून दाखवतो...घटक्यात होतो मंत्रीसंत्री...  अवतीभवती फौजफाटा...एवढ्यावरच थांबावं नं त्यानं! तर घटक्यात होतो तमाशाचा मालक...घटक्यात त्याची शंभर एकर जमीन...साऱ्या गावात बडी असामी...त्याच्या घरात नोकर-चाकर, गडीमाणसं शंभर-सव्वाशे...तर असा हा भागू पावल्या घटक्यात असा, तर घटक्यात तसा...घटक्यात हा, तर घटक्यात तो... भागू पावल्या भणंग-भिकारी. त्याच्या खिशात नाही छदाम. अंगावरचे कपडे फाटके; पायात नाहीत चपला. म्हणे, घरात माझ्या पोतभर बदाम, त्याच्यासाठी नाही कुठला लगाम! वर्तमान सोडा; भूतकाळातही जाऊन येतो तो. राजाबिजा होऊन चौदा चौकड्यांचं राज्य जिंकतो. मी त्याला विचारलं : ‘तलवार कुठंय?’

‘आरं तिच्यामायला...ही मोठीच झंझट झाली. कुढं राह्यली...कुढं राह्यली...भूतकाळातच राहून गेली, ध्यान केलं केलं न् आनायचीच इसारलो गड्या! आता म्होरल्या गरक्याला गेलो नं त तलवार बी आनीतो न् ढाल बी! रानी बी दावीतो न् परधान बी!’
‘न्हाई! तू आनशीलच म्हना; पन उगीच ती तिकडं गंजत पडन्यापरास आनल्याली बरी! न्हाई का भागू?’

या अशा भागू पावल्याची गोष्ट सांगायचीय मला. नेमकी कुठून सुरुवात करावी अन् नेमकं काय काय सांगावं याविषयी मोठाच गोंधळ आहे माझ्या डोक्यात. त्याचं चालणं लयीत. त्याचं  बोलण लयीत. त्याची लय शब्दांत पकडताना दमछाक होतेय माझी. तरीही त्याची गोष्ट सांगण्याचा अट्टहास आहे माझा. ‘आरं अप्पा, आरं अप्पा, आईक ना गड्या. भुईवर टेक बूड; काय मारतोस उड्या?’
‘बोल भागू, बोल भागू, काय म्हनतोस?’
‘गावावं लोहकून आलं आभाळ, जरा वरल्यांगं सरकून देतो! पाण्याची मिटंल आबाळ!’
‘भागू, ते काय पांघरूनंय का, हवं तसं सरकवायाला? काई तरीच तुझं. लागतो उरकायला!’
‘म्या काय म्हनतो, आईक माहं थोडं, मधीच नको दाटू तुहं घोडं! तशी तुही ही वाईटच खोडSS’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘मळ्याकडं जायाचंय, मला झाला येळ, निप्पतर बाबा तू तुहा घोळ!’ ‘जाशील गड्या, मळा कुढं जाईल? काढ बिडी-काडी’ ‘भागू, तुह्यासाठी बिडी-काडी काईच नाय, त्वा मागशीन ते हजर हाय! तू सांगून तं पाह्य!’
‘बंगला नगं. नगं गाडी. बरीय आपली बिडी-काडी. तुला काय वाटलं, पाह्यजी आसती तं बांधली नसती का माडी? ही माहं ते तुहं करत, करत बसलो असतो का डोकेफोडी! यात काय राम? म्हनून न्हाई गोडी!’
भागू पावल्याची लोकांना एवढी सवय झाली की त्याची बोलण्याची तऱ्हा, त्याची चेष्टा म्हणून, त्यांनी उचलली. खरं तर,त्याच्या लयीला जो पुरून उरेल तोच माणूस त्याच्याशी बोलू शकत असायचा. अप्पा काशिनाथ आणि तात्या खोंड ही दोन माणसं तर भागू पावल्याची चेष्टा करता करता भागू पावल्यासारखीच बोलायची. त्यांच्या घरचेही त्यांना म्हणायचे, ‘आदुगर त्वांडातला ‘भागू पावल्या’ उतरून ठिवा!’ ते तेवढ्यापुरतंच त्यांना जमायचं. बाकी, भागू पावल्या सर्वदा त्यांच्या जिव्हेवर! माझा चुलता पांडवनानानं सांगितलेला एक प्रसंग. म्हणजे, नानानं त्यात थोडीबहुत त्याच्या अंगची जोडाजोडीही केलेली असेल. कारण, आमचा नानाही गोष्टी सांगण्यात तसा पटाईतच!
तर अशी ही एक गोष्ट...

असाच एक दिवस तात्या खोंड मळ्याकडं बैलगाडी घेऊन निघाला होता म्हणे. पाराजवळ गाडी थांबवली अन् तो भागू पावल्याजवळ जाऊन बसला अन् म्हणाला : ‘भागू भागू, चुना दी गड्या, चुना दी. तलफ आली जाम, काही सुचंना कामधाम!’ ‘बरं का तात्या, आइकतोय नं गड्या, कितीक दिस सोसायच्या रं या रस्त्याच्या खडखड्या. बैलगाड्या झाल्या खटारा. साऱ्याच हडहड्या. म्या आता गावात इमानच घेऊन येतो. तुमच्ये कांदे मार्किटात इमानानं नेतो. हाय का नाय!’
‘भागू, बस कर गड्या. लईच वरून हानली. याला न् त्याला, मला न्हाई पचली. कायच्या बाय!’
‘तात्या, माह्यावर इस्वास ठीव. का आनू रेल्वे गावात? पत माही दांडगी, नुसती न्हाई गल्लीत, काय घिऊन बसला, निऊन ठिवील दिल्लीत! हाय का नाय!’
तात्याला कळत नव्हतं असं नाही, ज्या गावात बैलगाडीसाठीसुद्धा धड रस्ता नव्हता अन् पुढच्या शंभर वर्षांत कुठल्या चमत्कारानंही जी गोष्ट शक्य नव्हती ती भागू पावल्या आणणार कशी? तरी तात्या सावरून घ्यायचा. तात्याचं म्हणणं, तो अशानं असं बोलला तरी कुणाचं काय नुकसान होणार आहे? ‘ऱ्हाऊ दी भागू, तू आनशीनच बाप्पा इमान. न्हाईत निसत्या तोंडाच्या वाफा. कोण म्हनतं थापा? पन रेल्वीच्या रुळानं  आपलं वावर खराब व्हईल बाप्पा! हाय का नाय?’ ‘आता तू न्हाई म्हनतो तं राहायलं! तू आजूक काय पाहायलं?’’

‘भागू, म्या शंका घिईल का गड्या? मिनटात बांधतो हजार मेथीच्या जुड्या. त्वा मनात आनलं तर आभाळालाबी दोर बांधून आंगनात बांधून घालशीन गाईसारखं! 
‘बोल, आनू का आनू आभाळ? घालू का बांधून?’
‘नगं भागू, नगं आपलं प्वाट मातीवर गा, मातीला पानी लागतं का नाय! आभाळ जर का बांधून घातलं तं पान्याचे व्हतील नं हाल! मग कसं काढायचं उभं साल? हाय का नाय!’
‘आरं, आभाळाची काय गोष्ट? म्या समिंदर बी आपल्या गावात आनायच्या इचारात हाये!’
‘ह्ये मातूर ब्येस व्हईल. शेतीला पानी बी व्हईल आन् ज्याला वाटलं, मासं खायाच्येत, त्यो सहजी पान्यात हात  घालून कालवनापुरतं दोन-चार मासं काढून घिईन. हाय का नाय!’
‘आंगं अस्सं! हाये का न्हाई डोकं! नुसतं आपुन सांभाळीत न्हाई खोकं!’

भागू पावल्याच्या अनेक गोष्टींनी असं अनेकांना भारून टाकलेलं होतं. भागू पावल्याचा बाप कोण? भागू पावल्याची आई कोण? कशाचा काहीच थांगपत्ता नव्हता. त्याचं घर कुठं? तो गावात कुठून आला? या प्रश्नांची खात्रीलायक माहिती गावात कुणालाच नव्हती. म्हणजे, पांडवनानाकडंसुद्धा नव्हती. नानाकडं आजूबाजूच्या चार गावांच्या माणसांची खडा न् खडा माहिती असायची. भागू पावल्याची माहिती त्याच्याकडंही नाही म्हटल्यावर ती शोधण्यात तसंही हाताला काही लागणारं नव्हतं; पण म्हणून ‘तो उपरा आहे,’ असंही ठामपणे कुणी म्हणू शकत नव्हतं. तो ना मजुरीच्या कामाला जायचा, ना कधी किराणा विकत घ्यायचा. त्याची तऱ्हाच साधू-बैराग्यासारखी. कुणाच्या घरी चहा पिणार, तर कुणाच्या घरी जेवण करणार. त्याला कुणीच कधी आपल्या घरातून हुसकावलं नाही. म्हणजे, तो नुसताच बसून राहायचा का? तर तसंही नाही. तो एखाद्याच्या घरी गेला अन् तिथं काही काम सुरू असेल तर ते तो नेकीनं करायचा; पण त्याचा मोबदला घ्यायचा नाही. लोकांना त्याची सवय ठाऊक होती. 

मात्र, एकदा काय झालं...किसन पर्बतच्या मळ्यात बाजरी सांगण्याचं काम सुरू होतं. भागू लागला त्या कामाला. कामाला काही साधा नव्हता तो. चार गड्यांचं काम एकटा करायचा म्हणे. त्यानं दिवसभर काम केलं. संध्याकाळी  किसननं केली चूक! मजुरांच्या हातावर पाच पाच रुपये ठेवले तशी भागूलाही घातली त्यानं हाक.
‘भागू, इकडं य गड्या’
‘काय रं, किसना?’
‘ही ठीव. तुहं रोजाचं पाच रुपै!’
भागू असा रागावला म्हणता...पांडवनानानं त्याच्या रागावण्याचं एवढ्या अतिशयोक्तीनं वर्णन केलं की काही विचारू नका. ते आता काही सांगत बसत नाही मी तुम्हाला. 

भागू पावल्या कडाडत किसनला म्हणाला :‘किसन्या, तू या भागूला काय समाजला? जिवढी न्हाई तुही दानत, शेती-मातीसकट तुला घिईन इकत! पै पैशाचा नगं दावू तोरा, बसशील भीक मागत! यवढी दौलत उधळील तुह्या म्होरं. बस सहा वर्षं मोजत! हा भागू पावल्या असा तसा जल्माला आला न्हाई, आकाशवानी झाली वाजत-गाजत! देवांनी उधाळली फुलं आन् खाली झुकलं व्हतं पर्वत! त्याची केली तू किंमत? झालीच कशी तुही हिंमत? किसन्या, आता तुही न्हाई धडगत!’

किसन पार कावराबावरा झाला. काय करावं, त्याला काही सुचेना. तेव्हा तात्यानं अन् अप्पानं येऊन भागू पावल्याच्या संतापाची लय थांबवली. नाहीतर त्याचं गाणं दिवसभर सुरू राहिलं असतं. तेव्हापासून गावानं कानाला खडा लावला. भागू पावल्याची ‘औकात’ दुखावली जाईल असं कधी वागायचं नाही. तो कुणाचाच कुणी नव्हता तरी साऱ्यांचाच होता. त्यानं गाव कधी सोडलं नाही. काही लोक त्याला थापाड्या म्हणायचे...काही जण म्हणायचे, बावळा आहे...तर काही जण म्हणायचे की तो देवाचा अवतार आहे! ही अंधश्रद्धा असली तरी माणसाला माणसाशी माणसासारखा वागण्याचा धाक बसला. ही गोष्ट काय कमी झाली का? नात्याच्या भिंती दरदरून कोसळण्याच्या काळात लोकांनी भागू पावल्या जपला...सांभाळला. म्हणजे, माझा जन्म व्हायच्या आधीच भागू पावल्या वारला; पण त्याच्या गोष्टी एवढ्या होत्या गावाकडं...की तो मेला आहे असं वाटतच नव्हतं...‘भागू पावल्या’ नावाचं मिथक लोकाचारातून सहजासहजी मिटणारं नव्हतं! ते पुनःपुन्हा समोर येतंच होतं...आजही असं वाटतं की कोरोनानं माणसाला हैराण केल्याच्या या काळात तो येऊन म्हणेल : ‘‘आरं, येवढं काय घाबरायचं का गड्या, म्या येक्या मिन्टात कोरूनाची म्हामारी छू मंतर करीन सारी! बोल, करू का छू मंतर?’’
त्याला आज्ञा द्यायला मी काही अप्पा नाही...!

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com