ओझं दप्तराचं की अपेक्षांचं (नामदेव माळी)

Namdeo-Mali
Namdeo-Mali

मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करणारा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतलाय. यापूर्वीही अशाप्रकारचे निर्णय झाले आहेत. शालेय विद्यार्थांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि सरकार तसेच या क्षेत्रातील विविध नामवंत आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. ओझे कमी होण्यासाठी केवळ उपाय पुरेसे नाहीत तर पालकांची मानसिकता बदलायला हवी तसेच काही ठिकाणाच्या शाळांच्या धोरणातही बदल हवा आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर या विषयाचा सर्वांगीण वेध...

दप्तराचे ओझे एखाद्या जुनाट आजारासारखे विद्यार्थ्यांच्या पाठीवर चिकटून आहे. वर्षानुवर्षे याविषयी बोलले जाते, नियम होतात, शासन निर्णय होतात, लेख लिहिले जातात. वाटतं, आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार, पण विक्रमादित्याच्या पाठीवर वेताळ पुन्हा पुन्हा बसावा तसं ओझं वाढत चाललंय, पण कमी होत नाही. मग ओघानंच विद्यार्थ्यांच्या पाठीला बाक येण्यापासून मणक्‍याच्या आजारापर्यंत विद्यार्थ्यांना सोसावं लागतं. जसजसा काळ जाईल तसं ओझं वाढत चाललंय.  बंद काही वेळा तो बंदही तुटलेला अशी वायरची किंवा कापडी पिशवी तिथपासून प्रवासी सॅकसारख्या दप्तरापर्यंत हा प्रवास आलाय. ते कमी की काय म्हणून पाण्याच्या बाटलीसाठी, जेवणाच्या डब्यासाठी, पुरवणी पिशवीची गरज भासू लागली आहे. 

अक्षरशः काय काय कोंबलेलं असतं दप्तरात. ही मोबदल्याविना हमाली तर नाही ना, अशी शंका येते कधी कधी. जसजसा पालकांचा आर्थिक आणि शैक्षणिक स्तर वाढत उंचावत जाईल त्यानुसार दप्तराचं वजन वाढत जातं. त्यामानानं ग्रामीण भागातील, सरकारी शाळांतील मुलं दगडापेक्षा वीट मऊचा अनुभव घेताना दिसतात. राज्य मंडळापेक्षा इतर मंडळं, मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यम, सरकारीपेक्षा खाजगी याबाबतीत अग्रेसर असतात. अधिक अपेक्षा, पालकांच्या नि शाळेच्या. आम्ही कसे अधिक उपक्रम राबवतो, जास्त अभ्यास घेतो, आमची शाळा कशी दर्जेदार आहे हे दाखविण्याचे अनेक खटाटोप असतात त्यातीलच हा खटाटोप असावा, असा संशय घ्यायला खूप वाव आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळा कमी पडतात की काय म्हणून मुलांना खासगी शिकवणी वर्गाला घालण्याची पालकांची चढाओढ लागलेली असते. शिवाय आपला मुलगा कुठं कमी पडायला नको म्हणून सभेत कसे बोलावे पासून ते गायन, वादन, नृत्य, नाट्यापर्यंत मुलांचा प्रवास सुरू असतो आणि प्रवास म्हटलं की ओझ्यात भर पडणारच. हे सगळं असलं तरी नुसतं शिकून काय उपयोग स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी नको का करायला ! मग याचंही ओझं येणारच ना!  तर असं हे सगळं शिकायचं म्हटलं की थोडी धावपळ आली. वेळेचं नियोजन आलं. धावत्या युगात धावायला नको का मुलानं, थांबला तो संपला. अशा संकल्पना घेऊन आपल्या इच्छांचं ओझं मुलाच्या पाठीवर, मानेवर, डोक्‍यावर देऊन पालक मोकळे होतात. वर मुलाला समजावतात, तुला आम्ही काही म्हणून कमी केलं नाही. अमुक इतके टक्के पडायलाच पाहिजेत. अशा टक्केवारीच्या गोष्टी सुरू होतात. 

शहरामध्ये खुराड्यामध्ये कोंबड्या कोंबाव्यात तशी मुलं रिक्षामध्ये कोंबलेली असतात. रिक्षाच्या दोन्ही बाजूला, मागे मुलांची दप्तरं लगडलेली असतात. शाळा, शिकवणी वर्ग, स्पर्धा परीक्षा वर्ग इत्यादींसाठी आवश्‍यक साहित्य एका पिशवीला पचवणे अवघड असल्यानं तिचं पोट फुगलेलं असणार हे नक्की. काही वेळा मुलांच्या उंचीच्या मानाने पिशवीची उंची जास्त असल्याने ती मुलाच्या पाठीवर  लोंबकळत असते. स्वतःचा आणि पिशवीचा तोल सावरण्यासाठी पिशवीला वर ढकलावं लागतं. चालताना याचा अडथळा होतोच. मग वाकून चालणं, वेडंवाकडं चालणं ओघानं चालून येतं. काही मुलं सायकलवरून शाळेला येतात. शेतकऱ्यानं वैरणीचा भार तोलावा तसं सायकलवरच दप्तर तोलावं लागतं. सायकल स्टॅण्डपासून वर्गापर्यंतची सर्कस वेगळीच. कंपासपेटी, चित्रकला- कार्यानुभवाचं साहित्य, प्रकल्प, विविध संग्रह, विविध प्रकारच्या वह्या, पाठ्यपुस्तकं, गाइड, स्वाध्याय पुस्तिका (अर्थात शाळेचं आणि खाजगी क्‍लासचं स्वतंत्र) सेमी इंग्रजीच्या फॅडमध्ये कुटुंब रंगलं असेल तर गणित, विज्ञानाची इंग्रजी, मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तकं, गाइड, वर्गात बसण्यासाठी आणि लिहिण्यासाठी बाक असतानाही लिहिण्यासाठीचं वजनदार पॅड. शिवाय मुलाच्या वयानुसार त्याच्या आवडीच्या गोट्या, चित्र, रॅपर, नट-नट्यांचे फोटो स्पायडर मॅन वगैरे ओघानं येतं. ज्यांना भविष्यात सचिन तेंडूलकर, विराट कोहली वगैरे होण्याची इच्छा असते ते चेंडू, बॅट, स्टॅम्प घरूनच घेऊन येत असतात. 
कारण स्पर्धेच्या गुणवत्तेच्या काळात देशी खेळ जिथं आमचे शत्रू झाले आहेत तिथं क्रिकेटचे (साहित्य विकत घेण्याचे) लाड कोणती शाळा करेल? 
अर्थात मुलांना ओझे वाहक बनविण्यामध्ये अगदी बालवाड्याही मागे रहात नाहीत. 

हे सर्व ओझे कमी असते की काय म्हणून बुटाचे ओझेही मुलाला वागवावे लागते. काही ठिकाणी तर पाठीवर दफ्तर आणि पायात बूट घालून मुले प्रार्थनेला बसलेली पहायला मिळाली आहेत. आता मनात ही मुलं कोणत्या देवाला कोणती प्रार्थना करत असतील कोण (मुलं, देव) जाणे!  वह्यांच्या प्रकारावर थोडी नजर टाकली तर ज्यांनी जुन्या वहीतील कोऱ्या पानांच्या सुईने शिवून वह्या केल्या त्यांना नक्की हेवा वाटेल. उदा. प्रत्येक विषयाच्या वर्गात वापरावयाच्या वह्या. अर्थात या शंभर दोनशे पृष्ठांच्या असतात. यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला असल्याने निम्मी पानं पाण्यासारखी वाया घालवली जातात कारण मधल्या पृष्ठांच्या वह्यांचा वापर करावयाचा असतो हे आम्ही विसरलोय. स्वाध्यायाच्या वह्या हस्ताक्षर, शुद्धलेखनाच्या हिंदी, मराठी, इंग्रजी विषयाच्या दुरेघी, चाररेघी वह्या, चौकटी असलेल्या अंक लेखन, गणितासाठीच्या वह्या, निबंध- पत्रलेखन इत्यादींसाठीच्या वह्या. पाठाखालचा स्वाध्याय किंवा शिक्षकांनी दिलेला स्वाध्याय सोडविण्याच्या वह्या. पूर्वी मार देणारे शिक्षक म्हणजे चांगली शिस्त लावणारे पर्यायानं चांगले शिक्षक असा समज होता. हल्ली अधिक स्वाध्याय देणारे शिक्षक चांगले असा काही पालकांचा (गैर) समज आहे. स्वाध्याय का दिला नाही म्हणून भांडणारे पालक आहेत. मग दोनशे गणितं सोडवा, धड्याखालचे प्रश्‍न सोडवा सारखा तोडांला येईल तो स्वाध्याय द्यावा लागतो. अर्थात हे ब्रह्मवाक्‍य असतं. मग काय खाली मानगूट घालून रहा मारा, घासा नाही तर दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मान, एवढंच काय ते! 

पाठीवर, मानेवर ओझं कमी वाटतं की काय म्हणून मुलांच्या डोकीवर अर्थात मेंदूवर ओझं दिलं जातं. कंटाळवाणं, निरर्थक, निरस बडबडणं ज्याला शिकवणं म्हटलं जातं. ऐका, घोका आणि ओका याचं मेंदूवर ओझं असतं. कृती न करता, अनुभव न घेता, शिकणं निरस होतं ते सहज आणि आनंददायी असत नाही. अमूर्त संकल्पना, गणित, विज्ञान, भूगोलातले संबोध, इतिहासातील कालरेषा, इसवी सन पूर्वची कल्पना मुलांना गोंधळात टाकतात. त्यात पहिला नंबर आणि टक्केवारी मागं लागली की विचारायला नको. पालकांना घाई मुलांचं यश बघण्याची, शिक्षकांना घाई माझी इतकी मुलं स्पर्धा परीक्षेत राज्यात एक ते अमुक मध्ये आली. गल्लीबोळात असे स्पर्धा परीक्षा घेणारे टॅलेन्ट शोधणारे राज्यपातळीवरचं बोलतात. प्रत्येक गावातली मुलं राज्यपातळीवर ते सुद्धा पहिल्या पन्नासमध्ये कसे येतात काही समजत नाही. या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर आपले फोटो डिजिटल बोर्डवर झळकले तर सोन्याहून पिवळं. हल्ली मुलांना मोठा झाल्यावर तू कोण होणार असं विचारलं की ते सहज म्हणतात, ‘कलेक्‍टर’. पालकांनाही वाटत असावं, आपला मुलगा मोठा होईपर्यंत प्रत्येक गावाला कलेक्‍टरचं पद निर्माण होणार आहे आणि कलेक्‍टरचे आई-बाप म्हणून आपल्याला मिरवता येणार आहे. 

यासाठी मग गाइडचा मारा, वर्कबुकचा मारा! स्पर्धा परीक्षेचे गाइड जाडजूड असणारच ना! पूर्वी खाजगी शिकवणीला का गेला. गाइड का वापरलं म्हणून शिक्षकांचं बोलणं आणि मार खावा लागायचा. आता शिक्षकच वर्गात गाइड वापरतात. कोणत्या प्रकाशनाचं गाइड वापरावं त्याची शिफारसही करतात. अर्थात शिक्षकांनी केलेली शिफारस आणि खाजगी शिकवणीच्या "टिचर''नी केलेली शिफारस वेगळी असायलाच हवी, त्याशिवाय दप्तराचं ओझं वाढणार कसं? 
अशा प्रकारे दप्तराचं ओझं कमी करण्याऐवजी अपेक्षांच्या ओझ्याबरोबर दप्तराचं ओझं वाढवण्याची चढाओढ लागलेली असते. 

अर्थातच काही शिक्षक शाळा दप्तराचं पाठीवरचं ओझं आणि शिकण्याचं डोक्‍यावरचं ओझं कमी करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यात यशस्वीही होतात. हल्ली आठवीपर्यंत मोफत पुस्तकं सर्वांना मिळतात. त्यामुळं पैसे नाहीत, म्हणून जुनी पुस्तकं अर्ध्या किमतीला किंवा अर्ध्या किमतीला विकत घेतलेली, पुढच्या वर्षी त्याच्या अर्ध्या किमतीला विकत घ्यावी लागत नाहीत. अशाप्रकारे पुस्तकांचा पुनर्वापर आणि कोऱ्या पानांच्या वह्या शिवून वापरल्यानं कितीतरी वृक्षांचा जीव जुन्या पिढ्यांनी वाचवला आहे. काही कल्पक शिक्षक जुनी पुस्तकं वर्षाच्या शेवटी गोळा करतात ती वर्गात ठेवतात. नवी पुस्तकं मुलांच्या घरी असतात त्यामुळं दप्तरात पाठ्यपुस्तकांचा जीव गुदमरण्याचा प्रश्‍न मिटतो. 

काही शिक्षकांनी विविध विषयाची पुस्तकं फाडून महिनावार शिकवता येतील. अशी एकत्रित शिवून वापरण्याचा प्रयोग केला आहे. सध्या महाराष्ट्रातील पाच हजार शाळांमध्ये अशा प्रकारची सर्व विषय एकत्र असलेली दोन- तीन महिने वापरता येण्यासारखी पुस्तके देण्यात आली आहेत. प्रायोगिक स्वरूपात दप्तराचे ओझे कमी करण्याचा हा प्रयत्न नक्की स्वागतार्ह आहे.  घरात व शाळेत स्वतंत्र पुस्तके, विविध विषयाची महिनावार एकत्र पुस्तके याशिवाय तिसरा पर्याय म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिकवणे, पाठ्यपुस्तकाशिवाय शिकवणे.  पाठ्यपुस्तकाशिवाय शिकवायचं म्हणजे शिकवण्यातला जीव काढून घेतल्यासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही, इतकं पाठ्यपुस्तक आणि शिकवणं याचं घट्ट नातं आहे. लोककथांमध्ये राक्षसाचा जीव पोपटामध्ये आहे, पोपट मेला की राक्षस मरणार असं सांगितलं जायचं, तसं पाठ्यपुस्तकाचं झालंय. शिक्षणाचा सगळा जीव पाठ्यपुस्तकात. अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठीच अनेक साधनांपैकी पुस्तक एक साधन आहे, हे वेळोवेळी सांगितलं जातं पण ते एकमेव साधन आहे, असा शिक्षण व्यवहार सुरू असतो. 

काय शिकवायचं आहे हे नक्की झालं, की ते कशाच्या सहाय्यानं (साहित्य, अनुभव, कृती इ.) शिकवायचं हे ठरायला हवं. ज्याच्या साहाय्यानं जसं शिकलं जातं, त्यानुसार शिकणं कितपत झालं याचं मूल्यमापन व्हायला हवं. जसं पोहणं शिकल्यानंतर पोहता येतं की नाही हे पाण्यात उतरवल्यावर कळेल. पोहणं, पाठ्यपुस्तक वाचून शिकवलं असेल तर मूल्यमापन पाठ्यपुस्तकातील पाठाखालचे प्रश्‍न विचारून होईल. कदाचित तिथं हवे तेवढे टक्के मिळतील पण शिकणं शून्य टक्के असेल. संगणकावर टाईप करणं शिकायचं असेल तर त्यासाठी संगणक हवा. परीक्षासुद्धा संगणकाच्या सहाय्यानं होईल. येथे पाठ्यपुस्तकाच्या लेखी प्रश्‍नांचा उपयोग होणार नाही. वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तक हातात घेऊन शिकवण्याची सवय अंगवळणी पडली आहे. भाषा विषय वगळता, शिक्षकांना शिकवताना, पाठ्यपुस्तक हातात धरण्याची गरज वाटू नये; परंतु तसे होताना फारसे दिसत नाही. पाठ्यपुस्तकाचं काय पण आता गाईडही दुसरा जीव झाला आहे. या गोष्टीची विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही सवय झाली आहे. यामुळं पाठ्यपुस्तक, गाइड शिक्षकांना पंगू बनवतात हे लक्षात येत नाही. पाठ्यपुस्तकांच्या ऐवजी अध्ययन साहित्य विकसित करायला हवं. अध्ययन साहित्य शिकवण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी वापरायचं असल्याने साहित्याचा वापर करून मुलं शिकतील. 

इयत्ता पहिली ते चौथीसाठी पाठ्यपुस्तकांची फार कमी आवश्‍यकता आहे. भाषा आणि गणित विषयासाठी तर नाहीच नाही. परिसर अभ्यास हा विषय पुस्तकात नव्हे तर परिसरात शिकण्याचा विषय आहे. गणितातील लहान- मोठा, कमी- जास्त, मूलभूत क्रिया या गोष्टी प्रत्यक्ष पाहून, अनुभवून वस्तूंच्या साहाय्यानं कृती करून शिकण्याच्या आहेत. भाषा ही मूळ परिसरात ऐकून बोलून शिकवली जाते. भाषा आणि गणित विषयातील कितीतरी गोष्टी मूल शाळेच्या बाहेरच शिकून येते. जी गोष्ट मुक्तपणे सहज, आनंदाने शिकता येते ती गोष्ट पुस्तकात समाविष्ट करून कथन पद्धतीने शिकवून पाठाखालील प्रश्‍न विचारून रूक्ष आपण करतो. इयत्ता पहिलीच्या मुलांना वाचता येत नसताना पाठ्यपुस्तकात कविता छापणे आणि पुस्तकांच्या पानांची संख्या वाढवणे कितपत योग्य आहे. या कवितांचा साठा शिक्षकाजवळ असायला हवा. निवड करून योग्य अध्ययन निष्पत्तीसाठी योग्य कृती करून वापरता यायला हवा.  ज्या घटकाचं, संकल्पनेचं, संबोधाचं साहित्य करता येत नाही, अनुभव देता येत नाही, ई-लर्निंगच्या माध्यमातूनही शिकवता येत नाही तेवढ्या गोष्टींचा समावेश पाठ्यपुस्तकात करायला हवा. मग आपोआप सर्व विषयांसाठी मिळून एका वर्गासाठी एक पाठ्यपुस्तक असले तरी पुरेसे होईल. शिक्षक अभ्यासक्रम समजून घेऊन उद्दिष्टानुसार अध्ययन निष्पत्तीनुसार शिकवतील. मग आपोआपच पाठ्यपुस्तकातला जीव मोकळा होईल. सगळा अभ्यासक्रम संपवला, पाठ्यपुस्तक संपवले असे शब्दप्रयोग वापरले जाणार नाहीत. 

याशिवाय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टचस्क्रीन, एलसीडी, प्रोजेक्‍टर याच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातील भाग शिकवल्यास वर्गात पाठ्यपुस्तक वापरण्याची आवश्‍यकता राहणार नाही. मात्र हे करताना या साधनानं शिकण्याचा अतिरेक होऊन ओझं वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. इयत्ता १ ते ४ साठी कंपासपेटीची आवश्‍यकता नसताना ती दप्तरात असते ते टाळता येईल. शाळेत शालेय पोषण आहार उत्तम दर्जाचा देऊन जेवणाच्या डब्याचं ओझं कमी करता येईल. गृहपाठासाठी वह्या ऐवजी कागद वापरता येतील. जाड पुठ्ठ्याच्या वह्याऐवजी पातळ पुठ्ठ्यांच्या वह्या, लहान आकाराच्या, एकाच आकाराच्या कमी पृष्ठांच्या वह्या वापरता येतील. दप्तरात नीटनेटक्‍या ठेवता येतील. सर्वत्रच पाण्याच्या शुद्धतेवियी खात्री नसल्यानं बाटलीतील शुद्ध (?) पाणी पिण्याची सवय जडली आहे. शाळेतच शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध झालं तर बाटलीचं ओझं कमी होईल. पालकानी गाइडपेक्षा शिक्षकांच्यावर विश्‍वास दाखवला तर शाळेतील गाइड, शिकवणी वर्गातील गाइड कमी करता येईल. प्रयोगवह्या, चित्रकला कार्यानुभव साहित्य, निबंधाच्या वह्या शाळेतच ठेवता येतील.  सरावासाठी वह्यांऐवजी पाटीचा वापर करता येईल. पाटी, पेन्सिल वर्गातच ठेवण्याची सोय केली तर ते ओझं कमी होईल. प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतंत्र पुस्तक वापरण्याऐवजी एका बाकावर एक पुस्तक अशी योजना केली किंवा आवश्‍यक तेवढ्या वेळीच शाळेतूनच पुस्तक दिले तर दप्तरात पुस्तक ठेवावे लागणार नाही. भाषा विषय वगळता इतर विषयाच्या पुस्तकांची वर्गात गरज नसल्याने ती दप्तरात ठेवण्याची गरज नाही. 

अशा छोट्या छोट्या गोष्टीबरोबर आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळा भरवता येईल. या दिवशी कविता गायन, परिसर अभ्यास, शालेय परिसराच्या सहाय्याने अध्ययन, समूह गीत, गायन, नाट्यीकरण, प्रश्‍ननिर्मिती, बालसभा, शैक्षणिक, चित्रपट यासारख्या गोष्टींची योजना केली तर दप्तराऐवजी फक्त डोके घेऊन मूल शाळेत येईल. 

उपाययोजना तर भरपूर सांगता येतील. केंद्रीय शिक्षण विभागाच्या स्कूल बॅग धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के दप्तराचं वजन, पूर्व प्राथमिकची दप्तरातून मुक्तता, वेळापत्रकाचे नियोजन आदी उपाय सांगितले आहेत. गरज आहे ती विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची. कायदे आणि नियम अंगवळणी पडण्यासाठी मूळचं वळण मोडण्याची गरज आहे. ठरवलं तर नव्या सवयी लावणं अवघड नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com