
शांतता आणि कलावंत, यांचे एक अनोखे नाते आहे. शांततेत एकाग्रता वाढते आणि कलावंत कलानिर्मितीत तन्मय होतात. रोजच्या शहरी जीवनात पदरी पडणारी संयत शांतता निसर्गाने कोरोना संक्रमणकाळातील लॉकडाउनने अमर्याद केली. याच काळात एका चित्रकर्तीने आपल्या चित्रांमध्ये शृंगाररस चितारला, ती चित्रकर्ती म्हणजे मीरारोड येथील प्रिया प्रमोद पाटील. स्त्रीसौंदर्य आणि शृंगाराची एक मालिका प्रिया पाटील यांनी या काळात तयार केली.
शांतता आणि कलावंत, यांचे एक अनोखे नाते आहे. शांततेत एकाग्रता वाढते आणि कलावंत कलानिर्मितीत तन्मय होतात. रोजच्या शहरी जीवनात पदरी पडणारी संयत शांतता निसर्गाने कोरोना संक्रमणकाळातील लॉकडाउनने अमर्याद केली. याच काळात एका चित्रकर्तीने आपल्या चित्रांमध्ये शृंगाररस चितारला, ती चित्रकर्ती म्हणजे मीरारोड येथील प्रिया प्रमोद पाटील. स्त्रीसौंदर्य आणि शृंगाराची एक मालिका प्रिया पाटील यांनी या काळात तयार केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दाक्षिणात्य शैलीतील स्त्रीसौंदर्याची आणि शृंगाराची नानाविध रूपं त्यांनी त्यांच्या ‘ललना’ या चित्रमालिकेतून साकारली. स्त्रियांची विविध आभूषणे, वेशभूषा आणि केशसंभार त्यांनी आपल्या चित्रातून दाखवला. स्त्रीच्या मनातील भाव हा तिच्या शृंगाराच्या सादरीकरणात उमटतो, याचा प्रत्यय प्रिया यांच्या ‘ललनां’मध्ये दिसून येतो.
मुळात सौंदर्य हा अदाकारीचा भाग नसून, ती एक नजाकत आहे. एक स्त्री चित्रकार हा भाव मोठ्या तन्मयतेने मांडू शकते, हे प्रिया यांच्या चित्रांनी अधोरेखित केले आहे. लॉकडाउनचा कालावधी हा मानसिक विषण्णतेचा होता. परंतु, अशा काळातही सकारात्मकतेतून शांततेच्या माध्यमातून साज आणि शृंगाराला साद घातलेली आहे. कलाकार हा निर्मितीचा भोक्ता आहे. त्यामुळे नैराश्यातून आशेच्या वाटा शोधण्याचा हा प्रयास आनंददायीच आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनच्या काळात सरकारने गणेशोत्सवात अनेक निर्बंध घातले होते. अशा प्रसंगी प्रिया पाटील यांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने घडवली. विधिवत अर्चना करून ही गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा धाडसी निर्णय स्वागतार्ह आहे. कारण, त्यांच्या मते निर्मितीचे विसर्जन न करता नव्याने काहीतरी जतन करण्याचे आहे. हा पर्यावरणवादी विचार एका कलाकाराने या संक्रमणकाळात स्वीकारला.
प्रिया पाटील यांनी सामाजिक जाणिवेतून ‘चित्रांगना’ हे महिला चित्रकारांचे हक्काचे व्यासपीठ तयार केले आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक महिला चित्रकारांना या क्षेत्रात स्वावलंबी बनविले आहे. लॉकडाउनच्या आव्हानात्मक काळात त्यांनी त्यांच्या घरापासून दूर असलेल्या अनेक विद्यार्थी महिला चित्रकारांना मानसिक आणि मदतीचा आधार दिला.
प्रिया यांनी आजवर साकारलेल्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने भरली असून, कलारसिकांनी आणि समीक्षकांनी त्यांच्या चित्रकलाकृतींचे कौतुक केले आहे. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा राजश्री बिर्ला फाउंडेशन अॅवॉर्ड, पांडिचेरी आर्ट अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसह त्यांच्या कलाकृतींना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे.
लॉकडाउनच्या काळात चितारलेली ‘ललना’ चित्रमालिका प्रिया पाटील यांच्या भविष्यातील नव्या चित्रप्रदर्शनाचा श्रीगणेशा आहे. कोविड संक्रमणाच्या काळात निराशेचे गडद ढग बाजूला सारून कलेचा एक किरण आसमंत प्रकाशित करून जाणारा आहे, हे त्यांनी अधोरेखित केले आहे.
Edited By - Prashant Patil